आर्थिक आणि धोरणात्मक काळजीमुळे इंडोनेशियाच्या रुपियात मोठी घसरण

0
इंडोनेशियाच्या

अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी आपल्या पुतण्याची बँक इंडोनेशियाच्या गव्हर्नर्स बोर्डवर नियुक्ती केल्यानंतर, मध्यवर्ती बँकेच्या स्वातंत्र्याबद्दल गुंतवणुकदारांमध्ये वाढलेल्या चिंतेने मंगळवारी इंडोनेशियाचा रुपिया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला.

या आठवड्यात मध्यवर्ती बँकेच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी, मंगळवारी रुपिया (IDR) प्रति अमेरिकन डॉलर 16,985 पर्यंत घसरला. विश्लेषकांना अपेक्षा आहे की बँक इंडोनेशिया (BI) व्याजदरांमध्ये कोणताही बदल करणार नाही. 2025 मध्ये 3.5 टक्के घसरल्यानंतर, जानेवारीमध्ये या चलनात जवळपास 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.

अध्यक्षीय प्रवक्ते प्रासेत्यो हादी यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, प्रबोवो यांचे पुतणे, थॉमस जिवांडोनो, जे सध्या उप-अर्थमंत्री आहेत, हे संसदेकडे नावे सादर केलेल्या तीन नामांकित व्यक्तींपैकी एक आहेत.

मध्यवर्ती बँकेच्या स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित

गुंतवणूकदारांना अशी भीती वाटत आहे की, आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील स्वतंत्र चलनविषयक धोरणनिर्मितीवर दबाव येऊ शकतो, कारण प्रबोवो यांनी 2029 पर्यंत आर्थिक वाढीचे लक्ष्य सध्याच्या सुमारे 5 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवले आहे.

“थॉमस तिथे जात असल्यामुळे (मध्यवर्ती बँकेचे) स्वातंत्र्य संपुष्टात आले आहे, अशी अटकळ बांधली गेली असेल. मी याच्याशी असहमत आहे,” असे अर्थमंत्री पुरबाया युधी सादेवा यांनी सोमवारी सांगितले.

“जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की तसे नाही, तेव्हा (रुपिया) मजबूत होईल,” असे ते म्हणाले. तसेच, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी त्यांचे मंत्रालय आणि बीआय (इंडोनेशियाची मध्यवर्ती बँक) राजकोषीय आणि चलनविषयक धोरणांमध्ये समन्वय साधतील, असेही त्यांनी सांगितले.

वित्तीय दबाव

परदेशी गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये अंदाजे 6.4 अब्ज डॉलर्स किमतीचे इंडोनेशियन सरकारी रोखे विकले, ज्यामुळे चलनावरील दबाव वाढला, तसेच इंडोनेशियाच्या वाढत्या वित्तीय तुटीबद्दलच्या चिंतांमुळेही बाजारातील भावनांवर परिणाम झाला.

जीडीपीच्या 2.92 टक्के असलेली 2025 ची अर्थसंकल्पीय तूट, महामारीच्या वर्षांव्यतिरिक्त, किमान दोन दशकांमधील सर्वात मोठी होती आणि जीडीपीच्या 3 टक्क्क्यांच्या वैधानिक मर्यादेच्या जवळ होती.

ग्रास हॉपर ॲसेट मॅनेजमेंटचे पोर्टफोलिओ व्यवस्थापक डॅनियल टॅन म्हणाले की, मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्ततेबद्दलच्या चिंतांमुळे सततच्या वित्तीय तुटीच्या समस्यांमध्ये भर पडल्याने रुपिया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे.

“इंडोनेशियाच्या अर्थसंकल्पीय तुटीची मर्यादा वाढवली जाऊ शकते, या आधीच असलेल्या चिंतांमध्ये प्रबोवो यांच्या पुतण्याच्या नामांकनामुळे भर पडली. या ताज्या नियुक्तीमुळे बीआयच्या (इंडोनेशियाची मध्यवर्ती बँक) स्वातंत्र्याबद्दल अधिक शंका निर्माण झाल्या आहेत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleप्रजासत्ताक दिनी नौदलाच्या चित्ररथात दिसणार सागरी वारसा, स्वदेशी युद्धनौका
Next articleअमेरिकेने चिप्सवर टॅरिफ लावल्यास किमती वाढतील: दक्षिण कोरियाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here