इस्रायली सैन्याने शुक्रवारी रफाहच्या उत्तरेस विस्थापित पॅलेस्टिनींसाठी उभारण्यात आलेल्या छावण्यांवर गोळीबार केला. गाझाचे आरोग्य मंत्रालय आणि आपत्कालीन कामगारांच्या म्हणण्यानुसार, पॅलेस्टिनी प्रदेशात झालेल्या या ताज्या प्राणघातक हल्ल्यात किमान 25 नागरिक ठार झाले असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असणाऱ्या संघर्षामुळे हजारो लोकांनी पळून जाऊन रफाहमध्ये आश्रय घेतला आहे.
रफाहमधील नागरी संरक्षण प्रथम प्रतिसादकर्ता प्रवक्ते अहमद रादवान यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षदर्शींनी बचाव कार्यकर्त्यांना किनारपट्टीवरील दोन ठिकाणी झालेल्या गोळीबाराबद्दल सांगितले. ही दोन्ही ठिकाणे शरणार्थींच्या तंबूंनी भरलेली आहेत. आरोग्य मंत्रालयाने हल्ल्यांमध्ये ठार आणि जखमी झालेल्यांची नोंद केली आहे.
नागरी संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यांची ठिकाणे इस्रायलने मान्य केलेल्या सुरक्षित क्षेत्राच्या अगदी जवळच होती. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की हा हल्ला सुरक्षित क्षेत्रात आयडीएफने केल्याचे कोणतेही संकेत नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने मुआवियाच्या आसपासच्या भागावर बॉम्बहल्ला केला आहे. विस्थापित पॅलेस्टिनींनी अलीकडेच या ठिकाणी तंबू उभारले होते. इस्रायली सैन्याने गोळीबार करण्याची ही दुसरी वेळ असल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. मोना अशौरच्या म्हणण्यानुसार, हल्ल्याच्या सुरुवातीला एक मोठा दारूचा गोळा फेकण्यात आला. त्याचा केवळ मोठा आवाज झाला आणि चमकदार प्रकाश बाहेर पडला. या हल्ल्यात मोनाने तिचा पती गमावला.
या संदर्भात इस्रायलचे म्हणणे आहे की ते हमासच्या लढाऊ सैनिकांना आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करीत आहे. इस्रायलने नागरिकांच्या मृत्यूंसाठी दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की हे दहशतवादी सामान्य नागरिकांमध्ये जाऊन आपले काम करत आहेत, त्यामुळे या हल्ल्यात नागरिकही मारले जातात. मध्य गाझामध्ये झालेल्या लढाईत दोन सैनिकही मारले गेल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. दोघेही सुमारे 20 वर्षांचे होते. तर तीन इस्रायली सैनिक गंभीर जखमी झाले.
इस्त्रायली बॉम्बस्फोटाने दक्षिण गाझामधील विस्थापित पॅलेस्टिनींच्या शिबिरात प्राणघातक आग लागल्याच्या घटनेनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत शुक्रवारी पुन्हा गोळीबाराची घटना घडली. यामुळे रफाहमध्ये सैन्याच्या विस्तारित आक्रमणावर- इस्रायलच्या काही जवळच्या मित्रांसह – आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला आहे.
आराधना जोशी
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)