या आठवड्याच्या शेवटी कैरो येथे होणाऱ्या चर्चेच्या नवीन फेरीपूर्वी गाझा युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेबाबतच्या करारावर सहमती दर्शविण्यासाठी हमास अतिरेक्यांवर दबाव आणण्याचे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इजिप्त आणि कतारच्या नेत्यांना केले आहे.
कैरो येथे होणाऱ्या चर्चेत भाग घेणाऱ्या अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सीआयएचे संचालक बिल बर्न्स करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांना ओलिसांच्या सद्यस्थितीबद्दल होणाऱ्या चर्चेसाठी पत्रे लिहिली असून “बायडेन यांनी त्यांना हमासकडून यासंदर्भात सहमती आणि कराराचे पालन व्हावे यासाठी वचन घेण्याचे आवाहन केले आहे,” असे अमेरिकन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बायडेन यांनी गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली, ज्यामध्ये त्यांनी कैरोमध्ये ओलिसांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या वाटाघाटी आणि चर्चा याबाबत विचारविनिमय केला.
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांच्या मते, बायडेन यांनी नेतान्याहू यांना कैरोमधील वाटाघाटी करणाऱ्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सर्वाधिकार देण्यास सांगितले जेणेकरून लवकरात लवकर हा करार होऊ शकेल.
पॅलेस्टाईनमधील संभाव्य दुष्काळाच्या भीतीमुळे गाझामध्ये मानवतावादी दृष्टीने अधिक मदत पोहोचवण्यासाठी युद्धविराम आवश्यक असल्याचे अमेरिका आणि त्याच्या मित्रपक्षांचे मत आहे.
अलीकडेच मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, हमासने ताब्यात घेतलेल्या आजारी, वृद्ध आणि जखमी ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायल आणि हमास सहा आठवड्यांच्या युद्धबंदीसाठी सहमत होतील. या एका करारावरील सहमतीसाठी गेले अनेक आठवडे चर्चा सुरू आहेत.
“जर हमासने या ओलिसांना – ज्यात आजारी, जखमी, वृद्ध आणि तरुण महिलांचा समावेश आहे – सोडण्यास याआधीच सहमती दर्शवली असती तर गाझामध्ये आज युद्धविराम झाला असता, ही वस्तुस्थिती अजूनही सत्यात उतरू शकते,” असे अमेरिकन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वाटते.
“ओलिसांची सुटका करण्याची आणि दीर्घकाळ युद्धबंदीच्या माध्यमातून गाझाच्या लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी आता हमासवर आहे”, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये ओलिसांच्या कुटुंबियांची व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन भेट घेतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
गाझामध्ये वर्ल्ड सेंट्रल किचनच्या सात मदत कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या हत्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची अमेरिकेची कोणतीही योजना नसल्याचे किर्बी यांनी स्पष्ट केले.
या आठवड्यात गाझा हवाई हल्ल्यात मदत कर्मचाऱ्यांच्या हत्येच्या चौकशीत गंभीर त्रुटी आणि प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यानंतर इस्रायली सैन्याने दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले असून वरिष्ठ कमांडरांना सक्त ताकीद दिली आहे.
नेतान्याहू यांनी गुरुवारी बायडेन यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात या घटनेवर इस्रायलने केलेल्या चौकशीतून निघालेल्या सर्वसाधारण निष्कर्षांची माहिती दिली होती. बायडेन यांनी नेतान्याहू यांना इशारा दिला की इस्रायलने मानवी हानी आणि त्यांना होणारे दुःख दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत अन्यथा वॉशिंग्टन प्रत्युत्तरादाखल आवश्यक ती कारवाई करेल.
पिनाकी चक्रवर्ती
(स्रोत : रॉयटर्स)