चाळीस तास रंगले नाट्य: ३५ सोमाली चाचांची शरणागती
दि. १७ मार्च: भारतीय नौदलाने अरबी समुद्रात केलेल्या धाडसी कारवाईत सोमाली चाचांच्या तावडीतून सुमारे १७ ओलिसांची सुटका केली, तर ३५ सोमाली चाचांनी नौदालासमोर शरणागती पत्करली. सुमारे ४० तास हे थरारक नाट्य रंगले होते. या वेळी चाचांनी नौदलाच्या जहाजावर हल्ला चढविला, नौदलाने सोडलेले ड्रोनही पाडले, तसेच गोळीबारही करण्यात आला. मात्र, चाचांच्या प्रतिकाराला न जुमानता ही कारवाई करण्यात आली.
सोमाली चाचांनी गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी एमव्ही रुएन या मालवाहू व्यापारी जहाजाचे अपहरण करून त्या जहाजावरील १७ कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते. त्यांच्याकडून या जहाजाचा वापर समुद्रात इतर जहाजांवर छापेमारीसाठी करण्यात येत होता. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजे व कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण झाली होती. ती मोडून काढण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्नशील आहे. एमव्ही रुएन या अपहृत जहाजाबद्दल मिळालेल्या उपग्रह व गुप्तचर माहितीच्या आधारे नौदलाच्या आयएनएस कोलकाता या युद्धनौकेने १५ मार्च रोजी अरबी समुद्रात सुमारे २६०० किमीचा पल्ला पार करून या जहाजाला सोमालियाच्या किनाऱ्यापासून सुमारे २६० समुद्री मैल अंतरावर गाठले. या जहाजावर कब्जा मिळविलेल्या चाचांना नौदलाने शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, चाचांनी उद्दामपणे भारतीय नौदलाच्या जहाजावर हल्ला चढविला, तसेच गोळीबारही केला. नौदलाकडून सोडण्यात आलेले ड्रोनही चाचांनी पाडले. आयएनएस कोलकाताने त्यांना प्रत्युत्तर दिले व आंतरराष्ट्रीय सागरी नियमावलीला अनुसरून अपहृत जहाजाची नौकानयन यंत्रणा बंद पडली व जहाज रोखले, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.
ड्रोन, नौदल कमांडोजचा वापर
नौदलाने अपहृत जहाजाबरोबर संपर्क प्रस्थापित केल्यानंतर जहाजाला सोमालियाच्या किनारपट्टीपासून २६० समुद्रीमैल अंतरावर रोखले व चाचांना शरण येण्यास भाग पाडले. त्यामुळे अपहृत जहाज व त्यावरील मूळ कर्मचाऱ्यांची सुटका करणे शक्य झाले. भारतीय नौदलाने भारताच्या किनारपट्टीपासून सुमारे १४०० सागरी मैल (२६०० किमी) लांब असलेल्या ठिकाणी ही यशस्वी कारवाई केली. नौदलाचे या भागातील सामर्थ्य स्पष्ट झाले आहे. या भागामध्ये भारतीय नौदलाकडून सातत्याने चाचेगिरी विरोधातील गस्त सुरू आहे. नौदलाने ‘आयएनएस सुभद्रा’ या युद्धनौकेला १६ मार्चपासून या भागात तैनात करून नौदलाने या गस्तीत वाढ केली आहे.
अपहृत जहाजाला रोखल्यानंतर त्याच दिवशी नौदलाचे प्रहार कमांडोज सी-१७ या विमानातून खाली उतरवण्यात आले. ‘पी८आय’ या सागरी टेहेळणी करणाऱ्या विमानाच्या माध्यमातून या जहाजावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. सुमारे ४० तास ही कारवाई सुरू होती. त्यानंतर सर्व चाच्यांनी शरणागती पत्करली व मूळ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. या अपहृत जहाजाची सुटका केल्यानंतर ते समुद्री प्रवासाला योग्य आहे का, याचे परीक्षणही नौदलाकडून सुरू करण्यात आले. सुमारे ३७ हजार टन वजनाच्या या जहाजाची किंमत एक दशलक्ष डॉलर्स असल्याचे म्हटले जात आहे. हे जहाज नौदलाच्या पहाऱ्यात भारताकडे आणण्यात येत आहे. हिंदी महासागराच्या दक्षिणेला करण्यात आलेल्या या समुद्री चाचेगिरी विरोधातील कारवाईमुळे हिंदी महासागर क्षेत्रात व्यापारी जहाजांची सुरक्षा व चाचेगिरी विरोधात कारवाई करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे नौदलाच्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.
विनय चाटी