मंगळवारी मेहर वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराण देशाच्या उत्तरेकडील भागात लष्करी कवायती करत आहे. गेल्या महिन्यात तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हनियेह याची हत्या करण्यात आली. त्यानंतर इराणने इस्रायलविरुद्ध लवकरच याचा बदला घेऊ अशी धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर कारवाईसाठी ही सज्जता केली जात आहे. कॅस्पियन समुद्रावरील इराणच्या गिलान प्रांतात मंगळवारी संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत (1600 ते 1700 जीएमटी) हा सराव सुरू होता. एका स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने मेहरने सांगितले की, नौदलाच्या संरक्षणात्मक सज्जतेला चालना देण्याच्या उद्देशाने याची रचना करण्यात आली होती.
तीन दिवसांत इराणचा हा दुसरा लष्करी सराव आहे. तेहरानमध्ये 31 जुलै रोजी हनियेहच्या हत्येनंतर इराणने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. इराणने या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार धरले. इस्रायलने हनियेहच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हत्येमुळे गाझामध्ये हमासच्या अतिरेक्यांशी लढणाऱ्या इस्रायलविरुद्ध इराणने कारवाई करण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणात युद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे.
इराण आणि इस्रायलने मध्य पूर्वेतील संघर्ष वाढवू नये, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आधीच केले आहे. तर दुसरीकडे या प्रदेशात आपल्या सैन्याविरूद्धचे हल्ले सहन करणार नाही असा इशारा पेंटागॉनने दिला आहे. दहशतवादी गट हमास आणि हिजबुल्लाहच्या वरिष्ठ सदस्यांच्या हत्येनंतर इराण आणि त्याचे सहयोगी देश यांच्याकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य हल्ल्यांसाठी मध्य पूर्वेतील देश युद्धाची तयारी करत आहे.
मध्यपूर्वेत अमेरिकेकडून अतिरिक्त लढाऊ विमाने आणि नौदलाची युद्धनौका तैनात केली जाईल असे पेंटागॉनने म्हटले आहे. अमेरिका या प्रदेशातील संरक्षण बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे.
या सगळ्या घडामोडी अशा वेळी घडत आहेत जेव्हा पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने मध्यस्थांना गाझा युद्धबंदी करारासाठी नवीन वाटाघाटी करण्याऐवजी मागील चर्चेवर आधारित योजना सादर करण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे उद्या मध्यस्थांनी बोलावलेल्या बैठकीत दहशतवादी संघटना सहभागी होतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या नेत्यांनी इस्रायल आणि हमासला 15 ऑगस्ट रोजी कैरो किंवा दोहा येथे गाझा युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेच्या संदर्भातील कराराला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने वाटाघाटी करायला भेटण्याचे आवाहन केले होते.
टीम भारतशक्ती