नौदलात पहिली महिला हेलिकॉप्टर ‘पायलट’ दाखल होणार

0
Indian Navy-Naval aviation:
नौदलातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट होण्याचा मान मिळविणाऱ्या सबलेफ्टनंट अनामिका बी राजीव यांना पदक प्रदान करताना नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर. (पीआयबी)

आयएनएस रजाली येथे ‘नेव्हल एव्हिएशन’चे दीक्षांत संचलन   

 

दि. ०९ जून: सशस्त्र सेनादलांतील महिलांच्या वाढत्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या ‘एव्हिएशन विंग’मध्ये प्रथमच एक महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून दाखल होणार आहे. नौदलातील सबलेफ्टनंट अनामिका बी राजीव यांनी ‘नेव्हल एव्हिएशन’च्या इतिहासात प्रथमच हा मान मिळविला. नौदल एव्हिएशनचा प्रशिक्षण तळ असलेल्या आयएनएस रजाली येथे झालेल्या दीक्षांत संचलनात सबलेफ्टनंट अनामिका यांना नौदलाच्या पूर्व विभाग मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

तमिळनाडू मधील अराक्कोनम येथील नौदल हवाई तळ  आयएनस रजाली येथे हेलिकॉप्टर रूपांतरण  अभ्यासक्रमाच्या १०२  व्या तुकडीचे पदवी पूर्ण झाल्यानिमित्त आणि बेसिक हेलिकॉप्टर रूपांतरण अभ्यासक्रमाच्या (बीएचसीसी) चौथ्या तुकडीचे पहिल्या टप्प्याचे  प्रशिक्षण पूर्ण झाल्यानिमित्त दीक्षांत संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. नौदलाच्या पूर्व विभाग मुख्यालयाचे प्रमुख (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या हस्ते ‘बेसिक हेलिकॉप्टर रूपांतरण’ अभ्यासक्रमामधील तीन अधिकाऱ्यांसह २१ अधिकाऱ्यांना प्रतिष्ठेच्या ‘गोल्डन विंग्स’ प्रदान करण्यात आल्या. त्याचबरोबर चौथ्या बेसिक रूपांतरण अभ्यासक्रमाच्या तीन अधिकाऱ्यांनी त्यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांनीही या दीक्षांत संचलनात सहभाग नोंदविला.

भारतीय नौदलात महिलांना मिळत असलेली समान वागणूक आणि करिअरच्या संधींचा विस्तार करण्याबद्दल असलेली  वचनबद्धता सबलेफ्टनंट अनामिका यांनी मिळविलेल्या यशातून सिद्ध होते. त्यांनी नौदलाच्या ‘एव्हिएशन विंग’मधील ‘पहिल्या महिला नौदल हेलिकॉप्टर पायलट’ म्हणून पदवीधर बनत इतिहास रचला आहे, असे व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांनी या वेळी नमूद केले. लडाख या केंद्रशासित प्रदेशातील पहिले नौदल अधिकारी लेफ्टनंट जामयांग त्सेवांग यांनीही हेलिकॉप्टर पायलट म्हणून यशस्वीरित्या पदवी प्राप्त केली. प्रशिक्षणार्थी पायलटसाठी फ्लाईंग ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थी पायलटला दिला जाणारा दक्षिण विभाग नौदल प्रमुखांचा फिरता चषक लेफ्टनंट गुरकिरत राजपूत यांना प्रदान करण्यात आला. मूलभूत  विषयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थीला दिले जाणारे सब लेफ्टनंट कुंटे मेमोरियल बुक पारितोषिक लेफ्टनंट नितीन शरण चतुर्वेदी यांना प्रदान करण्यात आले. तर, एकूण  गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थीला दिला जाणारा केरळच्या राज्यपालांचा फिरता चषक  लेफ्टनंट दीपक गुप्ता यांना प्रदान करण्यात आला.

भारतीय नौदलाचा समृद्ध वारसा सांगणाऱ्या आणि पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या हेलिकॉप्टर प्रशिक्षण संस्थेने भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल तसेच, मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या राष्ट्रांच्या ८४९ वैमानिकांना आत्तापर्यंत प्रशिक्षण दिले आहे.

विनय चाटी

(पीआयबी ‘इनपुट्स’सह)


Spread the love
Previous articleव्हिएतनामकडून चीनला जशास तसे उत्तर
Next articleमालदीवचे परराष्ट्रमंत्री म्हणतात भारत नेहमीच आमचा जवळचा सहकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here