इस्रायली हल्ले पुन्हा सुरू झाल्याने गाझा युद्धविरामाला खीळ, 100 ठार

0
इस्रायली
इस्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनी व्यक्तीचा मृतदेह 17 मार्च 2025 रोजी मध्य गाझा पट्टीतील देर अल-बालाह येथील अल-अक्सा शहीद रुग्णालयात हलवताना पॅरामेडिक. (रॉयटर्स/ ओसामा शेरिफ)

इस्रायली सैन्याने मंगळवारी गाझातील विविध लक्ष्यांवर हल्ला केला, ज्यामुळे जानेवारीतील लढाई थांबवणाऱ्या युद्धविरामाला आणखी मुदतवाढ देण्यावरून गेला आठवडाभर सुरू असणारा गतिरोध संपुष्टात आणला. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

उत्तर गाझा, गाझा शहर आणि मध्य तसेच दक्षिण गाझा पट्टीमधील देइर अल-बलाह, खान युनूस आणि रफाहसह अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आल्याचे म्हटले जाते. मृतांमध्ये अनेक मुलांचा समावेश असल्याचे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डझनभर लक्ष्यांवर हल्ला करणारे लष्कर म्हणाले की, आवश्यकतेनुसार हे हल्ले सुरूच राहतील आणि गरज पडली तर हवाई हल्ल्यांशिवाय इतर पर्यायांचाही वापर केला जाईल.

इस्रायली सैन्याने संशयित दहशतवाद्यांना किंवा छोट्या गटांच्या विरोधात केलेल्या नियमित ड्रोन हल्ल्यांच्या मालिकांपेक्षा हे हल्ले खूपच व्यापक होते आणि 19 जानेवारी रोजी मान्य झालेल्या युद्धविरामाच्या मुदतवाढीवर सहमती दर्शविण्याच्या अनेक आठवड्यांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर हे हल्ले करण्यात आले.

ओलिसांच्या सुटकेबाबत संदिग्धता

इस्रायलने युद्धविराम करार रद्द केला आहे, ज्यामुळे गाझामध्ये अजूनही असणाऱ्या 59 ओलिसांचे भवितव्य अनिश्चित झाल्याचे हमासने सांगितले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने हमासवर “आमच्या ओलिसांची सुटका करण्यास वारंवार नकार दिल्याचा” आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ यांचे प्रस्ताव नाकारल्याचा आरोप केला.

“इस्रायल आतापासून हमासविरुद्ध वाढत्या लष्करी ताकदीसह कारवाई करेल,” असे निवेदनात म्हटले आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने वॉशिंग्टनमध्ये सांगितले की इस्रायलने हल्ले करण्यापूर्वी अमेरिकी प्रशासनाशी सल्लामसलत केली होती. लष्कराच्या म्हणण्यानुसार मध्यम-स्तरीय हमास कमांडर आणि नेतृत्व अधिकारी तसेच दहशतवादी गटाशी संबंधित संरचना यांना या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले.

हल्ले झाले त्यावेळी इस्रायल आणि हमास यांच्यात वाटाघाटी करणारी मध्यस्थांची पथके दोहामध्ये होती. इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांनी युद्धविरामाचा प्रारंभिक टप्पा संपल्यानंतर दोन्ही बाजूंमधील दरी भरून काढण्याचा प्रयत्न केला, ज्यात 33 इस्रायली ओलिस आणि पाच थाई गाझामधील दहशतवादी गटांनी सुमारे 2 हजार पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात परत केले.

अमेरिकेच्या पाठिंब्याने, गाझामध्ये अजूनही असलेल्या उर्वरित 59 ओलिसांच्या परताव्यासाठी इस्रायल दबाव आणत होता, त्या बदल्यात दीर्घकालीन युद्धविरामाच्या बदल्यात रमजानचा मुस्लिम उपवास महिना आणि एप्रिलमधील ज्यू पासओव्हर सुट्टीपर्यंत लढाई थांबली असती.

हमासने केली जबाबदारी घेण्याची मागणी

अर्थात, मूळ युद्धविराम कराराच्या अटींनुसार, युद्ध कायमस्वरूपी संपवण्यासाठी आणि गाझामधून इस्रायली सैन्य पूर्णपणे मागे घेण्यासाठी वाटाघाटी करण्याचा हमासचा आग्रह होता.

“आम्ही नेतान्याहू आणि झायोनिस्ट यांना या कराराचे उल्लंघन आणि उलथापालथ करण्यासाठी मध्यस्थांनी पूर्णपणे जबाबदार धरण्याची मागणी करतो,” असे गटाने म्हटले आहे.

जानेवारीतील युद्धबंदी कराराच्या अटींचा आदर करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी एकमेकांवर केला. याशिवाय पहिल्या टप्प्यात अनेक अडथळे आले. परंतु आतापर्यंत, संपूर्ण लढाई होणे टाळले गेले होते.

इस्रायलने गाझामध्ये प्रवेश करण्यापासून मदतीचे वितरण रोखले होते आणि हमासने अजूनही ताब्यात घेतलेल्या ओलिसांना परत करण्यास सहमती दर्शवली नाही तर लढाई पुन्हा सुरू करण्याची धमकी अनेक वेळा दिली होती.

मंगळवारी पहाटे केलेल्या हल्ल्यांविषयी लष्कराने तपशील दिलेला नाही परंतु पॅलेस्टिनी आरोग्य अधिकारी आणि रॉयटर्सने संपर्क साधलेल्या साक्षीदारांनी गाझाच्या असंख्य भागात नुकसान झाल्याची माहिती दिली, जिथे लाखो लोक तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये किंवा नुकसान झालेल्या इमारतींमध्ये राहत आहेत.

गाझापट्टीच्या उत्तर टोकावरील गाझा शहरातील एका इमारतीवर  हल्ला झाला तर मध्य गाझामधील देइर अल-बलाहमध्ये किमान तीन घरांना या हल्ल्याचा फटका बसला. याव्यतिरिक्त, चिकित्सक आणि साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, खान युनूस आणि रफाह या दक्षिणेकडील शहरांमधील लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला.

इस्रायली आकडेवारीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या  हजारो बंदूकधारी अतिरेक्यांनी गाझा पट्टीच्या आसपासच्या इस्रायली समुदायांवर हल्ला केला, यात सुमारे 1 हजार 200 लोक मारले आणि गाझामध्ये 251 ओलिसांचे अपहरण केले. त्यानंतर उसळलेल्या आणि 15 महिने चाललेल्या लढाईनंतर गाझाचा बराचसा भाग आता भग्नावस्थेत पडला आहे.

पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली युद्ध मोहिमेत  48 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हॉस्पिटल सुविधेसह एन्क्लेव्हमधील बरीच घरे आणि पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleAn America-Free Nuclear Umbrella For Western Europe
Next articleअंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांचा परतीचा प्रवास सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here