राफामधील हल्ल्यात झाला होता मृत्यू
दि. १८ मे: संयुक्त राष्ट्राच्यावतीने गाझामधील राफा येथे मदतकार्य करीत असताना अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात वीरगती प्राप्त झालेले भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी कर्नल वैभव अनिल काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून कर्नल काळे यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली.
‘नमन’
Colonel Waibhav Anil Kale (Retd), was killed in the line of duty in Rafah, #Gaza, serving as a Security Coordination Officer with the #UnitedNations. Accorded full State & military honours during last rites in #Pune in presence of family, friends and relatives.
Jai Hind… pic.twitter.com/k0KFEQxOtk
— Southern Command INDIAN ARMY (@IaSouthern) May 17, 2024
कर्नल काळे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. लष्कराच्यावतीने लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे ‘चिफ ऑफ स्टाफ’ मेजर जनरल आर. एस. सुंदरम यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर काळे यांचा मुलगा वेदांत आणि मुलगी राधिका यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या वेळी काळे यांची आई रचना, पत्नी अमृता, भाऊ विंग कमांडर अक्षय काळे आदी परिवारातील सदस्यांसह लष्कराचे माजी उपप्रमुख लेफ्टनंट जनरल नोबल थंबुराज (निवृत्त) सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडिअर राजेश गायकवाड (निवृत्त) उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव (निवृत्त) व आजी, माजी लष्करी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कर्नल काळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि इंडिअन मिलिटरी अकादमीतून लष्करी शिक्षण घेतल्यानंतर लष्करात रुजू झाले होते. त्यांनी २०२२ मध्ये लष्करातून स्वेच्छानिवृत्ती निवृत्ती घेतली होती. आपल्या लष्करी सेवेच्या काळात त्यांनी सियाचीन, कारगिल, द्रास, ईशान्य भारत त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत काँगोमध्ये काम केले होते.
लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर कर्नल काळे संयुक्त राष्ट्राच्या मदत कार्यक्रमाच्या माध्यामतून गाझामधील युद्धग्रस्त क्षेत्रात कार्यरत होते. दोनच महिन्यांपूर्वी ते येथे कामासाठी रुजू झाले होते. राफामध्ये संयुक्त राष्ट्राकडून सुरु असलेल्या कामावर ते देखरेख करीत होते. सोमवारी आपल्या सहकाऱ्यासह ते राफाहमधील युरोपीय रुग्णालयाकडे जात असताना त्यांच्या मोटारीवर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यात काळे यांचा मृत्यू झाला होता. हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्राईलने सुरु केलेल्या हल्ल्यात सात ऑक्टोबरपासून आतापर्यंत ३५ हजारहून अधिक नागरिकांचा बळी हेला असून, सुमारे २३ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत, असे पॅलेस्टाईनच्या वैद्यकीय विभागाने म्हटले आहे. दरम्यान, काळे यांच्यावरील हल्ल्याची चौकशी सुरु झाली असून, ती सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. या घटनेचा सर्व तपशील इस्त्राईलच्या संरक्षणदलाकडून तपासून घेण्यात येणार आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले. सध्या गाझामध्ये संयुक्त राष्ट्राचे ७१ कर्मचारी काम करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. या भागात मानवीय मदत पोहोचविण्यासाठी संयुक्त राष्ट्राची मुख्य संस्था म्हणून काम करीत असलेल्या ‘युएनआरडब्लूए’ने दिलेल्या माहितीनुसार सहा मे पासून या भागातून सुमारे साडेचार लाख लोकांनी पलायन केले असून, संयुक्त राष्ट्रांच्या शिबिरात दहा लाख नागरिकांनी आश्रय घेतला आहे.
विनय चाटी