कच्च्या तेलाच्या आयात स्रोतांचा भारताकडून विस्तार; इक्वेडोरचा नवा पर्याय

0
इक्वेडोरचा
इक्वेडोरमधील सरकारी एस्मेराल्डास रिफायनरी कॉम्प्लेक्सचा फाइल फोटो, (सौजन्य: डॅनियल तापिया/रॉयटर्स)

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचे स्रोत विस्तारत असून, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला मार्च महिन्याच्या अखेरीस, इक्वेडोरमधून ओरिएंटे प्रकारातील सुमारे 20 लाख बॅरल कच्च्या तेलाचा साठा प्राप्त होणार आहे, अशी माहिती उद्योगातील काही सूत्रांनी दिली आहे. मध्यम-जड आणि सॉर-ग्रेड स्वरूपाचा हा तेल साठा आंतरराष्ट्रीय निविदेद्वारे खरेदी करण्यात आला आहे.

भारतासाठी दक्षिण अमेरिकेसोबतचा हा व्यवहार अगदी दुर्मिळ मानला जात आहे, कारण भारतीय रिफायनरीज पारंपारिकपणे रशिया, मध्य पूर्व आणि पश्चिम आफ्रिकेतील काही भागांतून सर्वाधिक तेल खरेदी करत आल्या आहेत. इंडियन ऑईलचे मेक्सिको, ब्राझील आणि कोलंबियासोबत पर्यायी पुरवठा करार असले, तरी भारताच्या एकूण आयातीमध्ये दक्षिण अमेरिकन तेलाचे प्रमाण क्वचितच राहिले आहे. मात्र, गेल्या महिन्यात कंपनीने कोलंबियाचे 20 लाख बॅरल ‘कास्टिला’ प्रकारातील कच्चे तेल खरेदी केले होते.

भारतातील इक्वेडोरचे राजदूत फर्नांडो झेवियर बुचेली, यांनी इंडियन ऑईलला इक्वेडोरचे कच्चे तेल मिळत असल्याची पुष्टी करत, हा व्यवहार जागतिक ऊर्जा व्यापारात होत असलेल्या व्यापक बदलांचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले. त्यांनी ‘स्ट्रॅटन्यूजग्लोबल’ शी बोलताना सांगितले की, “इक्वेडोरच्या कच्च्या तेलाची ही खरेदी जागतिक ऊर्जा प्रवाहांच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर होत आहे.”

बुचेली म्हणाले की, रशियन उत्पादक आणि शिपिंग कंपन्यांवर अमेरिका आणि युरोपियन युनियनने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियन तेलाची आयात गुंतागुंतीची झाली असून, यामुळे भारतीय रिफायनर्सना तेलाचे इतर स्रोत शोधण्यास भाग पाडले आहे. ते पुढे म्हणाले की, भारताची वाढती उर्जेची मागणी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठा स्रोतांचे विविधीकरण करण्याचे धोरण पाहता, इक्वेडोर भारताला प्रमुख बाजारपेठ मानतो.

“या बदलत्या परिदृश्यात, इक्वेडोर स्वतःला एक स्पर्धात्मक, विश्वासार्ह आणि जबाबदार ऊर्जा भागीदार म्हणून उभे करत आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “सध्याच्या व्यवहाराची ही खेप, मध्यम कालावधीत अधिक स्थिर पुरवठा व्यवस्थेचा मार्ग मोकळा करू शकते,” असे त्यांनी नमूद केले.

यापूर्वी भारत इक्वेडोरच्या कच्च्या तेलाच्या प्रमुख निर्यात गंतव्यस्थानांपैकी एक राहिला आहे, मात्र त्याचे प्रमाण वेळोवेळी बदलत राहिले आहे. ‘ओरिएंट’ हे इक्वेडोरचे मुख्य निर्यात मिश्रण असून, ते साधारणपणे जड आणि सोअर-ग्रेड तेल हाताळण्यासाठी सुसज्ज असलेल्या रिफायनरीजमध्ये शुद्ध केले जाते.

2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर, रशियाच्या स्वस्त दरातील सागरी कच्च्या तेलाचा भारत सर्वात मोठा खरेदीदार बनला होता. मात्र तेव्हापासून भारतीय तेल कंपन्यांवर आयात पोर्टफोलिओ संतुलित करण्यासाठी दबाव वाढत आहे. इतर रिफायनर्सनी आधीच पर्यायी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.

उद्योगातील सूत्रांनुसार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने ट्रॅफिगुरा मार्फत ओमानच्या कच्च्या तेलाची आणि इराकच्या बसरा मीडियम या कच्च्या तेलाची व्यवस्था केली आहे. तर हिंदुस्थान पेट्रोलियम, मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स आणि एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेडसह अनेक रिफायनर्सनी रशियन कच्चे तेल खरेदी करणे पूर्णपणे थांबवले आहे.

जागतिक पुरवठा परिस्थिती बदलत असताना, भारतीय रिफायनर्सनी स्त्रोतांमध्ये केलेल्या बदलांच्या मालिकेत आता इक्वेडोरच्या या साठ्याची भर पडली आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleRare Earths in Defence Technology: Can India Outpace China?
Next articleडीआरडीओचे ‘हायपरसोनिक अँटी-शिप’ क्षेपणास्त्र प्रदर्शनासाठी सज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here