भारतीय तटरक्षक दलाने केली 27 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका

0
Indian Coast Guard, Bangladeshi fishermen
भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाकडून बांगलादेशच्या बोटीवरील मच्छिमारांची सुटका केली गेली

भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) केलेल्या एका कारवाई अंतर्गत समुद्रात मासेमारी बोटीवर अडकलेल्या 27 बांगलादेशी मच्छिमारांची 4 एप्रिल रोजी सुटका केली. आयसीजीच्या म्हणण्यानुसार, भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेवर (आयएमबीएल) नियमित गस्त घालताना, आयसीजी जहाज अमोघला गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास सागर II नावाची बांगलादेशी मासेमारी बोट (बीएफबी) भारतीय जलक्षेत्रात बुडालेली दिसली. आयसीजी जहाजाकडून चौकशीसाठी एक पथक पाठवण्यात आले. त्यांनी केलेल्या चौकशीनुसार गेल्या दोन दिवसांपासून मच्छिमार बोटीचे स्टीयरिंग गियर खराब झाले होते, त्यामुळे बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि ती भारतीय जलक्षेत्रात घुसली. या बोटीवर 27 मच्छीमार होते.

भारतीय तटरक्षक दलाच्या टेक्निकल टीमने निर्माण झालेला दोष ओळखण्याचा आणि तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र बोटीचे सुकाणू पूर्णपणे खराब झाल्याचे आणि समुद्रात त्याची दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे आढळून आले. भारतीय तटरक्षक दल आणि बांगलादेश तटरक्षक दल यांच्यातील सामंजस्य करारानुसार आणि सागरी स्थिती तसेच हवामानाची परिस्थिती अनुकूल असल्याने संकटग्रस्त बोट भारत-बांगलादेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे ही बोट आयएमबीएलच्या पलीकडे कार्यरत असलेल्या दुसऱ्या बांगलादेशी मासेमारी बोटीकडे किंवा बांगलादेश तटरक्षक दलाच्याजहाजाकडे सुपूर्द केली जाईल, असे आयसीजीच्या निवेदनात म्हटले आहे.

कोलकाता येथील भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयाने गुरुवारी बांगलादेश तटरक्षक दलाला या घटनेची आणि त्यासंबंधीच्या कृती आराखड्याची माहिती देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. बांगलादेश तटरक्षक दलाने नादुरुस्त असलेली बांगलादेशी मासेमारी बोट घेऊन जाण्यासाठी त्वरित बीसीजीएस कमारुज्जमान हे त्यांचे जहाज तैनात केले. त्याच दिवशी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास बांगलादेश तटरक्षक दलाचे जहाज आयएमबीएलजवळ पोहोचले. यानंतर आयसीजीएस अमोघ यांनी सुटका केलेले 27 बांगलादेशी मच्छिमार आणि त्यांची बोट बी. सी. जी. जहाज कमारुझ्झमानकडे सुपूर्द केले.

आव्हानात्मक परिस्थितीत समुद्रातील जीवांची सुरक्षा करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे समर्पण त्यांच्या अलीकडील मोहिमेत सातत्याने दिसून येत आहे. अशा यशस्वी मोहिमा केवळ प्रादेशिक शोध आणि बचाव आराखड्यालाच बळकटी देत नाहीत तर शेजारील देशांशी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार्यालादेखील चालना देतात. याशिवाय ते भारतीय तटरक्षक दलाच्या “वयम् रक्षाम:” या बोधवाक्याशी सुसंगत आहे, ज्यातून जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी असणारी त्याची वचनबद्धता दिसून येते.

रवी शंकर

 

+ posts
Previous articleIndian Coast Guard Rescues 27 Bangladeshi Fishermen
Next articleIndia’s Defence Export: The Rocketing Numbers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here