गाझामधील नागरिकांच्या “नरसंहार”चा बदला घेत, रविवारी दहशतवादी गट हमासने दक्षिण इस्रायली शहरांवर रॉकेट हल्ले सुरु केले.
इस्रायली सैन्याने सांगितले की, हमासने सुमारे 10 क्षेपणास्त्रे डागली पण त्यातील बहुतांशी यशस्वीपणे रोखली गेली. इस्रायली चॅनेल 12 ने दक्षिणी शहर अश्केलॉनमध्ये थेट हल्ला झाल्याचे अहवाल दिले.
इस्रायली आपत्कालीन सेवांनी सांगितले की, ते रॉकेट हल्ल्यामधील जखमी व्यक्तीवर उपचार करत आहेत आणि पथके पडलेल्या रॉकेटच्या ठिकाणी जात आहेत. इस्रायली आपत्कालीन सेवांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओंमध्ये दिसून आले आहे की, शहरातील रस्त्यावर तुटलेल्या कारच्या खिडक्या आणि कचरा पसरलेला आहे.
दरम्यान, गाझाच्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी गाझा पट्टीमध्ये इस्रायली लष्करी हल्ल्यात किमान 39 लोक ठार झाले.
रॉकेट गोळीबारानंतर काही वेळातच, इस्रायली सैन्याने X वर एक नवीन निर्वासन आदेश जारी केला, ज्यामध्ये ‘मध्य गाझा पट्टीतील देईर अल-बलाह शहरातील अनेक जिल्ह्यांतील रहिवाशांना, पूर्वीच्या रॉकेट गोळीबाराचा हवाला देत, त्यांचे क्षेत्र सोडण्याचे निर्देश दिले.’
“हल्ल्यापूर्वीची ही अंतिम चेतावनी आहे,” असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
त्यानंतर त्यांनी गाझा पट्टीतून ज्या रॉकेट लाँचरमधून प्रक्षेपणास्त्रे सोडली होती, त्या रॉकेट लाँचरवर हल्ला केल्याचेही सांगितले.
नेतान्याहू यांचा प्रतिसाद
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्याशी बैठकीसाठी वॉशिंग्टनला जाणाऱ्या विमानाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना त्यांचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी रॉकेट हल्ल्याची माहिती दिली.
त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘नेतान्याहू यांनी हमासविरुद्ध “जोरदार” प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले आणि इस्रायली सैन्याकडून तीव्र कारवाई सुरू ठेवण्यास मान्यता दिली.’
इस्रायलच्या चॅनल 12 टेलिव्हिजनने, अश्केलोनमधील बाझिलाई रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने गाझा येथून झालेल्या रॉकेट हल्ल्यात किमान 12 लोक जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात आल्याचे सांगितले.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीचा पहिला टप्पा, 15 महिन्यांच्या युद्धानंतर 19 जानेवारी रोजी लागू झाला आणि त्यात लढाई थांबवणे, हमासने ताब्यात घेतलेल्या काही इस्रायली ओलिसांची सुटका करणे आणि काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणे यांचा समावेश होता.
तथापि, इस्रायलने 19 मार्च रोजी सांगितले की, त्यांच्या सैन्याने मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीत जमिनीवरील कारवाई पुन्हा सुरू केली. युद्धबंदी चर्चेतील गतिरोधासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना दोषी ठरवले.
गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात 50,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, असे पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इस्रायली आकडेवारीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखालील हजारो बंदूकधाऱ्यांनी दक्षिण इस्रायलमधील समुदायांवर हल्ला केल्यानंतर, 1,200 लोकांचा मृत्यू झाला आणि 251 जणांना ओलिस म्हणून अपहरण करण्यात आले, त्यानंतर इस्रायलने आपले आक्रमण सुरू केले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)