US Presidentship : बायडन यांची माघार, कमला हॅरीस यांना पाठिंबा

0
माघार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी 4 जुलै, 2024 रोजी वॉशिंग्टन, अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान हात हलवून अभिवादन केले. (एलिझाबेथ फ्रँट्झ/रॉयटर्स)

डेमोक्रॅटिक पक्षातल्या सहकाऱ्यांनी मानसिक अवस्था आणि डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्याच्या बायडेन यांच्या क्षमतेवर अविश्वास दाखवल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी पुनर्निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. तर उपाध्यक्षा कमला हॅरिस यांना पक्षाच्या उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे.

81 वर्षीय बायडेन यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, जानेवारी 2025 मध्ये कार्यकाळ संपेपर्यंत ते अध्यक्ष आणि कमांडर-इन-चीफ म्हणून त्यांच्या कार्यरत असतील. तसेच या आठवड्यात ते देशाला संबोधित करतील.

“तुमचे राष्ट्रपती म्हणून काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. आणि पुन्हा निवडणूक लढवण्याचा माझा हेतू असला तरी, मला विश्वास आहे की मी राजीनामा देणे आणि माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून माझी कर्तव्ये पार पाडण्यावर लक्ष केंद्रित करणे हे माझ्या पक्षाच्या आणि देशाच्या हिताचे आहे,” असे बायडेन यांनी पोस्टमध्ये लिहिले.

59 वर्षीय हॅरिस या देशाच्या इतिहासात प्रमुख पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरणार आहेत.

5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी सीएनएनशी बोलताना सांगितले की हॅरिस यांना पराभूत करणे सोपे जाईल असा त्यांचा विश्वास आहे.

या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले की, बायडेन यांचे विचार बदलत चालले होते. राष्ट्रपतींनी मित्रपक्षांना सांगितले की शनिवारी रात्रीपासून त्यांनी रविवारी दुपारी विचार बदलण्यापूर्वी या शर्यतीत कायम राहण्याची योजना आखली होती.

या प्रकरणाशी निगडीत असलेल्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले की, “शनिवारी रात्रीपासून यासंदर्भातील संदेश सर्व गोष्टींसह, वेगाने पुढे सरकत होता. रविवारी दुपारी सुमारे 1.45 वाजता अध्यक्षांनी त्यांच्या टीमला सांगितले की त्यांनी त्यांचा विचार बदलला आहे.”

त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी बायडेन यांनी सोशल मीडियावर आपला निर्णय जाहीर केला.

पक्ष नामांकनासाठी इतर वरिष्ठ डेमोक्रॅट्स हॅरिस यांना आव्हान देतील की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे कारण पक्षातील अनेक अधिकारी कदाचित आपली निवड होईल म्हणून मोठ्या आशेने याकडे पाहत होते-किंवा पक्ष स्वतः नामांकनांसाठी आपल्या नावाचा विचार करेल की नाही याची चाचपणी करत होते.

गेल्या महिन्यात म्हणजे 27 जून रोजी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी 78 वर्षीय ट्रम्प यांच्याविरुद्धच्या डिबेटमध्ये त्यांच्या धक्कादायक खराब कामगिरीनंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार आणि पक्षाच्या अधिकाऱ्यांकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी सार्वजनिक आणि खाजगी दबाव येत होता. त्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी ही घोषणा केली आहे.

या डिबेटमध्ये काही वेळा वाक्ये स्पष्टपणे बोलून पूर्ण करण्यात बायडेन यांना आलेल्या अपयशामुळे ट्रम्प यांच्या कार्यक्षमतेपासून लोकांचे लक्ष बायडेन यांच्यावर एकवटले गेले होते. या डिबेटमध्ये ट्रम्प यांनी अनेक चुकीची विधाने केली आणि बायडेन यांच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित करून त्यांना आणखी 4 वर्षांच्या कालावधीसाठी निवडून देणे योग्य नसल्याची टिप्पणी केली होती.

काही दिवसांनंतर त्यांनी एका मुलाखतीत वेगळीच चिंता व्यक्त केली होती. डेमोक्रॅट्सना वाटणारी काळजी आणि ओपिनियन पोलमध्ये वाढणारी दरी झुगारून दिली आणि सांगितले की त्यांना हे माहित असेल की ट्रम्पला हरवल्यास ते चांगले होईल. कारण त्यासाठी “मी माझे सर्वस्व दिले आहे.”

