युद्धविरामाचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर, इस्रायलने गाझावर हल्ले सुरू केले

0

हमासवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत, इस्रायली लढाऊ विमानांनी मंगळवारी गाझामध्ये हल्ले केले. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेल्या नाजूक युद्धविरामाची ही एक परीक्षा ठरली.

स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, या हल्ल्यांमध्ये किमान 26 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये मध्य गाझातील बुरेईज निर्वासित छावणीतल्या एका घरावर झालेल्या हल्ल्यात पाच जण मारले गेले. तसेच गाझा शहरातील सब्रा परिसरातील एका इमारतीवरील हल्ल्यात 4 जणांचा, आणि खान युनिस येथे एका कारवर झालेल्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला.

साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली विमानांचे हे हल्ले बुधवार सकाळपर्यंत गाझा पट्टीत सुरूच होते.

इस्रायली लष्कराने तात्काळ या हल्ल्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तीन आठवड्यांपूर्वी लागू झालेल्या युद्धविरामानंतर झालेली ही हिंसेची ही ताजी  घटना असून, ती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनानंतर घडली. त्या निवेदनात, नेतान्याहू यांनी तातडीने ‘शक्तीशाली हल्ले’ करण्याचे आदेश दिले असल्याचे, म्हटले होते की.

“हा हल्ला म्हणजे पुन्हा एकदा युद्धविरामाचे झालेले उल्लंघन आहे,” असे अधिकाऱ्यांनी म्हटले.

अमेरिकेचा पाठिंबा असलेला हा युद्धविराम करार, 10 ऑक्टोबर रोजी लागू करण्यात आला. या करारानुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखाली इस्रायलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमुळे सुरू झालेल्या आणि तब्बल दोन वर्षे चाललेल्या युद्धाला स्थगिती देण्यात आली.

दोन्ही देशांनी एकमेकांवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत.

‘युद्धविराम कायम आहे’

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स, ज्यांनी गेल्या आठवड्यात ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाचा एक भाग म्हणून इस्रायलला भेट दिली, त्यांनी सांगितले की “नवीन कारवायांनतरही युद्धविराम कायम आहे.”

कॅपिटॉल हिलवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “असे नाही की युद्धविरामादरम्यान, लहान-मोठ्या चकमकी होणार नाहीत. आम्हाला माहीत आहे, की हमास किंवा गाझामधील इतर कोणीतरी इस्रायली लष्करावर हल्ला केला आहे. आम्ही अपेक्षा करतो की, इस्रायल त्याला प्रत्युत्तर देईल, पण मला वाटते की, हे सर्व होऊनही राष्ट्राध्यक्षांनी आमलात आणलेला शांततेचा करार टिकून राहील.”

मंगळवारी, इस्रायली माध्यमांनी, दक्षिण गाझातील राफा शहरात इस्रायली सैन्य आणि हमासच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त दिले, ज्यावर प्रतिक्रिया देण्यास इस्रायली लष्कराने नकार दिला.

हमासने राफामध्ये इस्रायली सैन्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी नाकारली. त्या गटाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते गाझामधील युद्धविराम करारासाठी कटिबद्ध आहे.

शनिवारी मध्य गाझामधील एका व्यक्तीवर इस्रायलने केलेल्या ‘टार्गेटेड हल्ल्यानंतर’, मंगळवारी गाझा शहरावर हल्ले झाले. इस्रायलच्या मते, ती व्यक्ती इस्रायली सैन्यावर हल्ला करण्याचा कट रचत होती.

हमासने युद्धविरामाचे उल्लंघन केले – नेतान्याहू यांचा आरोप

मंगळवारी, इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी आरोप केला की, ‘हमासने युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे.’ ओलीस ठेवलेल्या व्यक्तींचे मृतदेह परत इस्रायलला सोपवताना, हमासने चुकीचे अवशेष दिल्याचा त्यांचा दावा आहे.

नेतान्याहू यांनी सांगितले की, ‘सोमवारी परत केलेले मृतांचे अवशेष ओफिर झारफाती यांचे होते, जे 7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमासच्या हल्ल्यात ठार झालेले इस्रायली नागरिक होते. झारफातीचे काही अवशेष इस्रायली सैन्याने युद्धादरम्यान आधीच शोधून काढून ठेवले होते.’

