भारताचे तंत्रज्ञान क्षेत्र विकासासाठी सज्जः संरक्षणमंत्री

0
भारताचे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मंडी येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना संरक्षणमंत्री सिंह

भारताचे तंत्रज्ञान क्षेत्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून पुढील पाच वर्षांत ते 1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असा आशावाद भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना संरक्षणमंत्री सिंह यांनी व्यक्त केला. त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या वेगवान डिजिटल आणि तांत्रिक प्रगतीवर प्रकाश टाकला तसेच तरुण नवसंशोधकांना जागतिक नवोन्मेष आणि उद्योजकता याकडे वळण्याचे आवाहन केले.

1. 25 लाखांहून अधिक स्टार्ट-अप्स आणि 110 युनिकॉर्नसह भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था म्हणून उदयाला आला आहे. सतत विकसित होत असलेल्या तांत्रिक परिदृश्यामध्ये तरुणांनी अनुकूलतेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याच्या गरजेवर सिंह यांनी भर दिला.

कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञानातील देशाच्या वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना “झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि नवीन तंत्रज्ञान तयार करणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. केवळ अडॅप्टर होऊ नका; नवनिर्मितीचे नेतृत्व करणारे व्हा,”  अशी त्यांनी टिप्पणी केली.

राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासात आयआयटी मंडीच्या भूमिकेचे महत्त्व संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले. संरक्षण संशोधन आणि विकास संघटने (डीआरडीओ) सोबत संस्थेच्या सध्याच्या सहकार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले आणि एआयचालित युद्ध, स्वदेशी एआय चिप विकास, सायबर सुरक्षा आणि क्वांटम तंत्रज्ञानामध्ये आणखी योगदान देण्याचे आवाहन केले.

“भारताने दारूगोळा उत्पादनात 88 टक्के स्वयंपूर्णता प्राप्त केली आहे आणि 2023-24 मध्ये संरक्षण निर्यात अंदाजे 23 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 2029 पर्यंत संरक्षण निर्यातीत 50 हजार कोटी रुपयांचे लक्ष्य साध्य करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे सिंह म्हणाले. यामुळे एक मजबूत, स्वावलंबी संरक्षण उद्योग उभारण्यासाठी सरकारची वचनबद्धता बळकट होते.

देशाचे दूरसंचार क्षेत्र आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचे नमूद करून सिंह यांनी भारताच्या डिजिटल परिवर्तनावरही प्रकाश टाकला. यूपीआयसारख्या उपक्रमांच्या यशाचा हवाला देत, भारत डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक मापदंड कसे प्रस्थापित करत आहे यावर त्यांनी भर दिला.

भारताची डिजिटल परिसंस्था आणि तांत्रिक कौशल्य बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहन करत ते म्हणाले, “आपण अतुलनीय डिजिटल क्रांतीच्या मध्यावर आहोत.”

Initiate, Improve, and Transform (आयआयटी) या तत्त्वांचे पालन करून 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची आकांक्षा बाळगण्याचे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले. तंत्रज्ञान आणि नाविन्याच्या माध्यमातून राष्ट्रीय आव्हानांवर मात करण्यासाठी लवचिकता, धाडसी विचार आणि सहयोगात्मक प्रयत्नांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी तसेच भारताच्या तांत्रिक आणि आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करत ते म्हणाले, “हा ‘भारतीय स्वप्नाचा’ काळ आहे-एक असा काळ जेव्हा आपल्या आकांक्षा आणि कामगिरी जागतिक परिदृश्याला पुन्हा परिभाषित करू शकतात.”

टीम भारतशक्ती


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here