श्रीलंकेच्या संरक्षण राज्यमंत्रांची माहिती, भारताबरोबर चर्चा सुरु
दि. १६मे: लष्करी सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असून, भारताने श्रीलंकेत छोट्या शस्त्रांचा उत्पादन प्रकल्प सुरु करावा यासाठी भारत सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु आहेत, अशी माहिती श्रीलंकेचे संरक्षण राज्यमंत्री प्रेमिथा बंदारा तेन्नाकून यांनी दिली आहे. भारताच्या संरक्षणमंत्राशी या विषयी चर्चा झाली असून, भारताकडून शिकण्याची आणि सहकार्याची संधी श्रीलंकेसाठी महत्त्वाची असल्याचे त्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत आणि श्रीलंकेदरम्यान संरक्षण सहकार्याबाबत मोठी संभावना असून, त्याच अंतर्गत श्रीलंकेत छोट्या शास्त्रांच्या उत्पादनाचा प्रकल्प उभारण्यात यावा, या बाबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. उभय देशांत संरक्षण सहकार्य वाढत आहे. त्यातही प्रामुख्याने संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाच्या क्षेत्रात भारताकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे उभय देशांत संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा सुरु आहे, असे तेन्नाकून यांनी स्पष्ट केले. श्रीलंकेसारख्या मित्रदेशांना संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यास आणि अत्याधुनिक संरक्षण सामग्री पुरविण्यास भारत इच्छुक आहे, असे भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त संतोष झा यांनी एप्रिल महिन्यात श्रीलंकेत झालेल्या संरक्षण विषयक परिषदेत म्हटले होते. त्यानंतर महिन्याभराने तेन्नाकून यांनी हे वक्तव्य केले आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच भारत आणि श्रीलंका संरक्षण क्षेत्रातही सहकार्य करीत आहेत. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राने अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाची उत्पादने निर्माण केली आहेत. भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहायाने उत्पादित केलेली ही शस्त्रे आणि प्रणाली श्रीलंकेच्या लष्कराला परवडणारी आहेत, असेही झा म्हणाले होते.
झा यांच्या वक्तव्याचा आभार घेत तेन्नाकून म्हणाले, की अशी सादरीकरणे सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. सध्या कोणाकडूनही काहीही खरेदी करण्याचा आमचा विचार नाही. मात्र सध्या आमच्यात चांगला संपर्क निर्माण झाला आहे. उभय देशांतील लष्करांतील संपर्कही उत्तम आहे. तो कायम राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा अर्थ आम्ही भारताकडून काही खरेदी करणार आहोत असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताचा संरक्षण उत्पादन उद्योग गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याच आधारावर श्रीलंकेतही संरक्षण उद्योग वाढविण्याचा विचार सुरु आहे. भारताकडून बरेच शिकण्यासारखे आहे. इतरांच्या अनुभवातून शिकण्यात काही गैर नाही आणि आपणही संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात उतरले पाहिजे असे मला वाटते, असे तेन्नाकून म्हणाले. श्रीलंकेच्या लष्कराकडे शस्त्रे बनविण्याचा अनुभव आणि नैपुण्य आहे. मात्र, हवे तितक्या प्रमाणात ते शक्य नाही. त्यामुळे भारताने श्रीलंकेत छोट्या शस्त्रांचा उत्पादन प्रकल्प सुरु करावा, असा आमचा आग्रह आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विनय चाटी
स्रोत: वृत्तसंस्था