भारत-EU मधील चर्चेमुळे, मुक्त व्यापार कराराच्या अंतिम टप्प्याला गती मिळाली

0

भारत आणि युरोपीय संघाने (EU), ब्रुसेल्स येथे झालेल्या दोन दिवसीय उच्च-स्तरीय बैठकांनतर, या वर्षाच्या अखेरीस दीर्घकाळ प्रलंबित असलेला मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम करण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.

2020 मध्ये सुरू केलेल्या ‘धोरणात्मक रोडमॅप’मुळे, द्विपक्षीय संबंधांना मिळालेली सातत्यपूर्ण गती प्रतिबिंबीत होते. या चर्चा 11व्या भारत-EU परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा सल्लामसलत आणि 6व्या धोरणात्मक भागीदारी आढावा बैठकीदरम्यान झाल्या.

या सल्लामसलतींमध्ये आर्थिक सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यामध्ये दोघांनीही पुरवठा साखळीचे विविधीकरण, गंभीर पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि जागतिक अडथळ्यांपासून प्रमुख क्षेत्रांचे संरक्षण करण्याकरिता परस्पर सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. अधिकाऱ्यांनी, FTA संबंधी अनेक प्रकरणांमध्ये प्रगती झाल्याची नोंद घेतली आणि व्यापार-संबंधित चौकटींमधील स्थिर संस्थात्मक प्रगती दर्शवत, गुंतवणूक संरक्षण करार आणि भौगोलिक संकेत करार यांवर समांतर प्रयत्न सुरू असल्याची पुष्टी केली.

कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा विकास, हे मुद्दे देखील संवादाच्या केंद्रस्थानी होते, ज्यामध्ये युरोपीय संघाने ग्लोबल गेटवे उपक्रमांतर्गत, भारतासोबत निकट सहकार्य करण्याच्या आपल्या उद्दिष्टाची पुष्टी केली. सामायिक मानकांशी जुळवून घेणारी शाश्वत वित्तपुरवठा मॉडेल्स आणि सीमापार डिजिटल पायाभूत सुविधांवरही, यावेळी भर दिला गेला. भारत-EU कनेक्टिव्हिटी भागीदारी अंतर्गत प्रगतीचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये सुरक्षित डिजिटल परिसंस्था, हरित ऊर्जा पुरवठा मार्ग आणि वाहतूक कॉरिडॉरवर चर्चा झाली. तसेच, दोन्ही देशांनी भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरवरील संवाद सातत्याने चालू ठेवण्याचे मान्य केले, ज्याला सुदृढ व्यावसायिक प्रवाह सुनिश्चित करण्यासाठीचा एक धोरणात्मक घटक म्हणून संबोधले गेले.

नवोपक्रम आणि विज्ञान-तंत्रज्ञान यातील सहकार्यावर आधारित भागीदारीवर यावेळी विशेष लक्ष केंद्रित केले गेले, जी दोघांसाठीही भविष्यातील मोठा आधारस्तंभ आहे. भारत आणि EU ने स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन, डिजिटल प्रशासन, अवकाश सहकार्य आणि संशोधन उपक्रमांमध्ये सहकार्य तीव्र करण्याचे मान्य केले. व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेअंतर्गत निर्माण झालेल्या मजबूत गतीची यावेळी नोंद घेण्यात, तसेच 2026 च्या मंत्रिस्तरीय सत्रापूर्वी सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी सामायिक बांधिलकी व्यक्त केली गेली. या चर्चेदरम्यान, दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांना बळकटी देण्यासाठी पिपल-टू-पिपल देवाणघेवाणीच्या भूमिकेचे महत्व ओळखून; विद्यार्थ्यांची गतिशीलता, शैक्षणिक भागीदारी आणि सहयोगी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावर नव्याने लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यामध्ये सागरी सुरक्षा, दहशतवादविरोधी भूमिका, सायबर लवचिकता, अवकाश सहकार्य, संरक्षण उद्योग सहकार्य, निःशस्त्रीकरण आणि अप्रसार यासारख्या क्षेत्रांमध्ये, दोन्ही बाजूने सहभाग वाढवण्याचा मनसुबा व्यक्त करण्यात आला.

माहिती-विनिमय आणि कार्यात्मक समन्वय वाढवण्यासा सुलभ करण्यासाठी, त्यांनी सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी, तसेच माहिती सुरक्षा करार यांवरील वाटाघाटी पूर्ण करण्याच्या आपल्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला. या सल्लामसलतींमध्ये सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि शांततापूर्ण विवाद निराकरणाचा आदर राखणाऱ्या मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिक प्रदेशाला पाठिंबा देण्याची पुन:पुष्टी करण्यात आली.

युरोपीय संघाने, भारताच्या आगामी 2026 मधील ब्रिक्स अध्यक्षपदाचे स्वागत केले आणि दोन्ही भागीदारांनी जागतिक प्रशासन सुधारणांमध्ये समान हितसंबंध असलेली क्षेत्रे निश्चित केली. चर्चेदरम्यान, मानवतावादी सहकार्य, आपत्ती लवचिकता आणि आपत्ती निवारणासाठी पायाभूत सुविधा यातील परस्पर सहकार्यावरही भर दिला गेला . व्यापक आंतरराष्ट्रीय विषयांवर, जसे की- युक्रेनमध्ये सर्वसमावेशक आणि टिकाऊ शांततेसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आणि गाझामध्ये स्थैर्य लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याचे आवाहन दोन्ही बाजूंनी करण्यात आले.

सध्याचा संयुक्त रोडमॅप पूर्णत्वाच्या जवळ आल्यामुळे, भारत आणि EU ने, 2025 नंतर सहकार्याला दिशा देण्यासाठी, एका नवीन संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंड्यावर काम सुरू करण्यास सहमती दर्शवली. हा आराखडा 2026 च्या पहिल्या तिमाहीत, नवी दिल्ली येथे होणाऱ्या भारत-EU शिखर परिषदेत स्विकारला जाण्याची अपेक्षा आहे.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिव (पश्चिम), सिबी जॉर्ज यांनी देखील EU इंडो-पॅसिफिक मंत्रिस्तरीय बैठकीत भाग घेतला, ज्यामध्ये गंभीर सागरी पायाभूत सुविधा, आर्थिक सुरक्षा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीवर भारताचा दृष्टिकोन मांडण्यात आला.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleअरुणाचलमधील महिलेच्या अटकेवरून चिनी सोशल मीडियावर वादळ
Next articleInside Pakistan’s Long War of A Thousand Cuts

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here