इक्वेडोर, बोलिव्हिया, क्यूबासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचे भारताचे उद्दिष्ट

0

भारत सध्या लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (LAC) प्रदेशातील आपला सहभाग अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नात असून, यासंदर्भात 4 ते 10 नोव्हेंबर 2025 दरम्यान इक्वेडोर, बोलिव्हिया आणि क्यूबा या देशांसोबत अधिकृत भेटी होणार आहेत.

परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या भेटीमध्ये, व्यापार, तंत्रज्ञान, महत्त्वाची खनिजे आणि विकास भागीदारी या सर्व क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही भेट भारताच्या “दक्षिण–दक्षिण सहकार्य” (South–South Cooperation) धोरणातील वाढत्या उद्दिष्टांचे प्रतीक आहे. विकसनशील देशांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी आवश्यक नैसर्गिक संसाधनांमध्ये प्रवेश वाढवणे, हा या धोरणाचा उद्देश आहे.

इक्वेडोरमध्ये आयोजित चर्चांमध्ये व्यापार, गुंतवणूक, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला जाईल, तसेच क्विटो येथे भारतीय निवासी मिशन सुरू करण्याच्या तयारीला चालना दिली जाईल. इक्वेडोरला लाभलेला प्रशांत महासागराचा किनारा आणि ऊर्जा व तंत्रज्ञानातील त्याची क्षमता, यामुळे तो अँडियन प्रदेशातील भारताच्या विस्तारासाठी एक रणनीतिक भागीदार बनतो.

बोलिव्हियाच्या येथे होणाऱ्या भेटीत, 8 नोव्हेंबर, 2025 रोजी ला पाझ (La Paz) येथे नव्याने निवडून आलेल्या, बोलिव्हियाच्या बहुराष्ट्रीय राज्याच्या राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभात सहभाग घेतला जाईल. बोलिव्हियाकडे जगातील सर्वात मोठ्या लिथियम साठ्यांपैकी काही साठे आहेत, जे प्रामुख्याने सालार दे युयूनी या मीठाच्या विस्तीर्ण प्रदेशात आढळतात. अलीकडेच हा देश भारताच्या क्रिटिकल मिनरल्स मिशनमध्ये एक प्रमुख भागीदार म्हणून उदयास आला आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, यांच्या 2019 मधील बोलिव्हियाच्या भेटीदरम्यान, लिथियम आणि इतर खनिजांमधील सहकार्यासाठी दोन्ही देशांनी एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली होती, ज्यामुळे संसाधन विकासात सातत्यपूर्ण सहकार्याचा पाया रचला गेला. सध्या या द्विपक्षीय व्यापाराचे मूल्य सुमारे 120 ते 150 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असून, यामध्ये भारताकडून औषधे ऑटोमोबाईल आणि मशिनरीची निर्यात होते, तर खनिजे, सोने आणि कृषी उत्पादने आयात केली जातात.

बोलिव्हियाच्या MERCOSUR या प्रादेशिक व्यापार गटामध्ये (ज्यात आर्जेन्टिना, ब्राझील, पॅराग्वे आणि उरुग्वे यांचा समावेश आहे) पूर्ण सदस्यत्व मिळाल्यामुळे, भारताला प्रादेशिक बाजारपेठेतील प्रवेश आणि औद्योगिक भागीदारीसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत. भारतासाठी, या विकासामुळे दक्षिण अमेरिकेतील मूल्य साखळ्यांशी जोडले जाण्याच्या आणि खनिज प्रक्रिया व उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञान-आधारित सहकार्य पुरवण्याच्या संधी वाढल्या आहेत.

क्यूबामध्ये आयोजित चर्चेमध्ये औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान, आरोग्य, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि क्षमता बांधणी या क्षेत्रांमधील सहकार्य केंद्रस्थानी असेल. हा दौरा भारत-क्यूबा राजनैतिक संबंधांच्या 65व्या वर्धापन दिनी होत असून; दोन्ही देशातील भागीदारी मैत्री आणि सामायिक विकासाच्या प्राधान्यक्रमांवर आधारित आहे.

भारतातील क्यूबाचे राजदूत जुआन कार्लोस मार्सान यांनी सांगितले की, “दोन्ही देशांतील नेत्यांच्या अलीकडील देवाणघेवाणीनंतर होत असलेली ही भेट, परस्पर राजकीय संबंध अधिक दृढ करेल आणि फार्मा, जैवतंत्रज्ञान, आयुष (AYUSH), आयटी आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढीला चालना देईल.”

इक्वेडोर, बोलिव्हिया आणि क्यूबा हे तिनही देश, भारताच्या लॅटिन अमेरिकेतील सहभागाचे तीन मुख्य स्तंभ आहेत, जसे की- आर्थिक विविधता, महत्त्वाच्या खनिज क्षेत्रातील प्रवेश आणि विकास सहकार्य, जे ग्लोबल साउथ मधील प्रादेशिक भागीदारी मजबूत करण्याची नवी दिल्लीची इच्छा अधोरेखित करतात.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleIndia’s Defence Reforms Link Speed with Sovereignty
Next articleबांगलादेशमध्ये जनमतसर्वेक्षणाच्या प्रक्रियेला सुरूवात; लष्कर अधिक सतर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here