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हमासने सुरुवातीला सांगितले होते की, ‘मंगळवारी ते गाझामधील एका बोगद्यात सापडलेल्या एका लावारिस ओलीसचा मृतदेह इस्रायलला सुपूर्द करतील.’ तथापि, नंतर हमासची सशस्त्र शाखा अल-कस्साम ब्रिगेड्सने  म्हटले की, ‘इस्रायलने केलेल्या युद्धविराम उल्लंघनांचा हवाला देत, त्यांनी मृतदेहाचे नियोजित हस्तांतरण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’

मंगळवारी उशीरा, अल-कस्साम ब्रिगेड्सने एका निवेदनात सांगितले की: ‘गाझामधील शोध मोहिमेदरम्यान त्यांनी, अमीराम कूपर आणि सहार बारुख /e दोन इस्रायली ओलीसांचे मृतदेह शोधून काढले आहेत.

हमासने म्हटले की, नेतान्याहू इस्रायलच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्यासाठी निमित्त शोधत आहेत.

युद्धविरामाच्या अटींनुसार, हमासने सर्व जिवंत ओलीसांची सुटका केली आणि त्याबदल्यात सुमारे 2,000 पॅलेस्टिनी कैद्यांना आणि युद्धकाळातील बंदिवानांना इस्रायलने मुक्त केले, तसेच इस्रायली सैन्याने आपले आक्रमण थांबवून माघार घेतली.

ओलिसांच्या मृतदेहांचा शोध सुरू

हमासने, सर्व मृत ओलीसांचे अवशेष इस्रायलला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे, मात्र गाझातील उद्ध्वस्त भागांमध्ये त्यांचे मृतदेह शोधणे आणि बाहेर काढणे यासाठी वेळ लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. इस्रायलचा दावा आहे की, हमासकडे बहुतांश ओलिसांचे अवशेष उपलब्ध आहेत आणि ते तिथपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात.

हा मुद्दा सध्या युद्धविरामातील प्रमुख वादग्रस्त विषयांपैकी एक बनला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच सांगितले आहे की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी या युद्धविरामाला आणि ओलिसांच्या आणि कैद्यांच्या देवाणघेवाणीच्या कराराला, त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठ्या परराष्ट्र धोरणातील यशांपैकी एक म्हणून गौरविले आहे. ट्रम्प आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युद्धविराम कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

गाझावरील हल्ल्यांपूर्वी इस्रायलने अमेरिकेला याविषयी माहिती दिली होती का, या प्रश्नावर व्हाईट हाऊसने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

गाझा शहरात झालेल्या इस्रायली हल्ल्यात, चार लोक ठार झाले. हा हल्ला उत्तरेकडील गाझामधील सर्वात मोठ्या शिफा हॉस्पिटलजवळील निवासी इमारतीवर झाला. गाझा अधिकाऱ्यांच्या, साक्षीदारांच्या आणि हमास माध्यमांच्या म्हणण्यानुसार, हॉस्पिटलवरही काही प्रमाणात हल्ला झाला. मध्य गाझाच्या झवायदामधील तंबूवर झालेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले, असे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत, ओलिसांचे  मृतदेह शोधण्याचे कार्य अधिक वाढवले आहे. इजिप्तकडून आलेल्या अवजड यंत्रसामग्रीनंतर या शोध मोहिमेला गती मिळाली आहे. मंगळवारी, दक्षिण गाझातील खान युनिस आणि उत्तरेकडील नुसेरात भागात बुलडोझर काम करत होते, तर हमासचे सैनिक परिसरात तैनात होते.

असे मानले जाते की, काही मृतदेह हमासच्या गाझाखालील बोगद्यांमध्ये दबलेले आहेत.

खान युनूसमधील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ‘सशस्त्र हमास सैनिकांसोबत काम करणारी इजिप्शियन पथके, खान युनूसच्या पश्चिमेकडील कतारचे आर्थिक पाठबळ असलेल्या हमाद हाऊसिंग सिटीजवळ, खोलवर खोदकाम करत होते आणि बोगद्यापर्यंत पोहोचत होते.’

रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये, सुमारे बारा मीटर खोल खोदकाम झाल्याचे दिसत आहे आणि हमासचे लढवय्ये तळाशी जाऊन, बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ मृतदेहांच्या शोधासाठी उत्खनन करत असल्याचे दिसत आहे.

गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 68,000 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, हजारो लोक अद्याप बेपत्ता आहेत. जेव्हा हमासच्या नेतृत्वाखालील सैन्याने, दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी करून 1,200 लोकांची हत्या केली होती आणि 251 लोकांना गाझामध्ये बंधक बनवले होते, तेव्हा इस्रायलने या युद्धाची सुरुवात केली होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articlePresident Droupadi Murmu Becomes First Indian President to Fly in Rafale Jet
Next articleIndia, China Hold Fresh Military Talks on LAC Situation in Eastern Ladakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here