एलोन मस्क यांच्या कंपन्यांसोबतचे सर्व सरकारी करार रद्द करण्याची धमकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिली. यामुळे मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची मागणी केली आहे. त्यांच्यातील एकेकाळी मैत्रीपूर्ण असणारे संबंध आता पूर्णपणे ताणले गेल्याचे बघायला मिळत आहेत.
ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये टेस्लाच्या सीईओ मस्क यांच्यावर टीका केली तेव्हा मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये दरी निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर काही तासांतच, एकेकाळी अत्यंत खास असणारे हे मैत्र सार्वजनिक मंचावर तुटत असल्याचे बघायला मिळाले. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असणारे ट्रम्प आणि सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या मस्क यांनी ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल आणि मस्क यांच्या एक्सवरून एकमेकांवर वैयक्तिक टीका सुरू केली.
“आमच्या बजेटमध्ये, अब्जावधी डॉलर्समध्ये पैसे वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एलोनच्या सरकारी अनुदाने आणि करार रद्द करणे,” असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले.
वॉल स्ट्रीट व्यापाऱ्यांनी मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन कंपशीचे शेअर्स विकायला सुरूवात केली आणि टेस्लाच्या शेअर्समध्ये 14.30 टक्क्यांची घसरण झाली, ज्यामुळे बाजार मूल्यात सुमारे 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. टेस्लाच्या इतिहासात एका दिवसातील शेअर्सच्या मूल्यातील ही सर्वात मोठी घसरण होती.
मस्क यांचा महाभियोगाचा दावा
ट्रम्प यांच्या पोस्टनंतर काही मिनिटांनी, ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला पाहिजे या एक्सवरील पोस्टवर मस्क यांनी “होय” असे उत्तर दिले. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात बहुमत आहे आणि ते त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची शक्यता कमी आहे.
काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्रम्प यांच्या कर कपात आणि खर्च विधेयकाचा निषेध केला तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू झाला. मस्क यांनी विधेयकाला आव्हान दिले तेव्हा सुरुवातीला अध्यक्षांनी जाहीरपणे आपले मत प्रदर्शित करण्यापासून स्वतःला परावृत्त केले आणि म्हटले की यामुळे देशाच्या 36.2 ट्रिलियन डॉलर कर्जात आणखी भर पडेल.
अखेर गुरुवारी ट्रम्प यांनी आपले मौन सोडले आणि ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले की आपण मस्क यांच्याबद्दल “प्रचंड निराश” आहेत.
“पाहा, एलोन आणि माझे खूप चांगले संबंध होते. आता आपण असे करू की नाही हे मला माहित नाही,” ट्रम्प म्हणाले.
ऑनलाइन जोरदार संघर्ष
“माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते,” असे मस्क यांनी लिहून नंतर “अशी कृतघ्नता” अशीही टीका केली. गेल्या वर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्या समर्थनासाठी मस्क यांनी जवळजवळ 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले होते.
दुसऱ्या पोस्टमध्ये, मस्क यांनी असा दावा केला की ट्रम्प यांचे आयात शुल्क या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेला मंदीच्या खाईत ढकलेल.
टेस्ला व्यतिरिक्त, मस्क यांच्या इतर व्यवसायांमध्ये रॉकेट कंपनी आणि सरकारी कंत्राटदार स्पेसएक्स आणि त्याचे उपग्रह युनिट स्टारलिंक यांचा समावेश आहे.
ड्रॅगन स्पेसक्राफ्ट
अमेरिकन सरकारच्या अंतराळ कार्यक्रमात ज्यांचा अंतराळ व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो, त्या मस्क यांनी सांगितले की ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे आपण स्पेसएक्सचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट बंद करण्यास सुरुवात करू. ड्रॅगन हे सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर पाठवण्यास सक्षम असलेले एकमेव अमेरिकन अंतराळयान आहे.
