लढाऊ तुकड्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सैनिकांची सुट्टी रद्द करण्यात आल्याचे इस्रायली सरकारने जाहीर केले. शेजारच्या देशांकडून (इराण) सोडण्यात येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करण्यासाठी जीपीएसही जाम केले आहे.
सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासाच्या इमारतीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात एका वरिष्ठ जनरलसह 13 लोक ठार झाल्यामुळे इराणसोबतचा तणाव वाढला आहे. इस्रायली सरकारने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हवाई संरक्षण तुकड्यांना बळकटी मिळावी यासाठी राखीव सैनिकांना बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पुढच्याच दिवशी सैनिकांची रजा रद्द केल्याची सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.
इराणकडून यावरची प्रतिक्रिया म्हणून लवकरच आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इस्रायलमधील अधिकाऱ्यांना विश्वास आहे.
गाइडेड मिसाईल्सना रोखण्यासाठी जीपीएस जाम करण्यात आले आहेत. मात्र त्यामुळे तेल अवीव आणि जेरुसलेमसारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकेशन बेस ॲप सेवा वापरू शकत नसल्याच्या तक्रारी तेल अवीवमधील नागरिकांनी केल्या आहेत.
माध्यांशी बोलताना आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडएम डॅनियल हगरी म्हणाले की देश जीपीएस ब्लॉकिंग वापरत आहे आणि रहिवाशांना ॲपवर त्यांचे स्थान मॅन्युअली सेट करण्याचे आवाहन केले जात आहे ज्यामुळे येणाऱ्या रॉकेट हल्ल्यांबाबतचे अलर्ट जारी करणे तुलनेने सोपे होईल.
लेबनॉनच्या सीमेजवळील उत्तर इस्रायलमध्ये जीपीएस सेवा आधीच विस्कळीत झाली आहे, या ठिकाणी इस्रायल आणि इराण समर्थित गट हिजबुल्ला यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून जवळजवळ दररोज गोळीबार होत आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना ठार मारणाऱ्या या हल्ल्याचा बदला लवकरच घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.
“दुष्ट झायोनिस्ट राजवटीला आपल्या शूर माणसांच्या हातून शिक्षा केली जाईल. आम्ही त्यांना या गुन्ह्याचा आणि इतर गुन्ह्यांचा पश्चाताप करायला लावू “, असे खोमेनी यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे.
या हल्ल्यात ठार झालेल्या 13 लोकांमध्ये इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या सात अधिकाऱ्यांचा समावेश होता, ज्यात वरिष्ठ जनरल मोहम्मद रेझा झाहेदी आणि त्यांचे डेप्युटी होते.
विश्लेषकांच्या मते यामुळे इराणी सैन्याने इराक आणि सीरियामध्ये त्यांचे प्रॉक्सी सोडल्यामुळे या प्रदेशात लक्षणीय हिंसाचार वाढू शकतो.
पिनाकी चक्रवर्ती