‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ सौदी अरेबियातील भारतीय समुदायाची भावना

0
सौदी
22 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. (सौदी प्रेस एजन्सी/हँडआउट द्वारे रॉयटर्स ही प्रतिमा तृतीय पक्षाने पुरवली आहे.)
“मला आता भारतात माझ्या घरी परत जायचे आहे. पण हे माझे घर आहे जिथे मी पत्नी म्हणून आले होते, आता मात्र मी एकटीच परत जाणार आहे,” असे झीनत मुसरत जाफरी म्हणतात. त्यांनी गुलाबी रंगाचा अबाया परिधान केला असून 2017 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मिळालेला ‘भारतीय प्रवासी सन्मान’ त्या अभिमानाने दाखवतात.

 

 

आता सत्तरीच्या घरात असलेल्या जाफरी 1976 मध्ये नवविवाहित वधू म्हणून सौदी अरेबियात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा नवरा होता, जो त्यावेळी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत (DRDO) काम करत होता. जाफरींना तेव्हा कल्पनाही नव्हती की एके दिवशी त्यांना भारत आणि सौदी अरेबिया दोन्ही देशांकडून अनिवासी भारतीय  मुलांना उत्तम शिक्षण देण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल.

“1976 मध्ये, जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो तेव्हा सौदी अरेबिया हा पूर्णपणे वेगळा देश होता. आम्ही अशा देशातून आलो होतो जिथे मी एकटीच माझ्या कॉलेजला जायचे, मी माझ्या परिसरात एकटीच गाडी चालवायचे. पण जेव्हा मी इथे आले तेव्हा मला जाणवले की महिलांवर खूप बंधने आहेत. पण तरीही मी इथे शिक्षणाच्या क्षेत्रात काहीतरी करण्याचा दृढनिश्चय केला.”

“मी अमेरिकन शाळा, ब्रिटिश शाळा, फ्रेंच शाळा आणि इतर शाळा पाहायचे पण भारतीय शाळा नव्हत्या. आणि फी खूप जास्त असल्याने, बहुतेक तिथे राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या मुलांना मागे ठेवून येथे काम करायला भाग पाडले जात होते,” असे जाफरी यांनी रियाधमधील इंडियन गार्डन रेस्टॉरंटमध्ये चिकन सूप घेताना स्ट्रॅटन्यूजग्लोबलला सांगितले.

जाफरी यांनी रियाधमध्ये स्वतःची शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आणि 1982 मध्ये सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील दौऱ्यावर असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क साधून तेथील अधिकाऱ्यांशी बोलून शाळा उघडण्याची परवानगी मंजूर करून घेतली. अशा प्रकारे त्यांचा प्रवास सुरू झाला.

1982 मध्ये त्यांनी सौदी अरेबियात फक्त 20 विद्यार्थ्यांसह इंटरनॅशनल इंडियन स्कूल नावाची पहिली भारतीय शाळा सुरू केली ज्याची पटसंख्या आता बाराशे विद्यार्थ्यांपर्यंत वाढली असून सध्या ती रियाधमधील एक प्रसिद्ध सीबीएसई-संलग्न शाळा आहे.

“जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही काळजी घेत होतो की विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये बसतील. पंतप्रधान गांधींनी भारतीय दूतावासाला शक्य तितक्या मार्गाने मदत करण्याचे निर्देश देखील दिले. माझे शिक्षण जम्मू आणि काश्मीर विद्यापीठातून झाले. मी घरोघरी जाऊन भारतीय कुटुंबांना त्यांच्या मुलांना आमच्या शाळेत पाठवण्यास सांगितले,” असे त्या म्हणाली.

जाफरी यांना सौदीमध्ये येऊन आता लवकरच पाच दशके पूर्ण होणार आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षांत सौदी अरेबियामध्ये वेगाने बदल झाले आहेत, परंतु रियाधचे नवी दिल्लीशी असलेले द्विपक्षीय संबंधही वेगाने वाढले आहेत. “मला आनंद आहे की मी या प्रगतीत माझ्या पद्धतीने योगदान देऊ शकले,” असेही त्या म्हणाल्या.

रियाधमधील भारतीय डायस्पोराचे उपसंयोजक तालिब उर रहमान, जानेवारी 1983 मध्ये मक्काजवळील तैफ येथील किंग फहाद हवाई तळावर काम करण्यासाठी सौदी अरेबियाला आले. रहमान यांनी तेथे सात वर्षे काम केले आणि त्यानंतर ते रियाधला स्थलांतरित झाले.

“भारतीय असूनही त्यांनी अशा संवेदनशील क्षेत्रात काम करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला… त्यानंतर मी माझी स्वतःची कंपनी उघडली आणि तेव्हापासून मी सौदी अरेबियाला माझे घर मानतो, पण मी मनाने भारतीयच आहे. मी नेहमीच माझ्या कंपनीत भारतीयांना कामावर ठेवतो, जे बहुतेक सरकारी प्रकल्पांवर काम करतात. मला वाटते की भारतातून अधिकाधिक प्रतिभा आणणे हे माझे कर्तव्य आहे आणि मला हे करण्यासाठी सौदी सरकारचा पाठिंबा मिळतो,” असे रहमान म्हणाले, जे आता अल हादा ग्रुपचे उपव्यवस्थापकीय संचालक आहेत.

