चेन्नई येथील ड्रोन उत्पादन स्टार्टअप गरुड एरोस्पेसने कॅनडाच्या लॉकहीड मार्टिन CDL सर्व्हिसेससोबत संरक्षण आणि व्यावसायिक कारणांसाठी अॅडव्हान्स अनक्र्यूड एरियल सिस्टम्स (UAS) सॉफ्टवेअर सोल्युशन्ससाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे.
या भागीदारी कराराचा भाग म्हणून ड्रोनशी संबंधित हार्डवेअर, गरुड एरोस्पेस देऊ करेल, तर लॉकहीड मार्टिन हे संरक्षण आणि व्यावसायिक हेतूंसाठी सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करेल. लॉकहीड मार्टिनने जारी केलेल्या निवेदनानुसार, या दोन्ही कंपन्या विस्तारित भागीदारीच्या संधींचा शोध घेण्यास वचनबद्ध आहेत. त्यामुळे एक मजबूत डेटा प्रोसेसिंग क्षमता तयार करण्यासाठी आणि संयुक्त अल्गोरिदम विकसित करण्यासाठी या कंपन्या एकत्रिच काम करणार आहेत. त्याच्या माध्यमातून संरक्षण, कृषी, खाणकाम, स्केल मॅपिंग आणि औद्योगिक तपासणी अशा मोठ्या क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या ड्रोन आणि विविध ड्रोन-आधारित सेवांची पूर्तता केली जाईल.
जी वाहने मनुष्यविरहित डेटा-संकलन मोहीम पार पाडू शकतात, त्यांना “अनक्रूड सिस्टम” असे संबोधले जाते. ही वाहने हवाई, जमिनीवरील किंवा सागरी असू शकतात. त्यामध्ये सेन्सर्स आणि कम्युनिकेशन्स सॉफ्टवेअर यासारखे संबंधित घटक देखील समाविष्ट असू शकतात. ड्रोन हे हवाई श्रेणीत येतात. म्हणून यासाठी अनक्र्यूड एरियल सिस्टम्स (UAS) सॉफ्टवेअर सोल्यूशन आवश्यक आहे.
“30 वर्षांहून अधिक काळ, आमच्या टीमने अमेरिकन मार्केटसाठी प्रगत सॉफ्टवेअर सोल्यूशन्स विकसित केले आहेत. ते तंत्रज्ञान आणि अनुभव गरुडच्या मेड-इन-इंडिया ड्रोनमध्ये आणण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. हे सहकार्य भारतातील स्वदेशी संरक्षण आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या वाढीला पाठिंबा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. भारतातील वैविध्यपूर्ण मार्केट सेगमेंटमध्ये जागतिक दर्जाचे ड्रोन सॉफ्टवेअर सोल्यूशन्स आणण्यासाठी आणि उच्च-तंत्रज्ञानाच्या नोकरीच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हे एक पुढे टाकलेले पाऊल असेल”, असे लॉकहीड मार्टिन कॅनडा CDL सिस्टम्सचे महाव्यवस्थापक मायकेल बेकर यांनी स्पष्ट केले.
गरुड एरोस्पेसचे संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मला लॉकहीड मार्टिन कॅनडा सीडीएल सिस्टम्ससोबत काम करताना आनंद होत आहे. ही भागीदारी गरुड एरोस्पेसला अनेक क्षेत्रांमधील उपलब्ध बाजारपेठेत आमचे स्थान मजबूत करण्यासाठी उपयोगी पडेल.”
“आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विविध 100 ठिकाणांहून 100 गरुड ड्रोन लाँच केल्यापासून तसेच एमएस धोनी आमचा ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यापासून, गरुड एरोस्पेसकडे विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन पोहोचवण्यासाठी प्रचंड विश्वासार्हता निर्माण करण्याबरोबरच एक जबरदस्त ऑर्डरचे बुकिंगही झाले आहे, आणि म्हणूनच लॉकहीड मार्टिनसारख्या जागतिक कंपनीने गरुडवर योग्य भागीदार म्हणून विश्वास ठेवला आहे”, असे निरीक्षण अग्निश्वर जयप्रकाश यांनी नोंदवले.
गरुड एरोस्पेसने अलीकडेच 250 दशलक्ष डॉलर्स मूल्यावर 30 दशलक्ष डॉलर्सची श्रेणी A फेरी सुरू केली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यात गुंतवणूक केली आहे आणि तो कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. गरुड एरोस्पेसने अत्यंत अभिमानाने 400 ड्रोनचा ताफा आणि 500हून अधिक वैमानिकांची प्रशिक्षित टीम 26 वेगवेगळ्या शहरांमध्ये तैनात केली आहे. गरुड एरोस्पेस हे भारतातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप आहे आणि लवकरच भारतातील पहिले ड्रोन युनिकॉर्न स्टार्टअपही होण्याची अपेक्षा आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)