मिग-21 ला भारतीय हवाई दल प्रमुखांकडून हटके निरोप

0
मिग-21
चार दशकांच्या सेवेनंतर आणि शेवटच्या 40 मिनिटांच्या उड्डाणानंतर, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी त्यांच्या स्वतःच्या अनोख्या शैलीत मिग-21 ला निरोप दिला. एकेकाळी भारतीय हवाई दलाचा कणा असलेले हे प्रतिष्ठित लढाऊ विमान 26 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहे, ज्यामुळे एका युगाचा अंत होणार आहे.

निवृत्तीपूर्वीचे ऐतिहासिक उड्डाण

मिग-21 ला हवाई दलाच्या प्रमुखांच्या कारकिर्दीत विशेष स्थान आहे कारण 1985 मध्ये तरुण पायलट म्हणून त्यांनी पहिल्यांदा याच विमानातून उड्डाण केले होते. त्यामुळे त्याच्या अधिकृत निवृत्तीच्या एक महिनाआधी, प्रतिकात्मक निरोप समारंभात, हवाई दल प्रमुख रिफ्रेशर प्रशिक्षणानंतर पुन्हा एकदा तेच जेट उडवत, नल एअरबेसवरून एकट्याने उड्डाण करून परतले. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी दुहेरी आसनक्षम असलेल्या विमानांचे ओरिएंटेशन होते, तर दुसऱ्या दिवशी 40 मिनिटांची अनेक एकल उड्डाणे घेतली गेली, ज्यापैकी एकाचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर प्रिया या महिला लढाऊ पायलटने केले.

उड्डाण करून झाल्यानंतर बोलताना, हवाई दल प्रमुखांनी सांगितले की, “मी जे उडवले आहे ते मिग-21 नेहमीच लक्षात राहील. हा एक प्रसिद्ध प्लॅटफॉर्म होता, परंतु नवीन तंत्रज्ञानाकडे वळण्याची वेळ आली आहे. त्याची देखभाल करणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे.” त्यांनी मिग-21 टप्प्याटप्प्याने रिटायर करण्याच्या निर्णयाला दुजोरा दिला. आता  त्याची जागा तेजस Mk 1A, तेजस Mk 2, राफेल आणि अद्ययावत सुखोई-30MKI लढाऊ विमाने घेणार आहेत.

मिग-21: सुपरसॉनिक मार्वलपासून फ्लाइंग लिजेन्डपर्यंत

1964 मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट झालेले मिग-21 हे भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते आणि सहा दशकांहून अधिक काळ राष्ट्रीय संरक्षणाचा एक महत्त्वाचा घटक होते. ही विमाने कामगिरीच्या बाबतीत शिखरावर असताना, IAF ने विविध प्रकारची सुमारे 1 हजार 200 मिग विमाने चालवली, ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर या प्रकारचा सर्वात मोठा ऑपरेटर बनला.

मात्र या विमानांचे मोठे योगदान असूनही, ही विमाने कायम वादग्रस्त राहिली- सतत होणाऱ्या अपघातांमुळे त्याला ‘फ्लाइंग कॉफिन’ हे दुर्दैवी टोपणनाव मिळाले. 1970 च्या दशकापासून 400 हून अधिक मिग अपघातांमध्ये अनेक वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तरीही, विमानाच्या कार्यान्वित क्षमतेवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नाही. त्याने त्याच्या शेवटच्या वर्षांपर्यंत महत्त्वाच्या कामगिऱ्यांमध्ये शौर्याने आपली भूमिका निभावणे सुरू ठेवले.

एक गौरवशाली लढाऊ वारसा

मिग-21 ने अनेक संघर्षांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

  • 1971चे युद्धः मिग-21 विमानांनी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी ठिकाणे उद्ध्वस्त केली. 14 डिसेंबर रोजी चार मिग विमानांनी ढाका येथील गव्हर्नर हाऊसवर बॉम्बहल्ला केला, ज्यामुळे युद्ध समाप्तीला गती मिळाली.
  • कारगिल संघर्ष (1999): या युद्धात एक मिग हरवले, तरी बाकी विमानांनी कारगिलमधील उंच ठिकाणाहून घुसखोरांना मागे हटवण्यास महत्त्त्वाची भूमिका निभावली.
  • बालाकोट हल्ला (2019): बालाकोटमध्ये भारताच्या हवाई हल्ल्यानंतर, मिग-21 बायसन जागतिक हेडलाईन्सचा विषय बनले होते, विंग कमांडर अभिनंदन वर्धमानने पाकिस्तानी F-16 विमान पाडले- हा एक अभूतपूर्व पराक्रम होता ज्यामुळे विमानाच्या लढाऊ वारशाला बळकटी मिळाली.

हवाई दल प्रमुखांसाठीचा वारसा

मिग-21 ने अनेक भारतीय हवाई दल प्रमुखांच्या कारकिर्दीला आकार दिला आहे. एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी सप्टेंबर 2019 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी दोन आसनी  मिग-21 मधून उड्डाण केले होते, ज्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन सह-वैमानिक होते. त्यांच्यानंतर हवाई दल प्रमुख बनलेले एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांनीही सप्टेंबर 2021 मध्ये मिग-21 विमानातून उड्डाण केले.

या प्रतीकात्मक उड्डाणांमुळे भारतीय हवाई दलाचे नेतृत्व आणि मिग-21मध्ये खोलवर रुजलेले त्यांचे नाते अधोरेखित होते, जे केवळ एक विमान नाही तर वैमानिकांच्या अनेक पिढ्यांसाठी एक संस्कार म्हणून ओळखले जाते.

22 नंबर स्क्वाड्रन आणि LCA तेजास

भारतीय हवाई दल पारंपरिक रेजिमेंटल प्रणालींचे पालन करत नसले तरी, हवाई दल प्रमुखांना अनेकदा क्रमांक 22 नंबर स्क्वॉड्रनचे चिन्ह परिधान केलेले दिसते – ही एक तुकडी होती जेव्हा ते मिग-27 विमान चालवत होते. या तुकडीचा इतिहास इतिहासात प्रसिद्ध आहे. कारण 1971 मध्ये बोयराच्या लढाईत तीन पाकिस्तानी साबर विमाने पाडण्याची कामगिरी या विमानांनी पार पाडली होती. ही एक दुर्मिळ घटना होती आणि म्हणूनच एकाच वेळी तीन वैमानिकांना त्यावेळी वीरचक्र देऊन गौरविण्यात आले होते.

LCA तेजस Mk1A च्या समावेशासह 22 नंबरचे स्क्वॉड्रन लवकरच पुनरुज्जीवित होईल अशी अपेक्षा वाढत असताना, हे स्क्वॉड्रन भविष्यातही त्याचा वारसा चालू ठेवेल.

अंतिम अभिवादन

26 सप्टेंबर 2025 रोजी चंदीगड येथे नियोजित अंतिम औपचारिक उड्डाणासह, मिग-21 बायसन आपले शेवटचे अभिवादन स्वीकारणार आहे. अर्थात त्याची वेळ संपली असली तरी मिग-21 ने वेग, शक्ती आणि लवचिकतेचा असा वारसा मागे सोडला आहे‌ जो भारतीय हवाई दलाच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे.

टीम भारतशक्ती 

+ posts
Previous articleस्टेल्थ फ्रिगेट्स INS उदयगिरी आणि INS हिमगिरी नौदलात दाखल होणार
Next article“If You Want Peace, Prepare for War”: CDS Inaugurates Ran Samwad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here