संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) अंतर्गत चेन्नई येथील प्रयोगशाळा, लढाऊ वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (सीव्हीआरडीई) यांनी आयएलटीची संकल्पना, रचना आणि विकास केला आहे. भारतीय लष्कराच्या Provisional Staff Qualitative Requirements (पीएसक्यूआर) पूर्ण करण्यासाठी हा रणगाडा विकसित करण्यात आला असून, प्रकल्पाचे उद्योग भागीदार लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टीम्सद्वारे त्याची निर्मिती केली जात आहे.
Indian Light Tank has achieved a significant milestone by successfully test-firing at an altitude of over 4200m, demonstrating its accuracy and reliability. This feat showcased the tank’s capability to operate effectively in high-altitude areas, making it an asset for the… pic.twitter.com/eAMVrAsBqT
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) December 12, 2024
आयएलटी हे 25 टन वजनाचे चिलखती लढाऊ वाहन भारतीय सशस्त्र दलांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषतः अति उंचावरील मोहिमांसाठी तयार करण्यात आले आहे. हा प्रकल्प केवळ तीन वर्षांत आराखड्यापासून साकार होऊन प्रात्यक्षिकापर्यंत पुढे गेला आहे. संरक्षण तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रातील ही एक उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
याव्यतिरिक्त, भारतीय हवाई दलाने आयएलटीच्या एअरलिफ्ट क्षमतेचे प्रदर्शन केले. रस्ते किंवा रेल्वेने पोहोचता न येणाऱ्या दुर्गम आणि आव्हानात्मक प्रदेशांमध्ये त्याची जलद तैनाती कशी केली जाईल हेच यातून दर्शवण्यात आले. ही क्षमता जलद प्रतिसाद आणि अनुकूलता आवश्यक असलेल्या परिचालन परिस्थितीत रणगाड्याचे धोरणात्मक मूल्य अधोरेखित करते, असे संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतीय लष्कर आणि हवाई दल या दोघांकडून भक्कम पाठिंबा मिळालेल्या चाचण्यांमुळे अंतर्गत कामगिरीच्या मूल्यांकनाचे सुरुवातीचे दोन टप्पे पूर्ण झाले. सशस्त्र दलांद्वारे औपचारिक वापरकर्त्याच्या मूल्यांकनासाठी सादर करण्यापूर्वी आयएलटीच्या आता पुढील चाचण्यांचा टप्पा पार पडेल.
भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी या रणगाड्याचे महत्त्व अधोरेखित करत, उंचावरील यशस्वी चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि एल अँड टी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनीही या प्रकल्पातील त्यांच्या बांधिलकीबद्दल उद्योगातील भागीदार एल अँड टीसह संपूर्ण चमूच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
हा मैलाचा दगड स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि तांत्रिक स्वावलंबनाच्या दिशेने भारताच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे विविध आणि आव्हानात्मक वातावरणात भारतीय सशस्त्र दलांची परिचालन क्षमता बळकट होणार आहे.
टीम भारतशक्ती