जयशंकर–पुतिन यांची भेट; यूएस टॅरिफवर टीका, दिल्ली समिट निश्चित

0

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, गुरुवारी मॉस्कोमधील तीन दिवसीय अधिकृत दौऱ्याची सांगता केली. या दौर्‍यात त्यांनी भारत–रशिया यांच्यातील व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याच्या आंतर-सरकारी आयोगाच्या 26व्या बैठकीचे सह-अध्यक्षस्थान भूषवले आणि क्रेमलिनमध्ये अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.

19 ते 21 ऑगस्टदरम्यानचा हा दौरा, रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांच्या निमंत्रणावरून झाला. या दौऱ्यात जयशंकर यांनी, भारत–रशिया बिझनेस फोरमला संबोधित केले आणि परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत विस्तृत चर्चा केली.

लावरोव यांनी पुष्टी केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष पुतिन, या वर्षाच्या उत्तरार्धात भारतात येतील. जयशंकर यांच्या भेटींनी या उच्च-स्तरीय संवादासाठी अजेंडा तयार करण्यास मदत केली.

हा दौरा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मॉस्को भेटीनंतर लगेचच झाला, ज्यामुळे भारत–रशिया संबंधांना गती देण्याचे स्पष्ट संकेत मिळतात.

या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने भारतावर आर्थिक दबाव वाढवला आहे. जयशंकर यांच्या आगमनाच्या काही दिवसांपूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, भारतीय निर्यातींवर नव्याने टॅरिफ लादले, ज्यापैकी 25% विविध उत्पादनांवर आणि अन्य 25% रशियन तेल खरेदीवर दंडस्वरूप शुल्क म्हणून टॅरिफ आकारले गेले.

या दौऱ्याचे एक महत्त्वाचे फलित म्हणजे, भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारासाठी (FTA) वाटाघाटीच्या अटींवर स्वाक्षरी करणे. जयशंकर म्हणाले की, हा करार “संतुलित आणि शाश्वत” पद्धतीने व्यापार वाढवण्यास मदत करू शकतो आणि गैर-शुल्क अडथळे आणि नियामक अडथळे दूर करण्याची गरज त्यांनी नमूद केली. त्यांनी कृषी, औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योग हे असे क्षेत्र म्हणून सांगितले जिथे भारत व्यापार असंतुलन दूर करण्यासाठी निर्यात वाढवू शकतो.

“ऊर्जा सहकार्य” हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला, ज्यामध्ये तेल, गॅस, अणुऊर्जा, तसेच रशियाच्या फॅर ईस्ट आणि आर्क्टिक भागातील संयुक्त प्रकल्पांचा समावेश होता. जयशंकर यांनी दीर्घकालीन खत पुरवठा, तसेच भारतीय IT, बांधकाम व अभियांत्रिकी व्यावसायिकांच्या संधींबाबतही चर्चा केली, ज्यामुळे रशियातील कामगार टंचाई दूर होऊ शकते.

दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग (International North-South Transport Corridor), चेन्नई-वलाडिवोस्टोक समुद्री मार्ग, आणि नॉर्दर्न सी रूटद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे नियोजन पुनरावलोकन केले.

जयशंकर म्हणाले की, “हे मार्ग दोन्ही देशातील आर्थिक संबंध वाढवतील, ट्रांझिट वेळ कमी करतील आणि युरेशियामधील व्यापार प्रवेश सुलभ करतील.”

संरक्षण क्षेत्रात, जयशंकर यांनी सैन्य-तांत्रिक सहकार्य “मजबूत” असल्याचे अधोरेखित केले, विशेषतः ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संयुक्त उत्पादन व तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून. रशियन सैन्यात सेवा देणाऱ्या भारतीय नागरिकांच्या प्रकरणावरही चर्चा झाली, आणि त्यांनी प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याची विनंती केली.

चर्चेचा विस्तार युक्रेन, युरोप, इराण, पश्चिम आशिया, अफगाणिस्तान आणि भारतीय उपखंडापर्यंत झाला. लावरोव यांनी युक्रेनमधील विदेशी हस्तक्षेपाला विरोध दर्शवला आणि असे म्हटले की कीव प्रशासन ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांना अस्थिर करत आहे. जयशंकर यांनी भारताचा पारंपरिक भूमिका घेऊन संवाद व मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षांचे समाधान शोधण्याचे आवाहन केले.

दोन्ही देशांनी जागतिक शासन संस्थांचे सुधार (जसे की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद विस्तार), या विषयावर आपली संयुक्त बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. G20, BRICS, आणि शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनमधील सहकार्य “सखोल आणि भविष्याभिमुख” असल्याचे नमूद करण्यात आले.

ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ निर्णयावर बोलताना, जयशंकर यांनी जोरदार निषाणा साधला, ते म्हणाले: “आम्ही रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार नाही, तर तो चीन आहे. आम्ही LNG चेही सर्वात मोठे खरेदीदार नाही, ते युरोपियन युनियन आहे. रशियासोबत 2022 नंतर सर्वात मोठी व्यापार वाढ झालेला देशही आम्ही नाही.”

ते पुढे म्हणाले की, “वर्षानुवर्षे अमेरिका आम्हाला रशियन तेल खरेदी करून, जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यास सांगत होती. आता आम्हाला त्यासाठीच दोष दिला जातोय? लक्षात घ्या, आम्ही अमेरिकेकडून देखील तेल खरेदी करतो आणि त्या खरेदीत वाढ झाली आहे.”

जयशंकर यांनी, भारत-रशिया संबंधांना “दुसऱ्या महायुद्धापासूनचे जगातील सर्वाधिक स्थिर संबंधांपैकी एक” असे संबोधले. हे संबंध सामरिक समज आणि जनमानसातील मैत्रीवर आधारित असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मॉस्कोमधील Tomb of the Unknown Soldier येथे पुष्पचक्र अर्पण करून, Great Patriotic War मध्ये मरण पावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

व्यापार फोरमपासून ते क्रेमलिन चर्चांपर्यंत, जयशंकर यांचा मॉस्को दौरा हे दर्शवतो की, भारत रशियासोबतचे आपले आर्थिक आणि धोरणात्मक स्थान मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे, जरी अमेरिका नवीन शुल्कांद्वारे नवी दिल्लीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

मूळ लेखक- रामानंद सेनगुप्ता

+ posts
Previous articleRussia Accuses US of ‘Sanctions Blackmail’ to Undermine Defence Ties with India, Highlights S-400’s Role
Next articleभारतासोबतच्या संरक्षण भागीदारीवरुन अमेरिकेचे ब्लॅकमेलिंग- रशियाचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here