लॅटिन अमेरिकेतील दुर्मिळ खनिज संसाधनांमध्ये भारताची मोठी गुंतवणूक

0
दुर्मिळ खनिज

भारत स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी (ई-वाहन), डिजिटल पायाभूत सुविधा आणि प्रगत उत्पादनाकडे वेगाने वाटचाल करत असताना, एक मुख्य प्रश्न अधिक तातडीने समोर येत आहे: या परिवर्तनाचा आधार असलेली ‘क्रिटिकल मिनरल्स’ अर्थात दुर्मिळ खनिजे कुठून प्राप्त होणार?

बॅटरीसाठी लागणारे लिथियम, पॉवर ग्रिडसाठी तांबे, इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण प्रणालीसाठी निकेल आणि दुर्मिळ खनिजे, याकडे आता केवळ वस्तू (कमॉडिटी) म्हणून पाहिले जात नाही, तर आता ती धोरणात्मक साधने बनले आहेत. या संदर्भात, भारताच्या दीर्घकालीन संसाधन नियोजनासाठी लॅटिन अमेरिका हा सर्वात महत्त्वाचा प्रदेश म्हणून उदयास येत आहे.

अँडीज पर्वतरांगांपासून ॲमेझॉनपर्यंत पसरलेल्या या प्रदेशात तांबे, लिथियम, दुर्मिळ पृथ्वी घटक आणि अक्षय ऊर्जा प्रणाली, इलेक्ट्रिक वाहने, डेटा सेंटर्स आणि पुढील पिढीच्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या इतर खनिजांचे जगातील काही सर्वात मोठे साठे आहेत.

पेरू: तांब्याचे केंद्रस्थान

पेरू भारताच्या दृष्टीने एक प्रमुख केंद्र ठरत आहे. हा देश तांब्याचा जागतिक पातळीवरील मोठा उत्पादक असून, लिथियम आणि दुर्मिळ खनिज क्षमतांचाही विकास करत आहे.

‘स्ट्रॅटन्यूजग्लोबल’शी बोलताना पेरूचे भारतातील राजदूत जेव्हियर पॉलिनिच म्हणाले की, “क्रिटिकल मिनरल्सच्या जागतिक पुरवठ्यात पेरूची भूमिका महत्त्वाची आहे, विशेषतः तांबे, जे अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे होणाऱ्या ऊर्जा संक्रमणासाठी अत्यावश्यक आहे.”

पेरू सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा तांबे निर्यातदार आहे, ज्याचा जागतिक उत्पादनात सुमारे 10 टक्के वाटा आहे आणि त्याचे वार्षिक उत्पादन 27 लाख टनांहून अधिक आहे. जगातील तांब्याच्या साठ्यांपैकी 10 टक्क्यांहून अधिक साठा हा देखील पेरूमध्ये आहे.

तांब्याव्यतिरिक्त, झिंक आणि मॉलिब्डेनम उत्पादनात पेरू जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, चांदीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच टिन, शिसे आणि पाऱ्याच्या उत्पादनातही पेरूचे लक्षणीय स्थान आहे. मॅकुसानी पठारासह इतर ठिकाणी दुर्मिळ खनिजे आणि महत्त्वपूर्ण युरेनियम संसाधनांचा शोध लावल्यामुळे, अलीकडे पेरूचे धोरणात्मक महत्त्व अधिक वाढले आहे.

भारताचे व्यावसायिक हितसंबंध आता हळूहळू आकाराला येत आहेत. उद्योग आणि सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, तांबे, सोने, लिथियम आणि दुर्मिळ पृथ्वी प्रकल्पांमधील संधी शोधण्यासाठी गेल्या वर्षभरात सुमारे 17 आंतरराष्ट्रीय खाण कंपन्यांनी पेरूला भेट दिली.

भारताच्या अदानी समूहानेही संभाव्य गुंतवणुकीचे मूल्यांकन करण्यासाठी पेरूला भेट दिल्याचे समजते.

व्यापार आकडेवारी खनिजांमधील वाढते संबंध दर्शवते. 2025 मध्ये, पेरूच्या सोन्याच्या निर्यातीसाठी भारत हे सर्वात मोठे गंतव्यस्थान म्हणून समोर आले, ज्याची किंमत 5.29 दशलक्ष डॉलर्स होती, जी 2024 च्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षात, पेरूच्या एकूण सोने निर्यातीपैकी 30.8 टक्के निर्यात भारताला झाली.

अर्जेंटिना: लिथियम आणि प्रांतीय सहभाग

अर्जेंटिना, जो चिली आणि बोलिव्हियासह ‘लिथियम ट्रँगल’चा भाग आहे; तो बॅटरी साहित्याच्या वाढत्या मागणीच्या काळात जागतिक लिथियम साठ्याचा मोठा वाटा बाळगतो.

भारतातील अर्जेंटिनाचे राजदूत मारियानो कौसिनो नमूद करतात की, खाणकामात सहकार्य आधीच सुरू झाले आहे. अर्जेंटिना आणि भारत यांच्यात खाण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या शक्यता आहेत, असे सांगत त्यांनी नमूद केले की, “भारतीय कंपन्या सध्या लिथियम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि हा सहभाग इतर खनिजांपर्यंत विस्तारू शकतो.”

