भारतविरोधी कारवाया: JeM ची महिला विंगसाठी ऑनलाइन प्रबोधन मोहीम

0

अलिकडेच हाती आलेल्या गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने (JeM) भारतविरोधी जिहादी कारवायांमध्ये महिलांना सहभागी करून घेण्याच्या हेतूने ऑनलाइन कट्टरतावाद आणि प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. ही घडामोड JeM च्या भरती आणि ऑपरेशनल रणनीतीमध्ये एक महत्त्वपूर्ण उत्क्रांती दर्शविते. हा निर्णय त्यांच्या दहशतवादी नेटवर्कला पाठिंबा देण्यास आणि ते टिकवून ठेवण्यास सक्षम असलेल्या या प्रशिक्षित महिलांची डिजिटल पाइपलाइन तयार करण्याचा प्रयत्न आहे.

 

तुफत अल-मुमिनत नावाचा नवीन कार्यक्रम, या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या JeM च्या महिला शाखा, जमात-उल-मुमिनतच्या उभारणीसाठी पाया म्हणून काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. दररोज 40 मिनिटांच्या लाईव्ह सत्रांमध्ये रचलेला हा अभ्यासक्रम 8 नोव्हेंबरपासून सुरू होईल, ज्यामध्ये सहभागी झालेल्या महिलांना 500 पाकिस्तानी रुपयांची “देणगी” देणे आवश्यक आहे, जे अभ्यासक्रमाचे साहित्य मूल्य म्हणून सांगण्यात आले असले तरी संघटनेसाठी निधी संकलनाचे साधन म्हणून ते प्रभावीपणे कार्य करणार आहे.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्या दोन बहिणी, सादिया अझहर आणि समायरा अझहर, या प्रशिक्षण मॉड्यूलचे नेतृत्व करत असल्याचे मानण्यात येत आहे. गुप्तचर सूत्रांनुसार, सादिया अझहरला महिला ब्रिगेडची कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तिचा दिवंगत पती युसूफ अझहर, जो ऑपरेशन सिंदूर दरम्यान मारला गेला होता, त्याच्या जागी  आता हिची नियुक्ती करण्यात आली आहे. अझहर कुटुंबातील इतर सदस्य, ज्यात सफिया अझहर आणि आफ्रिरा फारूक (पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार उमर फारूकची विधवा पत्नी) यांचा समावेश आहे, त्या युनिटच्या नेतृत्व परिषदेत किंवा शूरामध्ये सामील झाल्याचे सांगितले जाते.

जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेची औपचारिक घोषणा 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली, त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी रावलकोट (पाकिस्तान-प्रशासित काश्मीर) येथे दुख्तरान-ए-इस्लाम नावाचा एक  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गुप्तचर विश्लेषकांचा असा अंदाज आहे की महिलांचा हा संरचित सहभाग जैश-ए-मोहम्मदच्या पारंपरिक नेटवर्क आणि पुरुष-प्रधान असलेल्या पायाभूत सुविधांना विस्कळीत करणाऱ्या सततच्या दहशतवादविरोधी दबावाला अनुकूल प्रतिसाद दर्शवितो.

डिजिटल कट्टरतावाद: नवीन आघाडी

JeM चे ऑनलाइन शिकवणी मॉडेल सुरू करण्याचा विचार हा आयएसआयएस, हमास आणि एलटीटीई सारख्या आंतरराष्ट्रीय अतिरेकी गटांमध्ये आढळणाऱ्या व्यापक नमुन्यांशी जुळते, ज्यांनी महिलांची भरती आणि प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल परिसंस्थेचा दीर्घकाळापासून वापर केला आहे.

JeM च्या बाबतीत विचार करायचा झाला तर सुरू करण्यात आलेले हे डिजिटल मॉड्यूल दोन उद्दिष्टे पूर्ण करते: पहिले, धार्मिक शिक्षण जिहादच्या नावाखाली एकत्र करून वैचारिक नरेटिव्ह प्रसारित करणे; आणि दुसरे, रसद, पोहोच आणि संभाव्यतः कमी-तीव्रतेची ऑपरेशन्स टिकवून ठेवण्यासाठी समांतर पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखाली समर्थन देणारी  संरचना स्थापन करणे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी असे नमूद केले आहे की ऑनलाइन पद्धतीमुळे महिला प्रत्यक्षपणे एकत्रितपणे आल्याचे दिसून येणे आणि असुरक्षितता दोन्ही कमी होतात. सहभागींना दूरस्थपणे कट्टरवादी बनवले जाते, ज्यामुळे JeM ला प्रत्यक्षातील मेळाव्यांशिवाय भरती वाढवता येते. प्रत्यक्ष मेळावे घेतले तर त्यांची छाननी होऊ शकते. शिवाय, आकारण्यात येणारे नाममात्र शुल्क केवळ स्थिर महसूल प्रवाह सुनिश्चित करत नाही तर भरती करणाऱ्यांमध्ये वचनबद्धतेची भावना देखील निर्माण करते. ही अतिरेकी परिसंस्थेमधील एक चाचणी केलेली मानसिक यंत्रणा आहे.

