इस्रायलशी सहकार्य करणे आणि इराणच्या सुरक्षा व्यवस्थेविरुद्ध कारवाया करण्यासाठी नियोजन केल्याबद्दल 12 लोकांना अटक केल्याचे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने सांगितले. “गाझा आणि लेबनॉनच्या लोकांविरुद्धच्या दुष्ट उद्दिष्टांमध्ये झायोनिस्ट शासन (इस्रायल) आणि त्यांचे पाश्चिमात्य समर्थक, विशेषतः अमेरिका यशस्वी होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ते आता आपल्या देशाच्या सुरक्षेविरुद्ध नियोजित कृतींच्या माध्यमातून इराणमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.
लेबनॉनस्थित हिजबुल्ला दहशतवादी गटाचे सदस्य वापरत असलेल्या हजारो पेजर आणि वॉकी-टॉकीज यांचा स्फोट झाल्यापासून मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. हे स्फोट घडवून आणण्यात इस्रायलचा हात होता असा आरोप करण्यात आला आहे. जवळजवळ वर्षभर चाललेल्या गाझा युद्धाच्या समांतर सुरू असलेल्या हिजबुल्ला आणि इस्रायल संघर्षात सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याचे प्रकार बघायला मिळाले आहेत.
या 12 सदस्यांना सहा वेगवेगळ्या इराणी प्रांतांमध्ये अटक करण्यात आल्याचे रिव्होल्यूशनरी गार्ड्सने सांगितले असले तरी ही अटक नेमकी कधी झाली आहे याचा कोणताही तपशील त्यांनी दिलेला नाही.
जुलैच्या उत्तरार्धात, पॅलेस्टिनी इस्लामी गट हमासचा राजकीय नेता इस्माईल हनियेह याची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली. या हत्येमागे इस्रायल असल्याचा आरोप इराणच्या अधिकाऱ्यांनी केला होता. इस्रायलने मात्र या हत्येची जबाबदारी अद्यापही स्वीकारलेली नाही.
गेल्या आठवड्यात लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या सदस्य वापरत असलेल्या हजारो पेजर आणि वॉकी-टॉकीज् यांचा स्फोट झाल्यानंतर सर्व सदस्यांनी कोणत्याही प्रकारची संभाषण उपकरणे वापरायची नाहीत असे आदेश इराणच्या एलिट रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने (आयआरजीसी) जारी केल्याचे इराणच्या दोन वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले.
एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, आयआरजीसीद्वारे केवळ दळणवळणाचीच नाही तर सर्व प्रकारच्या उपकरणांची तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापैकी बहुतांश उपकरणे एकतर घरगुती आहेत किंवा चीन आणि रशियातून आयात केलेली आहेत.
इस्रायली एजंट्सच्या घुसखोरीबद्दल इराणला मोठी चिंता आहे, यात इस्रायलच्या पगारावर काम करणाऱ्या इराणी लोकांचाही समावेश आहे. त्यामुळे आयआरजीसीच्या मध्यम आणि उच्च दर्जाच्या सदस्यांना लक्ष्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी आधीच सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे त्याने आपले नाव सांगण्यास नकार दिला.
टीम भारतशक्ती