काही तासांनंतर, मस्क हे आपला निर्णय फिरवताना दिसले. एक्सवरील एका फॉलोअरने मस्क आणि ट्रम्प यांना “शांत रहा आणि काही दिवसांसाठी एक पाऊल मागे घ्या” असे आवाहन केले तेव्हा मस्क यांनी लिहिलेः “चांगला सल्ला. ठीक आहे, आम्ही ड्रॅगन काढून घेणार नाही.”
कट्टर जोडी
हा संघर्ष पूर्णपणे अनपेक्षित नव्हता. ट्रम्प आणि मस्क हे दोघेही अत्यंत अहंकार असलेले राजकीय योद्धे आहेत आणि त्यांच्या कथित शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याची त्यांना आवड आहे आणि अनेक निरीक्षकांनी अखेरीस ते वेगळे होतील असा अंदाज वर्तवला होता.
गेल्या आठवड्यात मस्क प्रशासनातून बाहेर पडण्यापूर्वी, त्यांच्या एजन्सीजमध्ये कपात केल्याबद्दल कॅबिनेट सदस्यांशी झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले.
पहिल्या कार्यकाळात अनेक फटके बसल्यानंतर, दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांची एखाद्या वरिष्ठ सल्लागारासोबत झालेली ही पहिली मोठी लढाई होती.
व्हाईट हाऊसच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी अनेक कर्मचारी प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राजकीय रणनीतीकारांना कामावरून काढून टाकण्याचा मार्ग पत्करला. स्टीव्ह बॅननसारखे काहीजण त्यांच्यावर असणाऱ्या कृपादृष्टीमुळे टिकून राहिले, तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांचे राजदूत जॉन बोल्टन यांच्यासारखे इतर अनेकजणांना जोरदार आणि प्रखर टीकेचा सामना करावा लागला.
2024 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक मोहिमेच्या हंगामात सर्वात मोठे रिपब्लिकन देणगीदार म्हणून काम केल्यानंतर, मस्क हे सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख म्हणून ट्रम्प यांच्या सर्वात प्रबळ सल्लागारांपैकी एक बनले. त्यांनी फेडरल कर्मचारी कपात करण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी व्यापक आणि वादग्रस्त ठरतील असे निर्णय घेतले.
मस्क व्हाईट हाऊसमध्येही वारंवार उपस्थित असत आणि कधीकधी त्यांच्या लहान मुलाला घेऊन कॅपिटल हिलवर अनेक वेळा हजर असत.
ट्रम्प-मस्क वाद
गुरुवारी झालेल्या वादाच्या केवळ सहा दिवस आधी, ट्रम्प आणि मस्क यांनी ओव्हल ऑफिसमध्ये हजेरी लावली, जिथे ट्रम्प यांनी मस्क यांच्या सरकारी सेवेचे कौतुक केले आणि दोघांनी एकत्र काम करण्याचे वचन दिले.
ट्रम्प आणि मस्क यांच्यातील प्रदीर्घ संघर्षामुळे रिपब्लिकन्सना पुढील वर्षीच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये काँग्रेसवर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण होऊ शकते. त्याच्या प्रचाराच्या खर्चाव्यतिरिक्त, मस्कचे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अनुयायी आहेत आणि त्यांनी ट्रम्प यांना सिलिकॉन व्हॅलीच्या काही भागांशी आणि श्रीमंत देणगीदारांशी जोडण्यास मदत केली होती.
भविष्यात आपला राजकीय खर्च कमी करण्याची योजना असल्याचे मस्क यांनी आधीच जाहीर केले होते.
गुरुवारी ट्रम्प यांच्या ओव्हल ऑफिसमधून आलेल्या निर्णयानंतर लगेचच, मस्क यांनी एक्सवर त्याच्या 22 कोटी फॉलोअर्सचा मतदानाद्वारे कौल जाणून घेतला : “अमेरिकेत एक नवीन राजकीय पक्ष तयार करण्याची वेळ आली आहे का जो प्रत्यक्षात मधल्या 80 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करेल?”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)