“हा सहभाग केवळ प्रतीकात्मक नाही,” असे एका वरिष्ठ भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याने नमूद केले. “प्रबोधन कार्यक्रम JeM च्या ऑपरेशनल फॅब्रिकमध्ये महिलांना सामावून घेण्यासाठी डिझाइन केला आहे – मग त्या प्रचारक असो, भरती करणाऱ्या, निधी संकलन करणाऱ्या किंवा सुविधा उपलब्ध करून देण्याऱ्या असोत. त्या संघटनेच्या लवचिकतेमध्ये भर घालणाऱ्या आहेत.”

कार्यात्मक आणि धोरणात्मक परिणाम

भारताच्या सतत सुरू असणाऱ्या दहशतवादविरोधी कारवाया आणि पाकिस्तान-आधारित संघटनांवर आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंधांनंतर जैश-ए-मोहम्मदचा ऑनलाइन उपक्रम धोरणात्मक पुनर्रचनेवर भर देणारा आहे. हा गट लिंग आणि तंत्रज्ञानाचा वापर असंतुलित साधन म्हणून करण्याचा प्रयत्न करतो असे मानले जाते, कारण पारंपरिकपणे पाळत ठेवण्याच्या चौकटीच्या रडारखाली काम करू शकणाऱ्या महिलांमध्ये भरती वाढवणे हेच या मागचे कारण आहे.

गुप्तचर संस्था नेटवर्कच्या डिजिटल व्याप्तीवर लक्ष ठेवून आहेत, जी जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश तसेच दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये पसरलेली आहे, जिथे एन्क्रिप्टेड सोशल मीडिया गट, मदरसा नेटवर्क आणि समुदाय-आधारित आउटरीच वाहिन्यांद्वारे JeM चा ऑनलाइन प्रचार करण्यात येत आहे.

धोक्याची व्याप्ती वाढणार

डिजिटल शिकवणी उपकरणाद्वारे समर्थित संरचित महिला विंगची निर्मिती जैश-ए-मोहम्मदने केलेला केवळ एक संघटनात्मक प्रयोग दर्शवत नाही; तर तो पाकिस्तानच्या प्रॉक्सी दहशतवादी व्यवस्थेत लिंगभेदी कट्टरतावादी शक्तीला वाढवण्यासाठी त्याला संस्थात्मक करण्याचा प्रयत्न दर्शवितो.

भारतासाठी, या सगळ्याच घडामोडी धोक्याची व्याप्ती वाढवणाऱ्या आहेत – ज्यात पारंपरिक घुसखोरी आणि स्लीपर-सेल मॉडेल्सपासून ते व्हर्च्युअल तसेच सोशल डोमेनमध्ये कार्यरत असलेल्या डिजिटली सक्षम महिला कट्टरपंथी नेटवर्कपर्यंतचा समावेश आहे.

धोरणात्मक निर्णय

तुफत अल-मुमिनतचा ऑनलाइन शिकवणी आणि प्रशिक्षण मॉड्यूल म्हणून होणारा उदय हे JeM च्या हायब्रिड युद्धाच्या विकसित सिद्धांताचे प्रतिबिंब आहे – जिथे डिजिटल कट्टरतावाद, लिंग सहभाग आणि सूक्ष्म-वित्तपुरवठा पारंपरिक प्रति-उपायांच्या रडारखालीदेखील दहशतवाद टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांना छेद देतात.

भारतीय सुरक्षा नियोजकांसाठी, व्हर्च्युअल कट्टरतावाद साखळी विस्कळीत करण्यासाठी सायबर देखरेख, मानसिक ऑपरेशन्स आणि सामाजिक पोहोच एकत्रित करणारे एक कॅलिब्रेटेड काउंटर नॅरेटीव्ह धोरण आवश्यक आहे. जागतिक दहशतवादाचे उदयोन्मुख परिमाण म्हणून डिजिटल-युगातील दहशतवादी वित्तपुरवठा आणि लिंग आधारित अतिरेकीवादाला आळा घालण्यासाठी प्रादेशिक आणि बहुपक्षीय यंत्रणा – एफएटीएफ आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटींसह – यांची आत्यंतिक गरज देखील अधोरेखित करते.

जैश-ए-मोहम्मदची डिजिटल मोहीम जसजशी पुढे सरकत आहे, त्यानुसार भारताच्या दहशतवादविरोधी यंत्रणेने या वास्तवाकडे लक्ष ठेवले पाहिजे की युद्धभूमी आता फक्त सीमांपुरती मर्यादित नाही – ती आता ब्राउझरमध्ये देखील विस्तारत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleUS-Made Javelin Anti-Tank Guided Missiles Purchase Underway: DG Infantry
Next articleभारतीय सैन्यात ‘भैरव’ बटालियन, ‘अशनी’ ड्रोन तैनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here