दि. १० मे: सागरी दर्जाच्या ॲल्युमिनियमचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) हिंडाल्को इंडस्ट्रीज या खासगी क्षेत्रातील संस्थेबरोबर परस्पर सामंजस्याचा करार केला आहे. या करारामुळे भारतीय सार्वजनिक आणि खासगी जहाज बांधणी कंपन्यांना तटरक्षकदलाला जहाजांच्या बांधकामासाठी सागरी दर्जाच्या स्वदेशी ॲल्युमिनियमचे उत्पादन करून त्याचा पुरवठा करता येणार आहे. या सामंजस्य करारा अंतर्गत त्रैमासिक मूल्य आकारणी, पुरवठ्यासाठी प्राधान्य आणि एकूण उलाढालीवरील सवलत यांसारखे लाभही खासगी कंपन्यांना मिळतील.
भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सध्या उथळ पाण्यात काम करण्यासाठी सक्षम ‘ॲल्युमिनियम हल’ असलेली ६७ जहाजे आहेत. किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताफ्यामध्ये स्वदेशी बनावटीच्या सागरी दर्जाच्या ॲल्युमिनियमचा वापर करता येईल, अशी आणखी जहाजे समाविष्ट करण्याची योजना आखली आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे उपमहासंचालक (सामग्री आणि देखभाल) एच. के. शर्मा आणि हिंडाल्को डाउनस्ट्रीम ॲल्युमिनियम बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश कौल यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
विनय चाटी