भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘द गार्डियन’ या ब्रिटीश दैनिकाने दिलेल्या वृत्तातील आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. या वृत्तात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये घुसून हत्या केल्याचा आरोप भारतावर करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ‘द गार्डियन’ यांच्या बातमीतील आरोप म्हणजे ‘खोटा आणि द्वेषपूर्ण भारतविरोधी केलेला प्रचार’ असल्याचे म्हटले आहे.
गार्डियनने दिलेल्या बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, भारताने “भारताशी शत्रुत्व असणाऱ्यांना लक्ष्य करण्याचे धोरण राबवले असून” पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर एजन्सी RAWने 2020 पासून अशा सुमारे 20 हत्या केल्या आहेत.
पाकिस्तानने दिलेले पुरावे आणि सीमेच्या दोन्ही बाजूंच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर हा अहवाल आधारित असल्याचे गार्डियनने म्हटले आहे.
एका अज्ञात भारतीय अधिकाऱ्याचा हवाला देत गार्डियनने म्हटले आहे की, भारताने इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद आणि रशियाच्या केजीबीपासून प्रेरणा घेतली आहे, जे परदेशी भूमीवर शत्रूंना मारण्यासाठी ओळखले जातात.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काही हत्यांच्या संदर्भात कागदपत्रे सादर केली आहेत, ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) स्थापन केलेल्या भारतीय गुप्तचरांच्या स्लीपर सेलने या हत्या केल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.
अहवालात उद्धृत केलेल्या आर अँड एडब्ल्यूच्या एका अज्ञात अधिकाऱ्याने म्हटले आहे की ही हत्या बहुधा पाकिस्ताननेच केली असावी. भारतातील इतरांनीही असेच मत व्यक्त केले होते.
याआधी अमेरिका आणि कॅनडाने परदेशी भूमीवर हत्या आणि हत्येचा भारताने प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दावा केला होता की, खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे आरोप केले आहेत. कॅनडाचा नागरिक आणि दहशतवादी निज्जरची जूनमध्ये सरे येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारताने हा आरोप फेटाळला होता.
यानंतर अमेरिकेने असा दावा केला होता की, त्यांनी आणखी एक खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नून यांच्या हत्येचा प्रयत्न हाणून पाडला होता. आरोपांमध्ये नमूद केलेले”संघटित गुन्हेगार, बंदूकधारी, दहशतवादी आणि इतरांमधील संबंध” याविषयी अमेरिकेच्या माहितीची तपासणी आम्ही केली होती असे भारत सरकारने यासंदर्भात म्हटले होते.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेला सांगितले आहे की त्यांच्या तपासात अशा एका अज्ञात अधिकाऱ्याचा सहभाग आढळला आहे, जो आता एजन्सीशी संबंधित नव्हता.
पिनाकी चक्रवर्ती