गेल्या 43 वर्षांपासून या देशात राहणारे रहमान आजही भारतीय नागरिक आहेत तर त्यांच्या मुलांना तिथले नागरिकत्व मिळाले आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेले रहमान यांचे जावई ‘प्रीमियर सिटीझनशिप’ मिळवू शकले आहेत ज्यामुळे त्यांना सामान्य सौदी नागरिकांसारखे समान अधिकार मिळाले आहेत.

“सौदी अरेबियामध्ये येणाऱ्या भारतीयांना जास्तीत जास्त फायदे दिले जातात. म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण या देशातच राहिले आहेत. सौदी लोक भारतीयांवर पूर्ण विश्वास ठेवतात. एक भारतीय म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही येथे स्वतःचा एक ठसा उमटवू शकलो आणि द्विपक्षीय संबंधांच्या वाढीमध्ये योगदान देऊ शकलो,” असे रहमान म्हणाले, जे एकटेच सौदी अरेबियात आले होते. नंतर त्यांनी आपल्या पत्नीला तिथे बोलावून घेतले. सौदीत असतानाच त्यांच्या पाचही मुलांचा जन्म झाला.

सौदी अरेबियातील भारतीय डायस्पोरा हा एक मोठा समुदाय आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे 2.75 दशलक्ष आहे, ज्यामुळे तिथे राहणाऱ्या भारतीयांचा समुदाय सर्वात मोठा आहे. व्यावसायिक सेवा, आयटी आणि इतर विविध क्षेत्रांद्वारे हा समुदाय सौदी अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान देतो, भारतीय सरकार आणि डायस्पोरा नेते त्यांना दोन्ही देशांमधील “जिवंत सेतू” म्हणून संबोधतात.

आज 65 वर्षीय नदीम तारिन 1980 च्या दशकात इंजिनिअर  म्हणून सौदी अरेबियाला आले. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले होते की ते अशा देशात जात आहेत जिथे खूप उष्ण आणि दमट वातावरण आहे. पण सौदी अरेबियात पोहोचल्यानंतर, तारिन यांना जाणवले की वाळवंटातील संध्याकाळ खूपच थंड असते. त्यामुळे सौदी अरेबियात आल्यानंतर तारिन यांनी पहिली खरेदी केली ती गरम कोटाची.

तारिन यांनी अलीगढ विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग केले. “मी भाग्यवान होतो की मला येथे नोकरी मिळाली. त्यावेळी नोकरी हातात असेल तरच या देशात प्रवेश दिला जायचा. तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. 1980 च्या दशकात, मग ते भारतात असो किंवा सौदी अरेबियात असो, आयुष्य खूप कठीण होते.

“अखेर मी माझी नोकरी सोडली आणि येथे माझी स्वतःची कंपनी उघडली. त्यासाठी आम्हाला सौदी सरकारने खूप पाठिंबा दिला आणि भारतीय दूतावासाचाही पाठिंबा होता. पण त्यावेळी सौदी समाज अत्यंत रूढीवादी होता आणि धार्मिकता खूप जास्त होती. भारतासारख्या देशांतून येणाऱ्या महिलांनाही कडक नियमांचे पालन करावे लागत असे. पण आता ते सर्व संपले आहे. “माझ्या पत्नीची स्वतःची शाळा आहे, आता येथे महिला गाडी चालवू शकतात, त्या व्यवसाय करू शकतात. आता हा एक वेगळा देश आहे,” असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

रियाध आणि जेद्दाह यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये भारतीय कुटुंबे निवासी संकुलांमध्ये राहतात. भारतीय मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी दूतावासाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा आहेत. मात्र उच्च शिक्षणासाठी विशेषतः वैद्यकीय क्षेत्रांसारख्या क्षेत्रांमध्ये अधिक संसाधने आणि पर्यायांची आवश्यकता असल्याबद्दल समुदायात चर्चा सुरू आहे.

सौदी अरेबियामध्ये आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न असलेल्या अनेक भारतीय शाळा आहेत. मात्र देशातील अभ्यासक्रमात अनिवार्य असलेले विषय म्हणजे सौदी अरेबियाचा इतिहास आणि अरबी भाषा.

‘सुरुवातीला सौदी अरेबियामध्ये फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी समर्पित स्वतंत्र शाळा असणे हा विचारही कठीण होता… परंतु आज, केवळ सौदी अरेबियाच नाही तर आखाती देशांमध्येही अनेक शाळा CBSE शी संलग्न आहेत,” असे रियाध येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या दारातस्सलम इंटरनॅशनलचे प्राचार्य मैराज मोहम्मद खान म्हणाले, जिथे 2 हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत.

“सौदी अरेबियातील शिक्षण मंत्रालय CBSE अभ्यासक्रमात हस्तक्षेप करत नाही म्हणून आम्हाला त्यात पूर्ण स्वातंत्र्य आहे. “अर्थात 2017 पासून सौदी समाज विचारांनी अधिक खुला झाल्यामुळे, शिक्षण क्षेत्रात आम्हाला दृश्यमान बदल दिसू लागला आहे. आम्ही आता अधिकाधिक महिला शिक्षिकांना नोकरी देतो आणि त्या उत्कृष्ट शिक्षिका ठरल्या आहेत,” असे ते म्हणाले.

नयनिमा बसू

+ posts
Previous articleस्वावलंबन 2025: नौदलाचा स्वदेशीकरणावर भर
Next articleविलंब, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांची जबाबदारी संरक्षण कंपन्यांनी घ्यावी – CDS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here