कारगिल युद्धाला यंदा 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून 24 एप्रिल रोजी लडाखमधील होम्बोटिंग ला येथे एका नवीन सेल्फी पॉइंटचे अनावरण करण्यात आले. भारतीय लष्कर आणि कारगिलचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला गेलेल्या या उपक्रमागे कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करणे हा हेतू आहे.
‘आय लव्ह इंडियन आर्मी’ या घोषवाक्यासह हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला असून या ठिकाणाहून कारगिल शहर आणि सर्वात जास्त पराक्रम जिथे दिसला ते बटालिक क्षेत्र सहजपणे नजरेत भरते. हे ठिकाण देशाच्या संरक्षणासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देते.
आपल्या सैनिकांच्या अदम्य साहसाला श्रद्धांजली अर्पण करणे आणि या प्रदेशात पर्यटन तसेच देशभक्तीला प्रोत्साहन देणे हे या सेल्फी पॉइंटच्या उभारणीमागचे उद्दिष्ट आहे.
कारगिलच्या विशाल अशा झांस्कार पर्वतरांगांमध्ये उभारण्यात आलेला हा सेल्फी पॉइंट भारतीय लष्कराच्या एकता आणि प्रशंसेचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून ओळखले जाईल.
#’KVDRajatJayanti’ हे शब्द झळकत असलेला हा ‘सेल्फी पॉइंट’ पर्यटकांना आपल्या सैनिकांच्या शौर्याबद्दल, बलिदानाबद्दल आदर व्यक्त करणारे क्षण टिपण्यासाठी आणि ते शेअर करण्यासाठी आकर्षित करणारा आहे. खडकाळ भूप्रदेशाचे विहंगम दृश्य आणि सभोवतालच्या प्रदेशाचे मनोहारी सौंदर्य यामुळे, हा सेल्फी पॉइंट पर्यटकांना या प्रदेशाच्या समृद्ध इतिहासात आणि नैसर्गिक वैभवात स्वतःला काही काळ रममाण होण्याची एक अनोखी संधी देतो.
कारगिल युद्धादरम्यान आपल्या सशस्त्र दलांनी दाखवलेल्या साहसाची आणि शौर्याची आठवण करून देणाऱ्या या सेल्फी पॉइंटच्या उद्घाटन सोहळ्यात अनेक दिग्गज, शालेय आणि महाविद्यालयीन मुले, नेते आणि धार्मिक समुदायांचे सदस्य उपस्थित होते.
आपल्या वीरांचा सन्मान करण्याव्यतिरिक्त, कारगिलमधील पर्यटनाला चालना देणे तसेच या प्रदेशाचा सांस्कृतिक वारसा आणि आदरातिथ्य यांचे दर्शन घडविणे हे देखील या सेल्फी पॉइंटचे उद्दिष्ट आहे.
मोक्याच्या जागी असलेले हे ठिकाण आणि आजूबाजूच्या विहंगम दृश्यांमुळे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच कारगिलच्या रहिवाशांमध्ये असणारी अभिमानाची भावना वाढवणारा हा सेल्फी पॉइंट देश – विदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे.
याआधी खल्त्से आणि हम्बोटिंग ला या ठिकाणी प्रत्येकी एक सेल्फी पॉइंट उभारण्यात आला असून भारतीय लष्कराने या महिन्यात बांधलेला हा तिसरा सेल्फी पॉइंट आहे.
1999 साली दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या संघर्षात, कारगिलमधील काही महत्त्वाच्या ठिकाणी कब्जा केलेल्या पाकिस्तानी घुसखोरांना मागे ढकलण्यात भारतीय लष्कराला यश आले आणि तिथल्या प्रदेशावर पुन्हा एकदा तिरंगा फडकला. 26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने जवळजवळ तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लढाईनंतर ‘ऑपरेशन विजय’ची यशस्वी सांगता केली.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)