लढाऊ विमानांसाठीच्या हायस्पीड एस्केप प्रणालीची DRDO द्वारे यशस्वी चाचणी

0

भारताच्या स्वदेशी एरोस्पेस क्षमतांना प्रोत्साहन देत, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टीमची हाय-स्पीड रॉकेट स्लेज चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. महत्त्वपूर्ण विमान वाहतूक सुरक्षा तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या देशाच्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

ही चाचणी चंदीगढ येथील DRDO च्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) च्या, रेल ट्रॅक रॉकेट स्लेड (RTRS) सुविधेवर घेण्यात आली. या चाचणीने वैमानिकांच्या आपत्कालीन सुटकेच्या क्रमवारीतील तीन महत्त्वपूर्ण घटक: कॅनोपीचे विभाजन, इजेक्शनची वेळ आणि सुरक्षित एअरक्रू रिकव्हरी, यांना गतिशील आणि हाय-स्पीड परिस्थितीत प्रमाणित केले.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या या प्रणालीची, दुहेरी स्लेज संरचनेचा वापर करून एका जटिल चाचणी घेण्यात आली. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचा (LCA) पुढील भाग स्लेजवर बसवण्यात आला आणि अनेक सॉलिड-प्रोपेलंट रॉकेट मोटर्सच्या अनुक्रमिक प्रज्वलनाद्वारे त्याला काळजीपूर्वक मोजलेल्या वेगापर्यंत पुढे ढकलण्यात आले. या पद्धतीमुळे अभियंत्यांना ‘नेट’ किंवा ‘झिरो-झिरो’ चाचण्यांसारख्या पारंपारिक स्थिर मूल्यांकनापेक्षा अधिक अचूकपणे वास्तविक इजेक्शन परिस्थितीचे अनुकरण करणे शक्य झाले.

या चाचणीमध्ये, फायटर पायलटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रगत इंस्ट्रुमेंटेड एंथ्रोपोमॉर्फिक टेस्ट डमीने मुख्य भूमिका बजावली. सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या या डमीने, वैमानिकाला प्रत्यक्ष आपत्कालीन इजेक्शनदरम्यान जाणवणारे बल, प्रवेग आणि ताण याची माहिती नोंदवली. कॅनोपी तुटण्यापासून ते वैमानिकाला बाहेर काढण्यापर्यंतची क्रमवारी ऑनबोर्ड कॅमेरे आणि जमिनीवर आधारित इमेजिंग प्रणाली वापरून ट्रॅक करण्यात आली. भारतीय हवाई दल, इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन आणि सर्टिफिकेशन एजन्सीचे अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली ही चाचणी पार पडली.

या स्वरूपाच्या गतिशील इजेक्शन चाचण्या, विमान वाहतूक सुरक्षा क्षेत्रात सर्वात आव्हानात्मक असतात आणि जगात केवळ मोजक्या देशांमध्येच त्या डिझाईन करण्याची आणि त्यांना अंमलात आणण्याची क्षमता आहे. या यशामुळे भारत त्या ‘एलिट ग्रुप’ (प्रतिष्ठित गटात) मध्ये सामील झाला आहे, ज्यामध्ये हाय-रिस्क एरोस्पेस प्रणालींमध्ये त्याची वाढती तांत्रिक क्षमता अधोरेखित होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, या यशस्वी कामगिरीबद्दल DRDO, ADA, HAL, भारतीय हवाई दल आणि संरक्षण उद्योगातील भागीदारांचे अभिनंदन केले आणि हे “प्रगत संरक्षण प्रणालींमध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल” असल्याचे म्हटले. अशा महत्त्वाच्या टप्प्यांमुळे जटिल विमान वाहतूक तंत्रज्ञान स्वदेशी पद्धतीने विकसित करण्याच्या भारताच्या आत्मविश्वासाला बळकटी मिळते, असेही ते म्हणाले.

DRDO चे अध्यक्ष आणि संरक्षण R&D विभागाचे सचिव समीर व्ही कामत, यांनी देखील चाचणीत सहभागी वैज्ञानिक आणि अभियंत्यांचे कौतुक केले आणि सांगितले की, “हे यशस्वी प्रदर्शन संस्थेची नवोन्मेषासाठीची बांधिलकी आणि पायलट सुरक्षेच्या वृद्धीसाठीची कटिबद्धता दर्शवते.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia Enters Elite League as DRDO Successfully Tests High-Speed Escape System for Fighter Aircraft
Next articleभारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी रशियाने नवा आराखडा आखला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here