भारताने भूषवले UNWMOC 2025 चे यजमानपद

0

जागतिक सहकार्य आणि लिंग-समावेशक शांतता राखण्याच्या प्रतिबद्धतेचे दर्शन घडवून आणण्यासाठी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 देशांमधील महिला लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या महिला अधिकारी सध्या नवी दिल्ली येथे UN महिला लष्करी अधिकारी अभ्यासक्रम (UNWMOC) 2025 मध्ये सहभागी झाल्या आहेत.

 

18 ते 29 ऑगस्ट दरम्यान मानेकशॉ सेंटर येथे सुरू असलेल्या या अभ्यासक्रमामुळे भारतीय अधिकाऱ्यांसह आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील महिला अधिकाऱ्यांना एकत्र आणले आहे. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत Centre for United Nations Peacekeeping (CUNPK) द्वारे आयोजित या उपक्रमाचे उद्दिष्ट बहुआयामी संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांमध्ये प्रभावी तैनातीसाठी गणवेशातील महिलांच्या व्यावसायिक क्षमता निर्माण करणे आहे.

साउथ ब्लॉक येथे झालेल्या संवादादरम्यान, संरक्षण मंत्र्यांनी जागतिक एकता आणि शांततेसाठी सामूहिक वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून आंतरराष्ट्रीय सहभागींच्या उपस्थितीचे कौतुक केले. तुमची उपस्थिती संयुक्त राष्ट्रांच्या खऱ्या भावनेचे, जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या सामायिक दृष्टीकोनातून एकत्रित झालेल्या विविध राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करते “, असे ते यावेळी म्हणाले.

शांतता मोहिमेत लिंग समानतेसाठी भारताची वचनबद्धता

UN च्या शांतता मोहिमेत सर्वात मोठ्या योगदानकर्त्यांपैकी एक म्हणून, भारताने जागतिक शांतता प्रयत्नांमध्ये महिलांच्या समावेशाला सातत्याने पाठिंबा दिला आहे. सशस्त्र दलांमध्ये महिलांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी भारताच्या सुरू असणाऱ्या प्रयत्नांचा राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला.

“आम्ही लिंग समानता वाढवण्यासाठी, समावेशक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविधता तसेच समानतेद्वारे शांतता प्रस्थापित होऊन एक जग निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे ते म्हणाले. “महिला शांती सैनिकांना सक्षम करण्यासाठी आणि नेतृत्व तसेच सेवा करण्याची समान संधी सुनिश्चित करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्र आणि सैन्य योगदान देणाऱ्या देशांसोबत सहकार्य करत राहील.”

सिंह यांनी महिला शांती सैनिकांना “बदलाच्या मशालधारी”  म्हणून वर्णन केले आणि संघर्षग्रस्त समुदायांमध्ये, विशेषतः महिला आणि मुलांमध्ये विश्वास वाढवण्याची त्यांची अद्वितीय क्षमता मान्य केली. “महिला अधिकारी शांतता मोहिमेत महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आणतात. त्यांची उपस्थिती लैंगिक हिंसाचार रोखण्यास मदत करते, मानवतावादी पोहोच वाढवते आणि स्थानिक महिलांना शांतता निर्माणात सक्रिय भूमिका घेण्यास प्रेरित करते,” असे त्यांनी नमूद केले.

ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक आंतरराष्ट्रीय मंच

UNWMOC 2025 च्या आवृत्तीत आर्मेनिया, डीआर काँगो, इजिप्त, आयव्हरी कोस्ट, केनिया, किर्गिझ प्रजासत्ताक, लायबेरिया, मलेशिया, मोरोक्को, नेपाळ, सिएरा लिओन, श्रीलंका, टांझानिया, उरुग्वे आणि व्हिएतनाम या देशांचा सहभाग आहे. बारा भारतीय महिला अधिकारी आणि पाच इंटर्न देखील या अभ्यासक्रमात सहभागी होत आहेत, ज्यामुळे हा अभ्यास व्यावसायिक विकास आणि आंतरसांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक व्हायब्रंट व्यासपीठ बनले आहे.

शांतिरक्षक नियतकालिकाचे प्रकाशन

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मंत्र्यांनी UN च्या शांतता मोहिमेत भारताच्या अमृत महोत्सवी सहभागानिमित्त ‘ब्लू हेल्मेट ओडिसी: ७५ इयर्स ऑफ इंडियन पीसकीपिंग’ या विशेष नियतकालिकाचे प्रकाशनही केले. हे नियतकालिक भारताचे व्यापक योगदान, नाविन्यपूर्ण पद्धती आणि शांतता मोहिमेच्या भविष्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोन यावर प्रकाश टाकते.

प्रतिष्ठित UN च्या ब्लू हेल्मेट्सच्या रूपकाबद्दल बोलताना सिंह म्हणाले, “आकाशाप्रमाणे, शांती सैनिक आश्रय आणि आश्वासन देतात; समुद्राप्रमाणे, ते राष्ट्रांना जोडतात आणि संस्कृतींमध्ये पूल बांधतात.”

प्रशिक्षण केंद्र आणि व्यावहारिक प्रात्यक्षिक

या अभ्यासक्रमात आधुनिक काळात शांतता राखण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा, नागरिकांचे संरक्षण, संघर्ष-संबंधित लैंगिक हिंसाचार आणि बाल संरक्षण यांचा समावेश आहे. UN, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करातील माजी सैनिकांकडून अनेक तज्ज्ञ यात मार्गदर्शन करत आहेत. वास्तविक जगातील ऑपरेशनल परिस्थितींचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी UN च्या मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या पायदळ तुकडीचे क्षेत्रीय प्रात्यक्षिक देखील आयोजित करण्यात आले आहे.

उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

या संवादाला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली. समावेशक प्रशिक्षण आणि नेतृत्वाद्वारे जागतिक शांतता राखण्याची क्षमता निर्माण करण्यावर भारताचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleClever Calf Diplomacy: Pakistan’s Non-Aligned Maneuvering
Next articleArctic Heating Up: India’s Quest to Claim Strategic Contestation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here