भारत-इंडोनेशिया संयुक्त विशेष सैन्याचा सराव जो ‘गरुड शक्ती’ नावाने ओळखला जातो त्याची 9 वी आवृत्ती इंडोनेशियातील सिजान्टुंग येथील मोकोपासस येथे सुरू झाली आहे. या सरावाचा उद्देश जंगलातील प्रदेशात विशेष दलांच्या मोहिमांसाठीचे नियोजन आणि विविध कामगिऱ्यांसाठी डावपेचातील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे हा आहे. सहभागी सैन्य अनेक सामरिक कवायतींमध्ये गुंतले आहे.
भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस) तुकडी करत आहे तर इंडोनेशियन स्पेशल फोर्सेस कोअरच्या 40 जवानांचा समावेश असलेल्या तुकडी द्वारे इंडोनेशियन तुकडीचे प्रतिनिधित्व केले जात आहे.
दोन्ही देशांना एकमेकांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे, दोन्ही सैन्याच्या विशेष दलांमधील परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे गरुड शक्ती 24 या सरावाचे उद्दिष्ट आहे. या सरावाची रचना द्विपक्षीय लष्करी सहकार्य विकसित करण्यासाठी तसेच चर्चेद्वारे आणि सामरिक लष्करी कवायतींच्या तालीमद्वारे दोन सैन्यांमधील संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
या सरावामध्ये विशेष मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी, सैन्याच्या विशेष दलांची कौशल्ये विकसित करण्यासाठी अभिमुखता, शस्त्रे, उपकरणे, नवोन्मेष, डावपेच, तंत्र आणि कार्यपद्धती यावरील माहितीचे आदान-प्रदान यांचा समावेश आहे. संयुक्त सराव गरुड शक्ती 24 मध्ये जंगलाच्या प्रदेशात विशेष सैन्य दलाच्या मोहिमांचा संयुक्त सराव करणे, दहशतवादी तळांवर हल्ले करणे आणि लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या जीवनशैली आणि संस्कृतीची अंतर्दृष्टी प्राप्त करण्याव्यतिरिक्त मूलभूत आणि आधुनिक विशेष सैन्य कौशल्ये समाविष्ट करणारा प्रमाणीकरण सराव यांचाही समावेश आहे.
या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्य दलांना त्यांचे परस्पर संबंध मजबूत करण्याची आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची संधी मिळत असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. सामायिक सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि दोन मैत्रीपूर्ण राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील हा सराव काम करत आहे.
गरुड शक्ती हा इंडोनेशिया आणि भारत यांच्यात आयोजित केला जाणारा सर्वात मोठा वार्षिक लष्करी सराव आहे. दरवर्षी, दोन्ही देश आलटून पालटून या सरावाचे आयोजन करतात. पहिला गरुड शक्ती सराव 2012 मध्ये इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आला होता. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात दीर्घकालीन आणि मजबूत संरक्षण संबंध आहेत. प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेला चालना देण्यात दोन्ही देशांचे परस्पर हितसंबंध आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
टीम भारतशक्ती