भारतीय संरक्षण परिषद 2025: नौदल प्रमुखांनी स्वदेशीकरणावर दिला भर

0

‘भारतीय संरक्षण परिषद 2025’ (India Defence Conclave 2025) च्या दहाव्या आवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी भारताची वाढती सागरी शक्ती, आत्मनिर्भरतेबद्दलची बांधिलकी तसेच स्थिर आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक व्यवस्थेच्या घडणीतील भारताची भूमिका यावर भर दिला.

“बहुराष्ट्रीय नौदल सराव ‘MILAN 2026’ च्या पुढील आवृत्तीचे आयोजन, फेब्रुवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम येथे केले जाईल,” अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. या सरावात 55 पेक्षा अधिक देशांचा सहभाग अपेक्षित आहे.

“स्वदेशी सामर्थ्याचे खरे महत्त्व सुरक्षेतूनच प्राप्त होते,” असे अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हटले. ते म्हणाले की, “भारतीय नौदल जागतिक जलक्षेत्रात, विशेषतः हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लढाईकरता सदैव सज्ज आहे.”

नौदलप्रमुखांनी नमूद केले की, “भारतीय नौदल सेवा आता पूर्णत: आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून, भारताच्या ‘आत्मनिर्भरतेच्या’ उद्दिष्टाला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यास निश्चितच मदत करेल.”

पुढे ते म्हणाले की, “नौदलाच्या जवळपास सर्व नवीन युद्धनौका, पाणबुड्या तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणालींपर्यंत यांचे डिझाईन आणि निर्मिती आता भारतातच होत आहे, जे देशाच्या संरक्षण-औद्योगिक परिदृश्यात निर्णायक बदल घडवून आणतील.”

तंत्रज्ञान, व्यापार आणि इंडो-पॅसिफिकमधील तणाव

नौदलप्रमुखांनी इशारा दिला की, “आज तंत्रज्ञान, व्यापार आणि तणाव हे तिनही घटक पूर्वीपेक्षा अधिक वेगाने एकत्र येत आहेत.”  इंडो-पॅसिफिक आणि हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थिरता टिकवण्यासाठी लवचिक भागीदारी आणि नवोन्मेषावर आधारित सहकार्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

त्यांनी, ‘सागर’ (Security and Growth for All in the Region) या भारताच्या दीर्घकालीन सागरी दृष्टीकोनाचा यावेळी पुनरुच्चार केला, जो विस्तृत सागरी क्षेत्रातील सहकार्य आणि सुरक्षेसाठी महत्वाचा मार्गदर्शक आराखडा आहे.

नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले की, “भारताचा जागतिक भागीदारीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हा बाह्य सहभाग आणि अंतर्गत सक्षमता यापैकी एकाची निवड करणारा नाही. या दोन्ही परस्परपूरक गरजा आहेत, ज्या एकत्र येऊन आपल्या सुरक्षित, आत्मनिर्भर आणि सहकार्यपूर्ण सागरी व्यवस्थेच्या दृष्टीला आकार देतात.”

MILAN 2026: सागरी भागीदारीचे मजबूतीकरण

अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांनी जाहीर केले की, जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय नौदल सरावांपैकी एक असलेला MILAN 2026 हा सराव, पुढील वर्षी आयोजित केला जाईल, ज्यामध्ये 55 पेक्षा अधिक देशांच्या नौदलांचा सहभाग असेल.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडो-पॅसिफिक प्रदेशातील नौदले एकत्र येतील, आणि नौवहन स्वातंत्र्य तसेच सामूहिक सागरी सुरक्षेच्या उद्दिष्टांवर समान विचारसरणी असलेल्या देशांमधील वाढत्या एकात्मतेचे प्रतीक ठरेल.

“MILAN सारखे नौदल सराव, तसेच मानवीय मदत, आपत्ती निवारण आणि समुद्री लुटमारीविरोधी मोहिमांमधील समन्वित गस्त आणि संयुक्त कारवाया, भारताच्या सागरी भागीदारींच्या विश्वासार्हतेचे आणि विश्वसनीयतेचे प्रदर्शन करतात,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

भारताचे संरक्षण-औद्योगिक परिवर्तन

या कॉन्क्लेव्हमध्ये, भारताच्या वाढत्या संरक्षण उत्पादन क्षेत्रावरही प्रकाश टाकण्यात आला, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांनी भारताला प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या जागतिक केंद्रात रूपांतरित करण्याच्या उपक्रमांवर चर्चा केली.

अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांनी सशस्त्र सेना, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वयाचे कौतुक केले. तसेच त्यांनी नमूद केले की, नौदलाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल ही फक्त नौदल संसाधनांपुरती मर्यादित नाही, तर त्यांना चालना देणाऱ्या प्रत्येक घटक आणि प्रणालीपर्यंत पोहोचलेली आहे.

त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना म्हटले की: “आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम भारत जगाला अधिक स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करतो. आमची आत्मनिर्भरतेसाठीची धडपड ही एकाकीपणाकडे झुकणारी नाही; ती टिकाऊ सामर्थ्य, भागीदारी आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सामायिक समृद्धी निर्माण करण्याबद्दल आहे.”

इंडिया डिफेन्स कॉन्क्लेव्हच्या, यंदाच्या दहाव्या आवृत्तीत ‘आत्मनिर्भरता, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर’ लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जे भारताच्या विकसित होत असलेल्या सुरक्षा आणि औद्योगिक धोरणाचे आधारस्तंभ आहेत.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleभारताचा इंडो-पॅसिफिक भागीदारी मजबूत करण्यावर भर
Next articleIndian Air Force Strengthens Technology, Joint Operations and Theatre Readiness

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here