
दहशतवादविरोधी 14 व्या आसियन देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत (एडीएमएम) भारताने दहशतवादाविरूद्ध शून्य सहिष्णुता धोरणाप्रती आपल्या अतूट वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. मुख्य भाषण करताना संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी मजबूत देशांतर्गत चौकट, वाढीव गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि प्रादेशिक सहकार्य बळकट करण्यासाठी बहुआयामी धोरणाच्या गरजेवर भर दिला.
दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेच्या धोरणावर भारत ठाम आहे आणि मजबूत अंतर्गत यंत्रणा, सहयोगी गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि प्रादेशिक भागीदारीला बळकटी देणाऱ्या दृष्टिकोनाचे समर्थन करतो, असे सिंग म्हणाले.
प्रगत तंत्रज्ञान, सायबर साधने आणि मानवरहित प्रणालींमुळे धोके अधिकाधिक आंतरराष्ट्रीय आणि तीव्र स्वरूपाचे होत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांनी दहशतवादाचे विकसित स्वरूप अधोरेखित केले. भू-राजकीय आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता, विशेषतः आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि हिंसक अतिरेकीपणामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेश असुरक्षित आहे, यावर त्यांनी भर दिला. “यासाठी सर्वसमावेशक, अनुकूल आणि सखोल सहयोगात्मक प्रतिसादाची आवश्यकता आहे,” असे ते पुढे म्हणाले.
भारताने रशिया आणि म्यानमारकडून दहशतवादविरोधी एडीएमएम – प्लस ईडब्ल्यूजीचे अध्यक्षपद स्वीकारले असून मलेशिया तीन वर्षांसाठी सह-अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. संरक्षण सचिवांनी या कार्यकाळात व्यावहारिक आणि प्रभावी परिणाम देण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. “आपल्या सामूहिक कौशल्याचा लाभ घेऊन, क्षमता वाढवून आणि सखोल विश्वास तसेच सहकार्य वाढवून, आपण प्रादेशिक सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सज्जता लक्षणीयरीत्या वाढवू शकतो,” असे ते ठामपणे म्हणाले.
सिंग यांनी सध्याच्या ईडब्ल्यूजी चक्रासाठी प्रमुख प्राधान्यक्रमांची रूपरेषा आखली, ज्यात प्रादेशिक सहकार्य बळकट करणे आणि संरचित संयुक्त उपक्रमांद्वारे सशस्त्र दलांमध्ये आंतरसंचालनीयता सुधारणे समाविष्ट आहे. दहशतवादी गट, विशेषतः एआयचालित प्रचार, एन्क्रिप्टेड संप्रेषण आणि ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा प्रतिकार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ऑनलाईन कट्टरतावाद आणि भरती प्रयत्नांचा सामना करण्यासाठी सायबर लवचिकता बळकट करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आधारस्तंभ आणि Act East धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ म्हणून या संबंधांचे वर्णन करत, त्यांनी पुढे आसियनबरोबरच्या भारताच्या सखोल संबंधांवर प्रकाश टाकला. स्थिर आणि एकसंध आसियानसाठी भारताच्या भक्कम पाठिंब्याचा त्यांनी पुनरुच्चार केला, ज्याचे त्यांनी या प्रदेशासाठी संस्थात्मक आधार म्हणून वर्णन केले.
या बैठकीत ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पी. डी. आर., मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर आणि थायलंड या सर्व 10 आशियाई सदस्य देशांसह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, जपान, चीन, अमेरिका आणि रशिया या आठ संवाद भागीदारांचा सहभाग होता. याव्यतिरिक्त, तिमोर-लेस्टे आणि आसियन सचिवालयातील प्रतिनिधी उपस्थित होते.
टीम भारतशक्ती