‘आत्मनिर्भरतेमुळे’ संरक्षण क्षेत्रात जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताचा उदय – पंतप्रधान

0
भारताच्या स्वातंत्र्यदिनीनिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य : पंतप्रधान कार्यालय)

संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरतेमुळे’ तसेच गेल्या काही वर्षांत सरकारने या दृष्टीने उचललेल्या पावलांमुळे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारत उदयाला येत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ही माहिती दिली.

एक काळ असा होता जेव्हा संरक्षण अर्थसंकल्पातील बहुतांश तरतुदी परदेशातून शस्त्रे किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरल्या जात असत. मात्र सरकारने देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी स्वदेशी उत्पादनावर लक्ष केंद्रित केल्याचे पंतप्रधान म्हणाले. अनेक सकारात्मक स्वदेशीकरण सूचींच्या अधिसूचनेसह बहुतांश निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दलांचे कौतुक केले. या सूचीमध्ये 5 हजार 600हून अधिक वस्तू असून ज्या नियुक्त केलेल्या वेळेनंतर केवळ भारतीय उद्योगांकडून खरेदी केल्या जात आहेत किंवा केल्या जातील. एकेकाळी संरक्षण उपकरणांच्या आयातीवर पूर्णपणे अवलंबून असलेला भारत आज अनेक देशांमध्ये निर्यात करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, वार्षिक संरक्षण उत्पादनांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1.27 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांक गाठला. याच आर्थिक वर्षात, संरक्षण निर्यातीने 21 हजार 083 कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत ही वाढ 32.5 टक्के इतकी आहे. याव्यतिरिक्त, 2024 – 25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत संरक्षण निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. या तिमाहीत 6 हजार 915 कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात करण्यात आली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 78 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी ही निर्यात 3 हजार 885 कोटी रुपये होती.

2016 चा सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 चा एअर स्ट्राइक यांचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सांगितले की एक काळ असा होता की जेव्हा देश दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत होता. पण आज देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मातृभूमीची निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या आपल्या शूर सैनिकांचा देशाला अभिमान आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सर्व क्षेत्रांमधील महिलांच्या वाढत्या सहभागावरही पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, महिला केवळ राष्ट्राच्या प्रगतीत सहभागी होत नाहीत तर त्या नेतृत्वाचीदेखील भूमिका बजावत आहेत. “लष्कर असो, नौदल असो, हवाईदल असो किंवा अंतराळ क्षेत्र असो, आपण आपल्या देशाच्या सातत्याने वाढत चाललेल्या नारी शक्तीच्या प्रभावाचे साक्षीदार आहोत.”

आराधना जोशी
(पीआयबीच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleRussia Claims Containing Ukrainian Advance, Ukraine Reports Further Progress In Kursk
Next articleतालिबानी सत्तेचे तिसरे वर्ष, शरिया आणि ताकदीचे प्रदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here