नाटोच्या शिखर परिषदेत बायडेन यांनी भाषणात केलेल्या चुकांमुळे – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे नाव घेण्याऐवजी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांचे नाव घेणे आणि हॅरिस यांना “उपराष्ट्रपती ट्रम्प” असे संबोधले – चिंता आणखी वाढली.

रविवारी करण्यात आलेल्या घोषणेच्या केवळ चार दिवस आधी, बायडेन यांना तिसऱ्यांदा कोविड-19 झाल्याचे निदान झाले, ज्यामुळे त्यांना लास वेगासचा प्रचार दौरा आटोपता घ्यावा लागला. काँग्रेसमधील 10 पैकी एकापेक्षा जास्त डेमोक्रॅट्सनी सार्वजनिकरित्या बायडेन यांना स्पर्धेतून माघार घेण्याचे आवाहन केले होते.

बायडेन यांचे हे ऐतिहासिक पाऊल असून मार्च 1968 मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्यानंतर पुनर्निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाचे नामांकन सोडणारे पहिले विद्यमान अध्यक्ष ठरले आहेत. मात्र त्यांच्या जागी येणाऱ्या उमेदवाराला प्रचार करण्यासाठी आता चार महिन्यांपेक्षा कमी कालावधी मिळणार आहे.

2020 मध्ये ट्रम्प यांना पराभूत करत निवडून आलेले बायडेन हे आतापर्यंतचे सर्वात वयस्कर अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. त्या मोहिमेदरम्यान, बायडेन यांनी स्वत:ला डेमोक्रॅटिक नेत्यांच्या पुढच्या पिढीसाठी असणारा ब्रिज असे वर्णन केले होते. काहींच्या मते ते आपल्या निवडीचा एक कार्यकाल पूर्ण करून नंतर निवृत्त होतील. मात्र दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता.

परंतु हॅरिस यांच्याकडे असणारा अनुभव आणि त्यांची लोकप्रियता याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागल्यावर ट्रम्प यांना पुन्हा पराभूत करू शकणारे आपण एकमेव डेमोक्रॅट आहोत या विश्वासाने त्यांनी दुसऱ्यांदा निवडून येण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. अलीकडच्या काळात मात्र, त्यांचे वाढलेले वय दिसायला लागले. त्यांची चाल मंदावली गेली आणि बोलताना बालपणासारखे अडखळणे अधूनमधून दिसायला लागले.

जो बायडेन यांनी सुरुवातीला स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी येणाऱ्या दबावाला विरोध केला.दबाव अधिक वाढू नये यासाठी अनेकांना फोन केले, खासदार आणि राज्यपालांसोबत बैठका घेतल्या. दूरचित्रवाणीवरील मुलाखतींसाठी ते बसले. मात्र ते पुरेसे ठरले नाही. जनमत चाचण्यांनी प्रमुख राज्यांमध्ये ट्रम्प यांची आघाडी वाढल्याचे दर्शविले आणि डेमोक्रॅट्सना सभागृह तसेच सिनेटमध्ये पराभव होण्याची भीती वाटू लागली. 17 जुलै रोजी कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ॲडम शिफ यांनी बायडेन यांना शर्यतीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले.

बायडेन यांच्या माघार घेण्याने डेमोक्रॅट्सच्या संभाव्य नवीन उमेदवार, कमला हॅरिस, ज्या एक माजी वकील आहेत आणि ट्रम्प – ज्यांच्याकडे हॅरिस यांच्यापेक्षा दोन दशके अधिक अनुभव आहे ते 2020च्या निवडणुकीचा निकाल उलटवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांशी संबंधित दोन प्रलंबित फौजदारी खटल्यांना सामोरे जात आहेत – यांच्यात एक नवीन विरोधाभास निर्माण झाला आहे. एका पॉर्नस्टारला गुप्तपणे पैसे दिल्याचे लपवल्याबद्दल ट्रम्प यांना सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये शिक्षा सुनावली जाणार आहे.

जो बायडेन यांनी 2020 मध्ये पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जियामधील चुरशीच्या लढतींसह तुल्यबळ असलेल्या राज्यांमध्ये विजय मिळवून ट्रम्प यांना पराभूत केले. राष्ट्रीय स्तरावर, त्यांनी ट्रम्प यांना 70 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले आणि ट्रम्प यांना 46.8 टक्के मते तर बायडेन यांना 51.3 टक्के मते मिळाली होती.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)

+ posts
Previous articleपॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनी टपाल तिकीटाचे अनावरण
Next articleMediation Set To Replace Arbitration In Government Contracts

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here