प्रादेशिक सागरी सुरक्षेसाठी अद्ययावत IFC-IOR सुविधेचे अनावरण

0

हिंदी महासागरात सहयोगी सागरी प्रयत्न वाढविण्याच्या दृष्टीने  सुरू असणाऱ्या व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून गुरुग्राम येथील माहिती संयोग केंद्र-हिंद महासागर क्षेत्र (IFC-IOR) येथे आधुनिक पायाभूत सुविधांचे काल उद्घाटन करण्यात आले.

 

या कार्यक्रमात बोलताना नौदलाचे उप प्रमुख व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती यांनी या प्रदेशातील वाढत्या सागरी आव्हानांवर भाष्य केले आणि हिंद महासागरात शांतता तसेच स्थैर्य राखण्यासाठी मजबूत भागीदारी आणि संयुक्त प्रयत्नांची असणारी निकड यावर भर दिला.

डिसेंबर 2018 मध्ये स्थापन झालेले IFC – IOR हे माहितीची देवाणघेवाण आणि सागरी सहकार्याचे मध्यवर्ती केंद्र म्हणून सातत्याने विकसित होत आहे. हे केंद्र भागीदार देशांच्या आंतरराष्ट्रीय संपर्क अधिकाऱ्यांचे (ILO) यजमानपद भूषवते, ज्यामुळे महत्त्वपूर्ण सागरी माहितीची प्रत्यक्ष-वेळेची देवाणघेवाण शक्य होते. सागरी चोरी, तस्करी, बेकायदेशीर मासेमारी आणि अनियमित स्थलांतर यासारख्या धोक्यांना प्रतिसाद देण्यासाठी हे सहयोगी प्रयत्न महत्त्वाचे आहेत, ज्याचा महत्त्वपूर्ण सागरी मार्गांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत आहे.

नव्याने अनावरण करण्यात आलेली ही सुविधा IORA आणि DCoC/JA सारख्या संस्थांसह 26 भागीदार देश आणि प्रादेशिक गटातील संपर्क अधिकाऱ्यांना सामावून घेण्यासाठी सुसज्ज आहे. अद्ययावत पायाभूत सुविधांमुळे समन्वय सुव्यवस्थित होणे आणि प्रदेशातील परिचालन प्रतिसादांचा वेग मिळून त्यांची कार्यक्षमता सुधारणे अपेक्षित आहे.

मंत्र (MANTRA-Maritime Analytics Tool for Regional Awareness) नावाच्या नवीन विश्लेषणात्मक सुविधेचा शुभारंभ हे उद्घाटनाचे प्रमुख आकर्षण होते. व्यावसायिक सागरी वाहतुकीचा मागोवा घेण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या मंत्रामुळे देखरेख क्षमता आणि एकूण सागरी क्षेत्र जागरूकता लक्षणीयरीत्या वाढेल.

IFC-IOR ची विस्तारित क्षमता भारताच्या प्रादेशिक सागरी दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. हा दृष्टीकोन म्हणजे परस्पर सुरक्षा, विकास आणि विश्वासासाठी सहकार्य. हे केंद्र आता 50 हून अधिक सागरी रचना आणि सुमारे 30 देशांशी संलग्न आहे, जे सुरक्षित, निर्धोक आणि आर्थिकदृष्ट्या चैतन्यशील हिंद महासागर प्रदेशाच्या सामायिक दृष्टीकोनात योगदान देत आहे.

तेल, मोठ्या प्रमाणात मालवाहतूक आणि कंटेनर वाहतुकीचा मोठा वाटा हाताळणारा हिंद महासागर हा जागतिक स्तरावर सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांपैकी एक आहे. त्यामुळे या धोरणात्मक महत्त्वामुळे तो अनेक प्रकारच्या धोक्यांना देखील बळी पडू शकतो. त्यामुळे, मुक्त आणि सुरक्षित सागरी दळणवळण मार्ग राखण्यासाठी IFC-IOR सारख्या सहयोगी संरचना आवश्यक आहेत.

भारतीय नौदल, अशा उपक्रमांद्वारे, सीमा ओलांडणाऱ्या सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक पारदर्शकता, सामायिक जबाबदारी आणि प्रादेशिक एकजुटीचे समर्थन करत आहे.

या कार्यक्रमाला वरिष्ठ लष्करी अधिकारी, राजनैतिक अधिकारी आणि धोरणात्मक मंत्रालये तसेच आंतरराष्ट्रीय संरक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleटॅरिफ वाढीमुळे अमेरिकेसोबतचा P-8I विमान करार स्थगित
Next articleBRICS पाश्चिमात्यांच्या विरोधात नाही, पण ट्रम्प BRICS च्या विरोधात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here