‘कमांड कंट्रोल अँड कंपॅटीबिलिटी बोर्ड’ची बैठक माणेकशॉ सेंटरमध्ये संपन्न
दि. ०८ जून: भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षण सहकार्याबाबतच्या संभावना शोधणे, हे सहकार्य मजबूत करीत उभयपक्षी संरक्षण सहकार्याच्या क्षेत्रात यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘कमांड कंट्रोल अँड कंपॅटीबिलिटी बोर्ड’ची बैठक माणेकशॉ सेंटरमध्ये संपन्न झाली. उभय लष्करांत नेतृत्त्व व नियंत्रण सुसंगतता निर्माण करण्याचे प्रयत्न करणे, हा या बैठकीचा उद्देश होता, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
भारताचे वाढते लष्करी महत्त्व आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील भूमिका लक्षात घेता भारत आणि अमेरिकेच्या लष्करांत नियंत्रण सुसंगतता निर्माण करण्यासाठी उभय देशांत सप्टेंबर २०१८मध्ये ‘कम्युनिकेशन कंपॅटीबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट’ (कॉमकासा) हा ऐतिहासिक द्विपक्षीय करार करण्यात आला होता. या करारातील कलम ११ नुसार ‘कमांड कंट्रोल अँड कंपॅटीबिलिटी बोर्ड’ या तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश असलेल्या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. वर्षातून दोन वेळा या मंडळाची बैठक होते. उभय देशांतील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या मंडळाची ही सातवी बैठक होती. या बैठकीला अमेरिकेकडून २९ जणांचे प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे कार्यकारी संचालक पॉल निकोल्सन यांनी अमेरिकी प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्त्व केले, तर भारताच्या ३८ जणांच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्त्व एकत्रित सेना मुख्यालयातील ब्रिगेडीअर राहुल आनंद यांनी केले.
दोन्ही देशांदरम्यानच्या मंडळाची ही बैठक चार दिवस आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही बाजूंच्या संरक्षण विषयक तज्ज्ञांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. उभय लष्करांत आंतरपरीचालन आणि परिचालन विषयक संवाद वाढविणे आणि समजून घेणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे भारतीय सशस्त्र दले आणि अमेरिकी सैन्याच्या दरम्यान आवश्यक असलेल्या संवाद विषयक अडचणी समजून घेण्यात आणि विद्यमान गरजा ओळखण्यात ही चर्चा उपयुक्त ठरली. या चर्चेचे यशस्वी आयोजन भारत आणि अमेरिकी सैन्यादरम्यानच्या वाढत्या संबंधांचे फलित असल्याचे मानले जात आहे.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)