चक्रीवादळाने बाधित श्रीलंकेमध्ये भारताचे ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू

0
ऑपरेशन सागर बंधू

श्रीलंकेतील सर्वप्रथम प्रतिसादकर्ता म्हणून आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करत, भारताने दितवाह चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झालेल्या श्रीलंकेला मदत करण्याच्या हेतूने, ‘ऑपरेशन सागर बंधू‘ ही सर्वसमावेशक मानवतावादी सहाय्यता आणि आपत्ती निवारण (HADR) मोहीम सुरू केली आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय , भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेना यांच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात येत आहे. आठवड्याच्या अखेरीस या मोहिमेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून, यामध्ये अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य, गंभीर जखमींचे हवाई वाहतुकीद्वारे स्थलांतर आणि मदत सामग्रीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणे, या गोष्टी समाविष्ट आहेत.

भारतीय हवाई दलाची हायब्रीड हेलिकॉप्टर मोहीम

या ऑपरेशनमधील आतापर्यंतच्या सर्वात धाडसी बचाव कार्यांपैकी एक म्हणजे, भारतीय हवाई दलाच्या Mi-17 V5 हेलिकॉप्टर्सनी रविवारी भूस्खलनग्रस्त कोटमाले प्रदेशात, यशस्वीरित्या राबवलेली एक हायब्रीड बचाव मोहीम.

IAF अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेदरम्यान एका गरुड कमांडोला दोरीच्या साहाय्याने बाधित भागात उतरवण्यात आले, जिथे त्याने अडकलेल्या लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना योग्य प्रकारे गाईड करत, एका अत्यंत धोकादायक मार्गावरून सुखरुपणे कोटमाले येथील हेलिपॅडपर्यंत आणले.

याठिकाणाहून 12 भारतीय, 10 परदेशी नागरिक आणि 2 श्रीलंकन नागरिकांसह एकूण 23 प्रवाशांना आणि तीन गंभीर जखमींना कोलंबो येथे सुरक्षित हलवण्यात आले.

दुसऱ्या फेरीत, लहान मुलांसह अन्य 21 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, तसेच अतिरिक्त वैद्यकीय स्थलांतरही करण्यात आले. या प्रवाशांमध्ये पोलंड, बेलारूस, इराण, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेच्या नागरिकांचा समावेश होता.

दिवसाच्या सुरुवातीला, भूस्खलनाच्या क्षेत्रातील बचाव कार्यांमध्ये सहभागी होण्यासाठी, श्रीलंकन लष्कराच्या 40 सैनिकांच्या पाच तुकड्यांना, भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सने दियातलावाद आर्मी कॅम्पमधून हवाई मार्गे हलविण्यात आले.

भारतीय हवाई दलाने ‘एक्स’ (X) प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की:

“भारताच्या श्रीलंकेतील बचाव मोहिमेचा भाग म्हणून, Mi-17 V5 हेलिकॉप्टर्स जलद HADR मोहिमांसाठी कोलंबोमध्ये तैनात आहेत. ज्याद्वारे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरणाचे कार्य पुढेही सुरू ठेवले जाईल.” — @IAF_MCC

हवाई आणि सागरी मार्गाने मदत

C-130J आणि IL-76 या लष्करी वाहतूक विमानांच्या कोलंबो येथे येण्याने, भारताच्या आपत्कालीन आणि जलद मदत कार्यात लक्षणीय वाढ झाली, ज्यामध्ये 21 टनांहून अधिक मदत सामग्री, 80 NDRF कर्मचारी आणि 8 टन विशेष उपकरणे होती. पहिले विमान शनिवारी सकाळी 10 वाजता उतरले, अशाचप्रकारे आणखी रोटेशन फ्लाइट्सची योजना करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाचे विमानवाहू जहाज INS विक्रांतवर तैनात केलेली, दोन चेतक हेलिकॉप्टर्स श्रीलंकन ​​वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांसोबत शोध आणि बचाव कार्य करत आहेत.

आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूसाठी श्रीलंकेत असलेली भारतीय नौदलाची जहाजे, INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांनी तात्काळ 6.5 टनांहून अधिक अन्नसामग्री आणि आपत्कालीन मदत साहित्य उतरविले, जे ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत मदतीचे पहिले सत्र होते.