कौसिनो यांनी असेही सांगितले की, “अर्जेंटिनाच्या खनिजसंपन्न प्रांतांच्या राज्यपालांच्या भेटीची तयारी सुरू आहे, जे प्रांतीय अधिकारी आणि भारतीय गुंतवणूकदार यांच्यातील थेट संवादाचे स्वारस्य दर्शवते. अर्जेंटिनाची विकेंद्रित खाण व्यवस्था संधी देते पण प्रांतीय नियम आणि पर्यावरणीय मानकांशी जुळवून घेण्याची आवश्यकता देखील निर्माण करते.”

चिली: खनिजे आणि कार्बनमुक्तीची सांगड

लिथियम आणि तांब्याचा अग्रगण्य जागतिक उत्पादक असलेल्या चिलीने, आपल्या स्वच्छ ऊर्जा आणि कार्बनमुक्ती (decarbonisation) अजेंड्यामध्ये दीर्घकालीन भागीदार म्हणून भारताला स्थान दिले आहे.

भारतातील चिलीचे राजदूत जुआन आंगुलो म्हणाले: “चिली स्वतःला भारताच्या ऊर्जा सुरक्षा साखळीत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थापित करण्याची आणि देशाच्या कार्बनमुक्तीच्या उद्दिष्टांमध्ये आपल्या धोरणात्मक खनिजांसह योगदान देण्याची आकांक्षा बाळगतो.”

ब्राझील: दुर्मिळ घटक आणि मूल्यवर्धन

भारताच्या लॅटिन अमेरिका धोरणात, ब्राझील एक वेगळा पैलू जोडतो. 2025 मध्ये, ब्राझीलने गोयास राज्यातील मिनासू येथून निओडीमियम, प्रासोडायमियम, डिस्प्रोसियम आणि टर्बियम यांसारख्या दुर्मिळ खनिज घटकांचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले, जे आशियाबाहेरील पहिले मोठ्या प्रमाणावरील दुर्मिळ पृथ्वी ऑपरेशन्स ठरले.

ब्राझील केवळ कच्च्या मालाच्या निर्यातीपुरते मर्यादित न राहता; शुद्धीकरण, मिश्रधातू उत्पादन आणि मॅग्नेट निर्मितीसाठी प्रोत्साहने देण्याचा प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिक वाहने, अक्षय ऊर्जा घटक, संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनासाठी पुरवठा साखळी स्थानिकीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या भारतासाठी, ब्राझील संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देतो.

ब्रिक्स (BRICS) मधील समान सदस्यत्व सहकार्यासाठी एक अतिरिक्त राजकीय व्यासपीठ प्रदान करते.

कोलंबिया: सहकार्याची पायाभरणी

कोलंबिया भविष्यातील खनिज सहकार्यामध्ये मोठ्या भूमिकेचा पाया रचत आहे.

भारतातील कोलंबियाचे राजदूत डॉ. व्हिक्टर ह्युगो एचेवेरी जॅरामिलो म्हणाले की, त्यांच्या देशात तांबे, निकेल, प्लॅटिनम आणि बेरियम यांसारखी धोरणात्मक संसाधने आहेत. “2023 मध्ये. कोलंबियाने क्रिटिकल मिनरल्सची यादी अद्ययावत केली असून, त्यामध्ये तांबे, निकेल, झिंक, प्लॅटिनम, लोह आणि मॅंगनीज यांचा समावेश आहे,” असे ते म्हणाले.

कोलंबियाच्या ‘नॅशनल मायनिंग एजन्सी’ने प्राधान्य दिलेल्या खनिजांमध्ये, विशेषतः सिलिकॉन आणि तांबे यामध्ये भारत संधी शोधू शकतो, असेही त्यांनी जोडले.

धोरणात्मक संदर्भ

अत्यावश्यक खनिजांसाठी जागतिक स्पर्धा तीव्र होत असताना आणि प्रक्रिया व शुद्धीकरणात चीनचे वर्चस्व कायम असताना, भारताचा लॅटिन अमेरिकेकडे वाढता कल दिसून येतो.

भारतासाठी, लॅटिन अमेरिका केवळ उत्पादनाचे प्रमाण आणि संसाधनांची विविधताच देत नाही, तर केवळ उत्खननाच्या पलीकडे जाऊन मूल्यवर्धन आणि तंत्रज्ञान सहकार्यात रस असलेले संभाव्य भागीदार देखील देते. हा दृष्टिकोन लवचिक, वैविध्यपूर्ण आणि देशांतर्गत भक्कम असलेल्या औद्योगिक पुरवठा साखळी तयार करण्याच्या भारताच्या व्यापक उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleBudget 2026: ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार संरक्षण बजेट वाढवणार का?
Next articleनवी अंतराळ शर्यत: स्पेस क्लाउड, AI सुविधांद्वारे चीनचे अमेरिकेला आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here