संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. सध्या दोन्ही देशांचा बंगालच्या उपसागरात युद्धनौका, विमाने, हेलिकॉप्टर्स आणि सैनिक यांचा सहभाग असलेला दोन आठवड्यांचा ‘टायगर ट्रायम्फ’ हा तीनही सेवा दलांचा एकत्रित सराव सुरू झाला आहे. दोन्ही मंत्र्यांनी विविध द्विपक्षीय, प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य मुद्द्यांवर चर्चा केली तसेच स्वतंत्र आणि मुक्त अशा इंडो-पॅसिफिक भागातील वचनबद्धतेवर जोर दिला.
“त्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारत युनायटेड स्टेट्स डिफेन्स ऍक्सलरेशन इकोसिस्टिम (इंडस- एक्स) शिखर परिषद आणि सोमवारपासून भारतात सुरू झालेला ‘टायगर ट्रम्फ’ हा ट्राय-सर्व्हिस सराव या द्विपक्षीय कार्यक्रमांचा आढावाही घेतला, असे संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्वीपत्रकात नमूद केले आहे.
हिंद महासागर क्षेत्रातील चाचेगिरीला लगाम घालण्यासाठी भारतीय नौदलाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे लॉईड यांनी कौतुक केले. भारत-अमेरिका संरक्षण सहकार्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करता येईल या विषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. भारतीय शिपयार्डमध्ये असलेल्या अमेरिकी नौदलाच्या जहाजांच्या दुरुस्तीसारख्या इतर संरक्षण उद्योग सहकार्याविषयीच्या मुद्यांवरही यावेळी थोडक्यात चर्चा झाली.
याआधी नवी दिल्ली येथे नोव्हेंबर 2023 मध्ये या दोघांनी मंत्रीस्तरीय संवाद साधला होता.
गेल्या जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान, उभय देशांनी तंत्रज्ञान सहकार्य आणि सहउत्पादनाला गती देण्याच्या आराखड्याला अंतिम रूप दिले. त्यानुसार प्राधान्यक्रमांमध्ये एअर कॉम्बॅट ॲण्ड सपोर्ट(एरो – इंजिनसह), आयएसआर (इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स,रेकॉर्नेन्सन्स) सिस्टीम्स, ग्राउंड मोबिलिटी सिस्टीम्स, अंडरसी डोमेन अवेअरनेस आणि लांब पल्ल्याच्या तोफांबरोबर इतर स्मार्ट शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. भारतातील तेजस मार्क – 2 लढाऊ विमानांसाठी जीई – एफ 414 जेट इंजिनांच्या सह – उत्पादनासाठी व्यावसायिक वाटाघाटी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
फेब्रुवारी 2024 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या भारत – अमेरिका संरक्षण प्रवेग परिसंस्था ( इंडस – एक्स ) शिखर परिषदेदरम्यान केल्या गेलेल्या घोषणांबद्दलही दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या डिफेन्स इनोव्हेशन युनिट (डीआययू) आणि भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (आयडीईएक्स) यांच्यातील भागीदारीमुळे अत्याधुनिक संरक्षणविषयक नवकल्पनांना चालना मिळाल्याचे मत सचिवांनी व्यक्त केले असे पेंटॉगॉनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
टायगर ट्रायम्फ 24 सराव
31 मार्चपर्यंत चालणाऱ्या टायगर ट्रायम्फ सरावादरम्यान, अमेरिकेकडून मरीन कॉर्प्स आणि लष्कराच्या सैनिकांना घेऊन युएसएस सॉमरसेटसारखी नौदल जहाजे यात सहभागी झाली आहेत. भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग विमानांसह सुसज्ज जहाजे, भारतीय लष्कराचे सैनिक आणि वाहने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यासह शीघ्र कृती वैद्यकीय पथक (आरएएमटी) देखील या सरावात सहभागी झाले आहे. यामध्ये तिन्ही सेनादलांचा सहभाग असून मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण हा (एचएडीआर) या सराव उपक्रमाच्या आयोजनामागील उद्देश असल्याचे भारतीय नौदलच्या निवेदनात म्हटले आहे.
रवि शंकर