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी लिहिले की:

“ऑपरेशन सागर बंधू सुरू झाले आहे. INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांनी कोलंबो येथे मदत सामग्री सुपूर्द केली. पुढील पावले उचलली जात आहेत.” — @DrSJaishankar

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय मदत ‘श्रीलंकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि श्रीलंकन ​​त्रि-सेवांच्या घनिष्ठ समन्वयाने तैनात केली जात आहे, ज्यामुळे सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांना जलद आणि नेमकी मदत सुनिश्चित होत आहे.

श्रीलंकन ​​हवाई दलानेही भारताच्या प्रयत्नांची दखल घेत म्हटले की: “श्रीलंकेतील पूर बचाव आणि मदत कार्यात भारतीय NDRF चे जवान सक्रियपणे काम करत आहेत.” — @airforcelk

संकटाच्या काळात भारत श्रीलंकेसोबत उभा आहे: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत, ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरण, ‘व्हिजन महासागर’ अंतर्गत भारताची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. त्यांनी लिहीले की: “दितवाह चक्रीवादळामुळे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्या श्रीलंकेच्या नागरिकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. आमचा सर्वात जवळचा सागरी शेजारी असलेल्या श्रीलंकेसोबत, त्यांच्या अडचणीच्या काळात आम्ही उभे आहोत. भारताने तातडीने मदत सामग्री आणि HADR समर्थन पाठवले आहे.” — @narendramodi

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, परिस्थितीच्या बदलत्या गरजेनुसार भारत आपली मदत वाढवण्यासाठी तयार आहे.

श्रीलंकेतील संकटाची व्याप्ती

श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या म्हणण्यानुसार, ‘दितवा’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे:

  • 193 हून अधिक मृत्यू; 228 जण बेपत्ता
  • सुमारे 9.7 लाख लोक प्रभावित
  • दहा हजारो लोक तात्पुरत्या निवाऱ्यात स्थलांतरित
  • बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक विस्कळीत
  • मध्य पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलने, अनेक जिल्ह्यांत तीव्र पूरस्थिती

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी देशभरात सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आहे.

अडकलेल्या प्रवाशांच्या स्थलांतरणात भारताचा पुढाकार

उड्डाणे बाधित झाल्यामुळे कोलंबो विमानतळावर अडकलेल्या भारतीय प्रवाशांना अन्न, पाणी, निवाऱ्यासह; वाणिज्य दूतावासाच्या मदतीने भारतीय उच्चायुक्तालय आवश्यक मदत पुरवत आहे.

गरज पडल्यास, भारतीय नागरिकांच्या व्यापक स्थलांतरणासाठी भारतीय वायुसेनेची विमाने सज्ज आहेत.

प्रादेशिक प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून भारताची भूमिका

‘ऑपरेशन सागर बंधू’मुळे हिंद महासागर प्रदेशात, भारताने पुन्हा एकदा जलद आणि निर्णायक पावले उचलल्याचे दिसून येते. नेपाळमधील भूकंप असो, मालदीवमधील पाणी संकट असो, मोझांबिकमधील चक्रीवादळाची मदत असो किंवा तुर्कीमधील भूकंपानंतरचे सहाय्य असो, भारताने कायमच या प्रदेशातील मदत मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले आहे.

पंतप्रधान मोदींनी 2025 मध्ये घोषित केलेल्या ‘व्हिजन महासागर’ अंतर्गत, भारताने आपला प्रादेशिक सागरी आणि मानवतावादी दृष्टिकोन विस्तारित केला आहे, ज्यामुळे भारत ‘नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर’ आणि ‘ग्लोबल साउथ’साठी एक विश्वसनीय संकट-प्रतिसाद भागीदार म्हणून स्वतःचे स्थान बळकट करत आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleSolar Defence, CSIR–NAL Join Hands to Develop 150-kg Class Loitering Munition UAV
Next articleविस्तारित हवाई-भू समन्वयासह, भारत–ब्रिटनमधील लष्करी सराव संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here