हिजबुल्लाह तळ लक्ष्य करत बैरूतच्या उपनगरांवर इस्रायलचा बॉम्बहल्ला

0

इस्रायलने गुरुवारी रात्री उशिरा बैरूतच्या दक्षिण उपनगरावर हवाई हल्ले केले. हिज्बुल्लाहच्या ड्रोन उत्पादन केंद्राला लक्ष्य करत हे हल्ले करण्यात आले. यामुळे बकरी ईद या मुस्लिम सणाच्या पूर्वसंध्येला लेबनॉनच्या राजधानीतून हजारो नागरिक पळून गेले.

लेबनॉनच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की इस्रायल युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत आहे कारण बैरूतच्या दक्षिण उपनगरात – दहियेह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण भागात – किमान 10 हल्ले झाले. इस्रायली सैन्याने परिसरातील चार ठिकाणांवर स्थलांतराचे इशारे दिल्यानंतर सुमारे 90 मिनिटांनी हा बॉम्बस्फोट झाला.

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामानंतर इस्रायल आणि इराण समर्थित लेबनीज सशस्त्र चळवळ हिज्बुल्लाह यांच्यात वर्षभर चाललेले युद्ध संपल्यानंतर दहियेहवर बॉम्बहल्ला होण्याची ही चौथी वेळ होती.

युद्धबंदीमध्ये म्हटले आहे की हिज्बुल्लाहने दक्षिण लेबनॉनमधून सर्व लष्करी साधनसामुग्री आणि सैनिक बाहेर काढले पाहिजेत आणि देशभरातील सर्व दहशतवादी गटांना नि:शस्त्र केले पाहिजे.

इस्रायली लष्कराने गुरुवारी सांगितले की ते दहियेहमधील “नागरी लोकसंख्येच्या मध्यभागी जाणूनबुजून स्थापन करण्यात आलेल्या भूमिगत यूएव्ही उत्पादन पायाभूत सुविधांच्या ठिकाणी” हल्ला करण्याची योजना आखत आहेत.

इस्रायलचे लक्ष्य ड्रोन उत्पादन

इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार हिजबुल्लाह त्या ठिकाणी हजारो ड्रोन तयार करत आहे, त्यामागे इराणी दहशतवाद्यांचे आदेश आणि निधी समाविष्ट” आहे.

हिजबुल्लाहने या आधी अनेकदा  नागरी भागात लष्करी पायाभूत सुविधा ठेवण्याच्या आरोपांना नकार दिला आहे, परंतु यावेळी हिजबुल्लाहकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

लेबनॉनच्या एका सुरक्षा सूत्राने रॉयटर्सला सांगितले की लेबनीज सैन्याला गुरुवारी दहियाहमधील एका भागात लष्करी उपकरणे साठवली जात असल्याची सूचना मिळाली होती. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर, सैन्याने असे निश्चित केले की तेथे अशी कोणतीही लष्करी उपकरणे साठवलेली नाहीत.

“त्यानंतर, इस्रायली सैन्याने त्यांचा इशारा दिला. पुन्हा शोध घेण्यासाठी आणि हल्ले रोखण्यासाठी लेबनीज सैन्याने पुन्हा दहियाहमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु इस्रायली इशारा हल्ल्यांमुळे सैन्याला त्या भागात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले,” असे सूत्राने सांगितले.

रॉयटर्सच्या फुटेजनुसार, मध्यरात्रीपर्यंत या हल्ल्यांमुळे जिल्ह्यात धुराचे लोट पसरले होते. हजारो लोक पळून गेले, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. बहुतेकजण चालतच आपल्या नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले आणि तर काहीजण रस्त्यावरच राहिले.

लेबनीज सरकारी माध्यमांनुसार, या भागात स्थलांतराचे इशारे जारी केल्यानंतर लगेचच दक्षिण लेबनीजच्या ऐन काना गावातही इस्रायली हल्ले झाले.

गुरुवारी मुस्लिमांचा सण ईद अल-अधा सुरू होणार असताना हे हल्ले झाले. या हल्ल्यांमुळे “ईद अल-अधाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा भीती आणि दहशत निर्माण झाली,” असे संयुक्त राष्ट्रांच्या लेबनॉनसाठी विशेष समन्वयक कार्यालयाने एक्सवर सांगितले.

‘कराराचे उल्लंघन’

लेबनीज राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन आणि पंतप्रधान नवाफ सलाम यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आणि ते आंतरराष्ट्रीय  “करारांचे उल्लंघन” असल्याचे म्हटले.

हिज्बुल्लाह आणि इस्रायल यांनी एकमेकांवर युद्धबंदीच्या अटी पूर्ण न केल्याचा आरोप केला. अलिकडच्या काही महिन्यांत रा युद्धबंदीचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे.

इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनला सतत लक्ष्य करत दक्षिणेकडील पाच टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. युद्धबंदी झाल्यापासून इस्रायलने बैरूतच्या उपनगरांवर तीन वेळा हल्ले केले आहेत, बहुतेकदा लेबनॉनमधून रॉकेट प्रक्षेपणाच्या प्रत्युत्तरासाठी हे हल्ले करण्यात आले. हिज्बुल्लाहने मात्र त्या प्रक्षेपणांमध्ये आपला सहभाग नाकारला.

दीर्घकालीन शत्रू असलेल्या इस्रायल आणि हिज्बुल्लाह यांच्यातील नवीनतम युद्ध ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झाले, जेव्हा हिज्बुल्लाहने त्याचा पॅलेस्टिनी मित्र हमासशी एकता दर्शवत इस्रायली लष्करी स्थानांवर रॉकेट प्रक्षेपित केले.

पुढच्या वर्षी इस्रायलने जोरदार बॉम्बहल्ला मोहीम सुरू केली ज्यामध्ये हजारो हिज्बुल्लाह सैनिकांचा मृत्यू झाला, त्यांच्या शस्त्रागारांचा बराचसा भाग नष्ट झाला आणि तत्कालीन सरचिटणीस हसन नसरल्लाहसह त्यांचे वरिष्ठ नेते यात मृत्युमुखी पडले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleमस्क यांच्यासोबतचे सरकारी करार रद्द करण्याची ट्रम्प यांची धमकी
Next articleTerror And Restraint: Why The West Misleads India-Pakistan Dynamics?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here