लॉस एंजेलिसमध्ये तथाकथित ‘‘Khalistani Referendum’ होण्याच्या काही दिवस आधी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील एका लोकप्रिय हिंदू मंदिरात झालेल्या तोडफोडचा भारताने निषेध केला आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
अशा कृत्यांना ‘घृणास्पद’ संबोधत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रार्थनास्थळांमध्ये पुरेशी सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.
“कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील हिंदू मंदिरात करण्यात आलेल्या तोडफोडीच्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. अशा घृणास्पद कृत्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना या कृत्यांसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि प्रार्थनास्थळांना पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन करतो,” असे जयस्वाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
हे मंदिर बीएपीएस किंवा बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेचे (बीएपीएस) आहे.
बीएपीएसचा खुलासा
बीएपीएस पब्लिक अफेअर्सने एका निवेदनाद्वारे म्हटलेः “आणखी एका मंदिरात झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर, यावेळी चिनो हिल्स, सीए येथे हिंदू समुदाय द्वेषाच्या विरोधात ठामपणे उभा आहे. चिनो हिल्स आणि दक्षिण कॅलिफोर्नियामधील समुदायासह आम्ही कधीही द्वेषाला थारा देणार नाही. आपली समान मानवता आणि श्रद्धा ही शांतता आणि करुणेचा उदय सुनिश्चित करेल.”
हल्ल्याचा तपशील सामायिक करताना, कोॲलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिकाने (सीओएचएनए) एक्सवर लिहिलेः “आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड झाली- यावेळी चिनो हिल्स, सीएमधील प्रतिष्ठित बीएपीएस मंदिरात ही घटना घडली. हा जगातील आणखी एक दिवस आहे जेव्हा प्रसारमाध्यमे आणि शिक्षणतज्ज्ञ असा आग्रह धरतील की हा हिंदूविरोधी द्वेष नाही आणि #Hinduphobia ही केवळ आपली कल्पनारम्यता आहे.”
एलएमध्ये (लॉस एंजेलिस) तथाकथित ‘‘Khalistani Referendum’ चा दिवस जवळ येत असताना हे घडते यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही,” असेही त्यात म्हटले आहे.
मागील वर्षी अमेरिकेतील हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले
कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामेंटो येथील बीएपीएस मंदिराच्या आवारात सप्टेंबरमध्ये आक्षेपार्ह भित्तिचित्रे चिकटविण्यास आली होती.
सॅक्रामेंटो घटनेपूर्वी, न्यूयॉर्कमधील मेलविले येथील आणखी एका बीएपीएस मंदिराची विटंबना करण्यात आली होती.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)