शुक्रवारी गाझामध्ये इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या मालिकेत, कमीतकमी 25 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. प्राथमिक महितीनुसार, नुसीरत रेफ्युजी कॅम्पमधील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे किमान आठ या हल्ल्यात जण मरण पावले. तर नजीकच्या जबलिया शहरात सात मुलांसह किमान 10 ठार झाले.
गाझाच्या नागरी संरक्षण बचाव एजन्सीच्या रिपोर्टनुसार,जबलियामध्ये झालेल्या इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये, एकाच कुटुंबातील 10 सदस्यांचा मृत्यू झाला, ज्यापैकी 7 लहान मुले आहेत.
“जबालियाच्या नैऋत्येकडील रेफ्युजी कॅम्पवर झालेल्या हवाई हल्ल्यात 10 जण मृत पावले असून, सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. ज्यामध्ये सात चिमुरड्यांचा समावेश आहे, ज्यापैकी सर्वात मोठ्या मृत मुलाचे वय फक्त सहा वर्ष इतके आहे.” अशी माहिती, नागरी संरक्षण संस्थेचे प्रवक्ते महमूद बस्सल यांनी ‘AFP’ शी बोलताना दिली.
दरम्यान, पोप फ्रान्सिस यांनी गाझामधील या हवाई हल्ल्यांना, ‘क्रूरता’ असे संबोधत त्यांचा निषेध केला असल्याचे, वृत्त अल जझीराने प्रसिद्ध केले आहे. “निष्पाप लहान मुलांचा जीव घेणारे हल्ले ही निव्वळ क्रूरता आहे, हे युद्ध नाही,” असे पोप यांनी म्हटले. ‘घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय असून, लहान मुलांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला खूपच त्रास झाला’ असे ते यावेळी म्हणाले.
गाझाला ‘स्मशानभूमी’ असे संबोधत, UNRWA (युनायटेड नेशन्स पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सी) चे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी- लुईस वॉटरिज यांनी, अल जझीराशी बोलताना सांगितले की, ‘गाझापट्टीतील पॅलेस्टिनी समाज आता स्मशानभूमी बनला आहे. चिंताजनक बाब म्हणजे अजूनही तिथे वीस लाखांहून अधिक नागरिक अडकले आहेत.’
एका आठवड्यापूर्वी गाझामध्ये झालेल्या अशाच एका इस्रायली हवाई हल्ल्यात किमान 66 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले होते. तर सुमारे 50 जण जखमी झाले होते.
दुर्देवाने, मध्यस्थांना एका वर्षाहून अधिक कालावधीच्या संघर्षानंतरही, इस्रायल आणि इस्लामी गट हमास यांच्यात शांती करार साधता आलेला नाही.
कतार आणि इजिप्त दोघेही युद्ध करणाऱ्या पक्षांमधील काही मतभेद सोडविण्यात सक्षम झाले असले, तरीही काही समस्या अजूनही कायम असल्याचे, काही खासगी सूत्रांनी रॉयटर्सशी चर्चा करतेवेळी सांगितले.
7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमासच्या नेतृत्वातील सैन्याने गाझावर केलेल्या हल्ल्यामध्ये 1,200 लोक मारले गेले आणि 250 हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने गाझावर हल्ला सुरू केला. इस्रायलचे म्हणणे आहे की, सध्या गाझामध्ये अंदाजे 100 लोकांना ओलिस ठेवले गेले असून, त्यातील किती लोक जिवंत आहेत आणि किती मरण पावले आहे याविषयी कोणतीही स्पष्ट कल्पना नाही.
याविषयी बोलताना गाझामधील अधिकारी सांगतात, की ‘इस्रायलच्या या क्रूर मोहिमेमुळे, आतापर्यंत 45 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत आणि 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी बहुतेक लोक विस्थापित झाले आहेत. या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे गाझातील किनारपट्टीचा बराचसा भाग आज भग्नावस्थेत आहे.’
(रॉयटर्स)