भारतीय सैन्याची डेपसांगच्या मैदानी भागामध्ये पुन्हा गस्त सुरू

0
भारतीय
फाईल फोटो

दिवाळीमध्ये म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी पूर्व लडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये पुन्हा गस्त सुरू केल्यानंतर भारतीय लष्कराने सोमवारी डेपसांग भागातील एका केंद्रावर पहिली गस्त घातली. 21 ऑक्टोबर रोजी भारताने चीनशी सैन्य माघारीबाबत करार केल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनी भारतीय लष्कराची पूर्ण गस्त सुरू झाली आहे. डेपसांग आणि डेमचोक या दोन क्षेत्रांपैकी अधिक आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या डेपसांगमधील गस्त एप्रिल 2020 पूर्वी जशी होती त्याच पातळीवर पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. यामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या प्रदेशातील स्थिती सामान्य होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

“डेपसांग आणि डेमचोक येथील सैन्य मागे घेण्यासाठी आणि भारतीय सैन्याची गस्त पुन्हा सुरू करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये झालेल्या सहमतीनंतर, डेपसांगमधील एका केंद्रावर भारतीय लष्कराची गस्त आज यशस्वीरित्या पार पडली. एलएसीवर शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या दिशेने हे आणखी एक सकारात्मक पाऊल आहे,” असे लेह स्थित 14 कॉर्प्सने सोमवारी रात्री उशिरा ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

समन्वित गस्त पुन्हा सुरू झाल्याने डेपसांगमधील वाय-जंक्शन क्षेत्र, ज्याला ‘बॉटलनेक एरिया’ म्हणून ओळखले जाते, तिथे भारताची पाच प्रमुख गस्त केंद्रे- पीपी (पेट्रोलिंग पॉइंट) 10, पीपी 11, पीपी 11ए, पीपी 12 आणि पीपी13, तसेच डेमचोकमधील दोन ठिकाणी गस्त घालण्यासाठी प्रवेश करणे सोपे झाले. यापूर्वी एप्रिल-मे 2020 पासून चिनी सैन्याने भारतीय सैन्याला या ठिकाणी येण्यापासून अडवले होते.

भारतशक्तीने 1 नोव्हेंबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणीसाठीच्या करारानंतर – दोन्ही बाजूंचे तात्पुरत्या बांधकाम हटवणे आणि सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर – लगेचच पेट्रोलिंग पॉईंट्स 10 ते 13 ला भेट दिली आहे.

चिनी लष्कराची पीएलए देखील कोणत्याही संघर्षाची शक्यता टाळण्यासाठी भारताला आगाऊ माहिती देऊन अशाच प्रकारची गस्त घालत आहे. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या सामंजस्यानुसार समन्वित गस्त घालण्याआधी दुसऱ्या पक्षाला गस्त घालण्याची तारीख, वेळ आणि आकार याबद्दल आगाऊ माहिती देणे आवश्यक आहे. डेपसांगजवळील पेट्रोलिंग पॉईंट्स 10 ते 13 पर्यंत आणि वाय जंक्शन नावाच्या ठिकाणाच्या पलीकडे डेमचोकजवळील सीएनएन नावाच्या ठिकाणी गस्त घालण्याचा अधिकार पुनर्संचयित करण्याची भारताची प्राथमिक मागणी करारानुसार पूर्ण करण्यात आली आहे.

30 ऑक्टोबर रोजी भारतीय आणि चिनी सैन्याने दिवाळीच्या निमित्ताने पूर्व लडाखसह विविध सीमा बिंदूंवर मिठाईची देवाणघेवाण करण्याची परंपरा पुन्हा सुरू केली. सण आणि महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या निमित्ताने अशी प्रथा पाळली जात असल्यामुळे दोन्ही बाजूंचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) अनेक चौक्यांवर एकत्र आले.

देपसांग-डेमचोक करारानंतर, भारत आता सप्टेंबर 2022 पर्यंतच्या माघार घेण्याच्या करारांदरम्यान ज्या भागात ‘नो-पेट्रोल बफर झोन’ स्थापन करण्यात आले होते अशा भागात गस्त घालण्याचे आपले अधिकार पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे बफर झोन गलवान, पँगोंग त्सोचा उत्तर किनारा, कैलाश पर्वतरांग आणि गोगरा-हॉट स्प्रिंग्सच्या मोठ्या भागात तयार करण्यात आले होते. लक्षणीय बाब म्हणजे, यापैकी अनेक क्षेत्रे भारताच्या हद्दीत येतात.

रवी शंकर


Spread the love
Previous articleIndian Army Resumes Patrolling In Depsang Plains
Next articleकॅनडा मंदिर हल्ला : पोलीस निलंबित, हिंसाचारामुळे जयशंकर चिंतीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here