भारतीय वायुसेना (IAF) उत्तर-पूर्व भागात घेणार, सर्वात मोठा लष्करी सराव

0

भारतीय वायुसेना (IAF), देशाच्या उत्तर–पूर्व भागात 25 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान, आतापर्यंतचा आपला सर्वात मोठ्या लष्करी सराव आयोजित करणार आहे. हा उच्च तीव्रतेचा सराव, “ऑपरेशन सिंदूर”नंतर, चीन, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमेवर असलेल्या आणि धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये होणार आहे, जे सिलीगुडी कॉरिडॉरपासून ते चीन-म्यानमार सीमेपर्यंत पसरलेले आहेत.

या सरावात, उत्तर बंगाल (सिलीगुडी कॉरिडॉर), सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड हे महत्त्वाचे राज्य समाविष्ट असतील. यावेळी, लढाऊ विमानांमुळे निर्माण होणारे ध्वनिप्रतिध्वनी (sonic booms) संपूर्ण परिसरात ऐकू येतील, जे या कवायतींच्या व्याप्तीचा आणि गांभीर्याचा प्रत्यय देतील.

संवेदनशील वातावरणात लष्करी हालचाली

हा लष्करी सराव अशावेळी होत आहे, जेव्हा नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता वाढली असून, त्याचे भू-राजकीय महत्त्व भारतासाठी अधिकच वाढले आहे. नुकतेच, नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, जे चीनधार्जिण्या भूमिका आणि भारतविरोधी विधानांसाठी ओळखले जात होते, त्यांना Gen Z चळवळीच्या बंडामुळे राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की, यांनी लष्कराच्या समर्थनासह हंगामी सरकारच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

ओली यांच्या कारकिर्दीत, नेपाळने भारताविरुद्ध वाद निर्माण करणारा नकाशा जारी केला होता- ज्यामध्ये लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारतीय क्षेत्रांचा समावेश नेपाळच्या भूभागात दाखवला होता. या नकाश्याला अधिकृत मान्यता देत तो नवीन चलनावरही छापण्यात आला, ज्यामुळे भारत-नेपाळ संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला.

ही राजकीय अस्थिरता भारतासाठी सामरिक चिंतेचा विषय ठरली आहे. अशी भीती व्यक्त केली जात आहे की, चीन किंवा पाकिस्तानसारखे बाह्य घटक या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात, आणि त्यामुळे भारताची या भागातील लष्करी सज्जता अत्यावश्यक ठरते. वायूसेनेचा हा मोठा सराव केवळ शक्तिप्रदर्शन नसून, परिस्थितीवर योग्य प्रकारे उत्तर देण्याचा सुज्ञ लष्करी प्रयत्न आहे.

सप्टेंबरमधील दुसरा महत्त्वाचा हवाई सराव

या सरावाबरोबरच, वायुसेना 22 ते 30 सप्टेंबर दरम्यान आणखी एक मोठा हवाई सराव करत आहे, जो चीन–नेपाळ–उत्तराखंड त्रिसंधी (tri-junction) भागात — विशेषतः लिपुलेख आणि कालापानी या परिसरात होणार आहे. या सरावाचे अधिकृत तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत, परंतु यामध्ये लढाऊ विमाने, युक्तीपूर्ण हवाई हालचाली आणि उंचीवरील ऑपरेशन्स यांचा समावेश असल्याचे समजते. IAF च्या सेंट्रल कमांडमार्फत, बरेली एअर बेसवरून या सरावावर नजर ठेवली जाणार आहे.

हवाई क्षेत्र सूचना व नागरी विमानसेवा

या दोन्ही सरावांसाठी, वायूसेनेने Notice to Airmen (NOTAM) जारी केले आहेत. यामध्ये नागरी विमान कंपन्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला असून, सराव चालू असताना संबंधित हवाई क्षेत्र बंद किंवा मर्यादित ठेवले जाईल. त्यामुळे नागरी विमानचालकांना संभाव्य धोकादायक क्षेत्र टाळण्याची सूचना करण्यात आली आहे.

रणनीतीचे पुनर्मूल्यांकन

उत्तर–पूर्व आणि नेपाळ सीमेवर सलग हवाई सराव घेण्याचा वायुसेनेचा निर्णय, भारताच्या लष्करी धोरणांमध्ये सुरू असलेल्या रणनीतिक पुनर्रचनेचे स्पष्ट संकेत देतो. नेपाळ सध्या राजकीय संक्रमणातून जात असताना, भारत आपल्या सीमांवर पूर्ण सज्जता ठेवून संवेदनशील सीमेवर मजबूत लष्करी उपस्थिती निर्माण करत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articlePM Modi Reviews Defence Preparedness at Combined Commanders’ Conference
Next articleभारतीय नौदलामध्ये ‘INS Androth’ या दुसऱ्या ASW जहाजाचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here