लॅटिन अमेरिकेशी संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारताचे नवे पाऊल

0

भारताने व्यापार, तंत्रज्ञान, संस्कृती आणि विकास सहकार्य या क्षेत्रांतील भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने, अधिकृत भेटींद्वारे लॅटिन अमेरिकेशी आपले राजनैतिक आणि आर्थिक संबंध विस्तारण्यास सुरूवात केली आहे. परराष्ट्र आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गरिटा यांनी, 4 ते 10 नोव्हेंबरदरम्यान इक्वाडोर, बोलिव्हिया आणि क्यूबा या देशांचा दौरा केला. या दौऱ्याच्या माध्यमातून नवी दिल्लीने, साऊथ टू साऊथ सहकार्य आणि लॅटिन अमेरिका व कॅरिबियन (LAC) प्रदेशांशी व्यापक संबंध प्रस्थापित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनःपुष्टी केली.

इक्वाडोरमध्ये मार्गरिटा यांनी, क्विटो येथील भारतीय दूतावासाचे उद्घाटन केले, ज्यामुळे भारत–इक्वाडोर संबंधांच्या नव्या अध्यायाचा आरंभ झाला आणि या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवण्याचा भारताचा निर्धार अधोरेखित झाला. राष्ट्रपती डॅनिएल नोबोआ अझिन आणि परराष्ट्रमंत्री मारिया गॅब्रिएला सोमरफेल्ड रोजेरो यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी व्यापार, शेती, तंत्रज्ञान आणि डिजिटल नवोन्मेष या क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा केली. तसेच, भारताच्या ITEC कार्यक्रमांतर्गत क्षमतावृद्धी मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांच्या राजनैतिक प्रशिक्षण संस्थांदरम्यान एक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला, ज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्रशासन यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्याचाही समावेश आहे.

बोलिव्हियामध्ये मार्गरिटा यांनी, राष्ट्रपती रोड्रिगो पाझ यांच्या शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व केले, यानिमित्ताने बोलिव्हियाच्या विकास उद्दिष्टांसाठी भारताचा पाठिंबा पुन्हा अधोरेखित झाला. त्यांनी ला पाझ येथे भारतीय दूतावासाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही केले, यातून अँडियन प्रदेशाशी भारताचे वाढते सहकार्य आणि सक्रिय सहभाग स्पष्टपणे दिसून येतो.

क्यूबामध्ये मार्गरिटा यांनी, राष्ट्रपती मिगेल दिआझ-कॅनेल बर्म्युडेस आणि वरिष्ठ मंत्र्यांसोबत आरोग्य, पारंपरिक औषधोपचार, विज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांतील परस्पर सहकार्याबाबत चर्चा केली. या भेटीदरम्यान, दोन महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, ज्यापैकी एक- गुन्हेगारी विषयांवरील परस्पर कायदेशीर साहाय्य करार आणि दुसरा- सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमावरील प्रोटोकॉलसंबधी करार. या करारांमुळे सरकारी सहकार्य आणि सांस्कृतिक राजनैतिक संबंधांना बळकटी मिळाली. याशिवाय, चक्रीवादळ मेलिसामुळे झालेल्या नुकसानीनंतर, भारताने क्यूबाला 20 टन आपत्ती निवारण सहाय्य पुरवले, ज्यामध्ये वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि ‘आरोग्य मैत्री भीष्म क्यूब्स’ म्हणजे भारताच्या मानवीय उपक्रमांतर्गत विकसित केलेले ‘पोर्टेबल फील्ड हॉस्पिटल्स’ यांचा समावेश होता.

या दरम्यान, पूर्व विभागाचे सचिव पी. कुमारन यांनी 10 नोव्हेंबर रोजी, सॅंटियागो येथे चिलीच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सरचिटणीस राजदूत रोड्रिगो ऑल्सेन यांच्यासह भारत–चिली परराष्ट्र कार्यालयीन चर्चेच्या नवव्या फेरीचे सह-अध्यक्षस्थान भूषवले. या चर्चांदरम्यान, एप्रिल 2025 मध्ये चिलीचे राष्ट्रपती गॅब्रिएल बोरीक यांच्या भारत दौऱ्यानंतर झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांनी संपूर्ण आर्थिक भागीदारी करार (CEPA) लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला. तसेच, महत्त्वपूर्ण खनिजे, हरित ऊर्जा, शिक्षण, अवकाश संशोधन, पारंपरिक औषधोपचार आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींचाही यावेळी शोध घेण्यात आला. याशिवाय, व्यावसायिकांसाठी व्हिसा प्रक्रियेचे सुलभीकरण, तसेच सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे आणि इंडियन फार्माकोपियाला मान्यता देण्यासाठीच्या नव्या यंत्रणा तयार करण्याबाबतही चर्चा झाली.

कुमारन यांचा पराग्वे दौरा, लॅटिन अमेरिकेतील तुलनेने लहान पण धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या देशांशी भारताचे संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरला. या देशांशी वाढता संवाद आणि सहकार्य, हे समावेशक राजनैतिक आणि परस्पर विकासावर आधारित भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रतीक आहे.

या महिन्याच्या उत्तरार्धात, चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचलेट- शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार स्विकारण्याकरिता भारताचा दौरा करतील. या भेटीमुळे भारत–लॅटिन अमेरिका संबंधांची वाढते सामर्थ्य पुन्हा अधोरेखित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleLargest-Ever Tri-Service Exercise ‘Trishul 2025’ Concludes, Showcasing Integrated Combat Power
Next articleउदयोन्मुख तंत्रज्ञान आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत आहे: लष्करप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here