देशाची 32 वर्षे गौरवशाली सेवा केल्यानंतर भारतीय नौदलाची निशंक आणि अक्षय ही जहाजे शुक्रवारी (3 जून 2022) सेवानिवृत्त झाली. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे पारंपरिक समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. राष्ट्रीय ध्वज, नौदलाचे चिन्ह आणि दोन्ही जहाजांचे पेनंट सूर्यास्ताच्या वेळी खाली उतरवण्यात आले.
आयएनएस निशंक 12 सप्टेंबर 1989 रोजी कार्यान्वित झाली होती, तर त्यानंतर एका वर्षानंतर 10 डिसेंबर 1990 रोजी आयएनएस अक्षय ही युद्धनौका पोटी, जॉर्जिया येथे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय ही जहाजे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या ऑपरेशनल नियंत्रणाखाली अनुक्रमे 22 मिसाईल व्हेसल स्क्वाड्रन आणि 23 पॅट्रोल व्हेसल स्क्वाड्रनचा भाग होते.
32 वर्षांहून अधिक काळ नौदल सेवेत त्या सक्रिय होत्या आणि त्यांच्या गौरवशाली प्रवासादरम्यान कारगिल युद्धाच्या काळात ऑपरेशन तलवार आणि 2001मध्ये ऑपरेशन पराक्रम यासह नौदलाच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.
नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार हे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे होते. व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि व्हाईस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ईस्टर्न नेव्हल कमांड या समारंभासाठी उपस्थित होते. आयएनएस अक्षय आणि आयएनएस निशंकचे पहिले कमांडिंग अधिकारी व्हाइस ॲडमिरल आरके पटनायक (निवृत्त) आणि व्हाईस ॲडमिरल एसपीएस चीमा (निवृत्त) या कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे होते.
(संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकावर आधारित हा लेख आहे)
– प्रमुख पाहुणे, नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी मानवंदना स्वीकारली
– दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी खाली उतरवण्यात आले
-आयएनएस निशंकची लहान प्रतिकृती अंतिम कमांडिंग ऑफिसर सीडीआर हिमांशू कपिल यांनी प्रथम कमांडिंग ऑफिसर व्हीएडीएम एसपीएस चीमा (सेवानिवृत्त) यांना नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली