विस्तारित हवाई-भू समन्वयासह, भारत–ब्रिटनमधील लष्करी सराव संपन्न

0

युनायटेड किंगडम आणि भारताने ‘अजेय वॉरियर’ या लष्करी सरावाची आठवी आवृत्ती नुकतीच पूर्ण केली. भारत–ब्रिटनमधील सशस्त्र दलांची परस्पर कार्यक्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने हा द्विपक्षीय प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज्स येथे 17 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या या सरावात, A (अंबूर) कंपनी, 2nd बटालियन, रॉयल गुरखा रायफल्स आणि भारतीय लष्कराच्या 21 सिख रेजिमेंटच्या लष्करी तुकड्यांनी एकत्रित सहभाग नोंदवला.

हवाई दलाच्या सहभागासह बहु-क्षेत्रीय लक्ष

सरावाची या वर्षीची आवृत्ती, विस्तारित हवाई-भू समन्वयामुळे खास ठरली. ज्यामध्ये भारतीय हवाई दल, दोन्ही देशांच्या सैन्यांसोबत दिवसा आणि रात्री आयोजित केलेल्या विशेष हेलीबोर्न ऑपरेशन्समध्ये सहभागी झाले होते. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात आणि वातावरणात घेण्यात आलेल्या या मोहिमांमध्ये, समन्वित इन्सर्शन आणि एक्सट्रॅक्शन ड्रिल्सचा (प्रदेशात प्रवेश करण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या हालचालींचा) समावेश होता, ज्यातून जलद हालचाली आणि बहु-क्षेत्रीय ऑपरेशनल समन्वयावरील वाढत असलेला भर अधोरेखित झाला.

संरक्षण आस्थापनांमधील सूत्रांनुसार, हवाई दलाच्या संसाधनांचा समावेश केल्यामुळे सराव अधिक वास्तववादी झाला आणि विविध क्षेत्रांमध्ये संयुक्तपणे काम करण्याची भारत आणि यूकेची क्षमता स्पष्ट झाली.

शांतता प्रस्थापन आणि दहशतवादविरोधी सरावांमध्ये वाढलेली गुंतागुंत

गुंतागुंत वाढत जाण्याच्या प्रवाहाला पुढे नेत, ‘अजेय वॉरियर 2025’ मध्ये दहशतवादविरोधी वातावरणातील शांतता अंमलबजावणी मोहिमांवर लक्ष केंद्रीत केले गेले, जे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या अध्याय VII मधील तरतुदींशी सुसंगत आहे.

या प्रशिक्षणांतील विस्तृत कार्यांमध्ये: आयईडी (IED) विरोधी शोध आणि निष्क्रियीकरण, लहान मानवरहित हवाई प्रणालींचा (sUAS) वापर आणि तैनाती, कंपनी-स्तरीय युद्धाभ्यास आणि युद्ध कवायती, शहरी आणि निम-शहरी युद्ध, ज्यामध्ये रूम क्लीअरन्स आणि इमारतींवर हल्ला यांचा समावेश होता; आणि सहाय्यक शस्त्रांचा रणनैतिक वापर आदींचा समावेश होता.

या सत्रांचा समारोप, बॅटल ग्रुप-स्तरीय अंतिम कवायतीने झाला, ज्यामध्ये दोन्ही दलांनी एकाच, एकात्मिक कमांडखाली काम केले. जवानांनी संयुक्त नियोजन, समन्वित हालचाल आणि रिअल-टाइम निर्णय क्षमता यांचा सराव केला, ज्यामुळे दोन्ही बाजूंना एकमेकांच्या ऑपरेशनल सिद्धांतांची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

सौहार्द आणि सांस्कृतिक आदानप्रदान

लष्करी सरावाव्यतिरिक्त, या सरावात सांघिक कार्य आणि सांस्कृतिक समजूतदारपणा यावर भर देण्यात आला. कर्मचाऱ्यांनी फिटनेस चॅलेंजेस, सांघिक खेळ आणि अनौपचारिक संवादात भाग घेतला, ज्यामुळे दोन्ही तुकड्यांमधील बंध अधिक मजबूत झाले. संयुक्त मोहिमेदरम्यान विश्वास आणि अखंड सहकार्य निर्माण करण्यासाठी हा घटक आवश्यक असल्याचे कमांडर्सनी सांगितले.

