दिवंगत कर्नल काळे यांना भारतीय दूतावासाने वाहिली श्रद्धांजली

0
दिवंगत
दिवंगत कर्नल वैभव अनिल काळे यांना श्रद्धांजली वाहताना (सौजन्य - इस्रायलमधील भारतीय दूतावास)

दिवंगत (निवृत्त) कर्नल वैभव अनिल काळे यांना इस्रायलमधील भारतीय दूतावासाच्या दोन अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. इस्रायली-हमास संघर्षादरम्यान कर्नल काळे यांचा गाझामध्ये मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव भारतात पाठवण्यात आले आहे. दूतावासातील अधिकाऱ्यांसोबत इस्रायली परराष्ट्र मंत्रालय, इस्रायली सुरक्षा दल तसेच संयुक्त राष्ट्रांच्या बचाव आणि सुरक्षा विभागाचे (यूएनडीएसएस) अधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करताना भारतीय दूतावासाने म्हटले की, “इस्रायली परराष्ट्र मंत्रालय, आयडीएफ आणि यूएनडीएसएसचे अधिकारी गाझामध्ये प्राण गमावलेल्या (निवृत्त) कर्नल  वैभव काळे यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण करताना. त्यांचे पार्थिव भारतात आणले जात आहे.”

दोन दिवसांपूर्वी गाझा पट्टीतील रफाह शहरातून खान युनूस शहराकडे संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातून जात असताना त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला. यात काळे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतर्फे जाहीर करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी काळे यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. गाझामधील संघर्षांत आतापर्यंत संयुक्त राष्ट्रांचे 190 कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, यांच्यापैकी फक्त वैभव काळे हेच विदेशी होते, बाकी सर्व इस्रायली किंवा पॅलेस्टिनी नागरिक होते.

काळे यांनी ‘11 जम्मू-काश्मीर रायफल्स’मधून विविध आघाड्यांवर बजावली होती. दोनच महिन्यांपूर्वी ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात रुजू झाले होते. कर्नल काळे एप्रिल २००४मध्ये भारतीय लष्करी सेवेत दाखल झाले होते. संयुक्त राष्ट्रांमध्ये सन २००९ ते २०१० दरम्यान त्यांनी सेवा बजावली होती. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्यांनी वर्तनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची पदवी मिळवली.

परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी एक निवेदन जारी केले. संयुक्त राष्ट्र आणि इस्रायलमधील भारतीय दूतावास (निवृत्त) कर्नल काळे यांचे पार्थिव भारतात पाठवण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रे तसेच तेल अवीव आणि रामल्ला येथील आमचा दूतावास काळे यांचे पार्थिव भारतात पाठवण्यात मोठी भूमिका बजावत आहेत. या घटनेच्या तपासाबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी (निवृत्त) कर्नल काळे यांच्या मृत्यूनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली. इस्रायलचा हल्ला निर्दयी असल्याचेही ते म्हणाले.

गीतकार जावेद अख्तर यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाज माध्यमावर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला. “रफाहमध्ये काम करणारे भारताचे निवृत्त कर्नल वैभव काळे यांचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला आहे. या घटनेवरून इस्रायलचे हल्ले किती निर्दयी आहेत, हे दिसून येते. या हल्ल्याबाबत इस्रायल कोणालाही उत्तरदायी नाही. मात्र इस्रायलने किमान भारताची माफी मागण्याचे सौजन्य दाखवायला हवे”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. याशिवाय कर्नल काळे यांच्या कुटुंबियांबाबत मी संवेदना व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

आराधना जोशी
(वृत्तसंस्था आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनातून)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here