कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या उद्योगपतीची हत्या, बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

0

लॉरेन्स बिश्नोई गँगने, सोमवारी कॅनडाच्या अ‍ॅबॉट्सफोर्ड येथे झालेल्या भारतीय वंशाच्या उद्योगपतीची हत्या आणि एका पंजाबी गायकाच्या घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली असून, बिश्नोई गँगचा हिंसाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा मुख्य हस्तक- जगदीप सिंग ऊर्फ जग्गा, जो अमेरिकेतून कार्यरत असल्याचा संशय होता, त्याला राजस्थान पोलिसांनी अटक केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी या टोळीने कॅनडामध्ये पुन्हा एकदा दोन हिंसक गुन्हे करत, सर्वांचे लक्ष वेधले.

उद्योगपतीची गोळ्या घालून हत्या

सोशल मीडियावरील एका धक्कादायक पोस्टमध्ये, बिश्नोई टोळीतील सदस्य गोल्डी ढिल्लन याने अ‍ॅबॉट्सफोर्ड शहरातील, 68 वर्षीय भारतीय वंशाचे उद्योगपती दर्शन सिंग साहसी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली.

ढिल्लन याने व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, “दर्शन हे अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतले होते आणि टोळीने मागणी केलेली रक्कम ते देऊ शकले नाहीत, ज्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली.”

सोमवारी सकाळी, त्यांना त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून ठार करण्यात आले. प्राथमिक तपासातून असे दिसून येते की, हल्लेखोर त्यांच्या घराशेजारी पार्क केलेल्या गाडीजवळ त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता. दर्शन गाडीत बसताच हल्लेखोराने गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा दर्शन गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र अखेरीस त्यांचा मृत्यू झाला.

गोळीबारानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील तीन शाळांमध्ये “शेल्टर-इन-प्लेस” नियमांनुसार, लॉकडाऊन लागू करण्यात आला होते. सुदैवाने, या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही.

स्थलांतरितापासून – उद्योगपतीपर्यंतचा प्रवास

दर्शन सिंग साहसी, हे कॅनॅम इंटरनॅशनल या सुप्रसिद्ध टेक्सटाईल रिसायकलिंग कंपनीचे अध्यक्ष होते. ते 1991 मध्ये कॅनडाला स्थलांतरित झाले आणि सुरुवातीला त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली. त्यानंतर त्यांनी, डबघाईला आलेल्या कॅनॅम कंपनीत एक हिस्सा विकत घेतला आणि टप्याटप्याने तिला यशाच्या शिखरावर पोहचवले.

व्यवसायातील यशाव्यतिरिक्त, दर्शन यांनी केलेल्या परोपकारी कार्याबद्दल पंजाबी समाजात त्यांच्याविषयी आदर होता.

त्यांच्या हत्येमुळे कॅनडातील भारतीय वंशाच्या रहिवाशांमध्ये शोक आणि संताप व्यक्त होत आहे. भारतीय स्थलांतरितांच्या सुरक्षेसाठी हे गंभीर आव्हान असल्याचे म्हणत, सामुदायिक नेत्यांनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार

बिश्नोई टोळीशी संबंधित आणखी एका घटना समोर आली आहे. पंजाबी गायक चन्नी नट्टन यांच्या निवासस्थानाबाहेर टोळीकडून गोळीबार करण्यात आला.

टोळीचा सदस्य ढिल्लन याने सोशल मीडियावर दावा केला की, ‘नट्टन यांच्या गायक सरदार खेरा यांच्यासोबतच्या वाढत्या संबंधांमुळे हा हल्ला करण्यात आला.’

‘नट्टन यांच्यासोबत बिश्नोई टोळीचे वैयक्तिक शत्रूत्व नाही, परंतु खेरा यांच्यासोबत संबंध वाढवणाऱ्या कोणत्याही कलाकाराला त्याचे परिणाम भोगावे लागतील’ असा इशारा, ढिल्लन याने यावेळी दिला.

बिश्नोई टोळीचे नेटवर्क

कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या, लॉरेन्स बिश्नोई टोळीचे खूप मोठे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचे मानले जाते, ज्यात 700 हून अधिक हस्तक आणि शूटर्सचा समावेश आहे. 

या टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई, हा 2014 पासून भारतीय कोठडीत आहे आणि त्याच्यावर खंडणी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि हत्या यांसारखे अनेक गुन्हेगारी आरोप आहेत.

पंजाबी रॅपर आणि राजकारणी सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येसह, बॉलिवूड अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्या आणि खलिस्तानी गटांसोबत असलेले कथित संबंध, यांसह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये या टोळीचे नाव समोर आले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleLockheed Martin’s 11th India Suppliers Conference to Focus on Self-Reliance
Next articleलॉकहीड मार्टिनची 11वी ‘इंडिया सप्लायर्स परिषद’, आत्मनिर्भरतेवर केंद्रित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here