यूकेच्या अधिकाऱ्यांकडून धोरणात्मक महत्त्वावर भर

भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त, लिंडी कॅमेरॉन, यांनी सांगितले की हा सराव ‘यूके-इंडिया व्हिजन 2035‘ शी जुळणाऱ्या सखोल भागीदारीचे प्रतिबिंब आहे.

त्यांनी नमूद केले की ‘अजेय वॉरियर’ हे दोन्ही राष्ट्रांचे “शांतता, स्थिरता आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेबाबतचे” सामायिक समर्पण दर्शवते आणि संरक्षण सहकार्य हा दीर्घकालीन रोडमॅपचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे त्यांनी जोडले.

भारतातील ब्रिटिश संरक्षण सल्लागार, कमोडोर ख्रिस सॉंडर्स म्हणाले की, “हा सराव विकसित होत असलेल्या सुरक्षा परिस्थितीमध्ये दोन्ही सैन्यांची जुळवून घेण्याची क्षमता दर्शवतो.”

त्यांनी दहशतवादविरोधी परिस्थितीच्या मागणीपूर्ण स्वरूपावर प्रकाश टाकला आणि रॉयल गुरखा रायफल्स तसेच 21व्या शीख रेजिमेंटच्या कामगिरीची प्रशंसा केली. सॉंडर्स यांनी पुढे सांगितले की ‘अजेय वॉरियर’ हा ‘कोकण’ सागरी सरावादरम्यान यूके कॅरियर स्ट्राइक ग्रुप आणि भारतीय नौदलातील अलीकडील सहभागावर आधारित आहे.

त्यांनी पुष्टी केली की, यूके २०२७ मध्ये पुढील आवृत्ती, ‘अजेय वॉरियर IX’ चे आयोजन करण्यास उत्सुक आहे.

व्यापक संरक्षण भागीदारीचा एक भाग

‘अजेय वॉरियर’ हा वेगाने विस्तारत असलेल्या यूके–भारत संरक्षण संबंधांतील एक घटक आहे. अलीकडेच, दोन्ही देशांनी 10 वर्षांच्या संरक्षण औद्योगिक रोडमॅपला मान्यता दिली असून, हा आराखडा सह-विकास, सह-उत्पादन आणि संरक्षण उद्योगांमध्ये अधिक सहकार्य वाढवण्यासाठी तयार केला गेला आहे.

यूके रॉयल मिलिटरी ॲकॅडमी सँडहर्स्ट आणि ब्रिटानिया रॉयल नेव्हल कॉलेज यांच्यासह अनेक प्रतिष्ठित लष्करी ॲकॅडमींमध्ये, भारतीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षक म्हणून स्वागत आणि आदरातिथ्य केले जात आहे, ज्यामुळे दीर्घकाळचे प्रशिक्षण आणि संस्थात्मक संबंध अधिक दृढ होत आहेत.

संयुक्त तयारीसाठी मजबूत पाया

या नवीन आवृत्तीच्या समारोपच्या पार्श्वभूमीवर, विश्लेषक म्हणतात की: ‘अजेय वॉरियर’ ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, की परस्पर-कार्यक्षमता वाढवण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि आधुनिक धोक्यांसाठी तयारी वाढवण्याकरिता हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleचक्रीवादळाने बाधित श्रीलंकेमध्ये भारताचे ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू
Next articleसोलार डिफेन्स आणि CSIR–NALची लोईटरिंग UAV प्रकल्पासाठी भागीदारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here